संकेत नवले प्रकरणातील दोन्ही आरोपी न्यायालयीन कोठडीत! एकाच्या पोलीस कोठडीचा हक्क अबाधित; जामिनाच्या शक्यतेचा पोलिसांकडून इन्कार..
नायक वृत्तसेवा, संगमनेर
संपूर्ण अहमदनगर जिल्ह्यात खळबळ उडवून देणार्या संकेत नवले खून प्रकरणात पोलिसांनी अटक केलेल्या दोन्ही आरोपींना संगमनेरच्या जिल्हा व सत्र न्यायालयाने चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. यातील शाहरुख हसन शेख याच्या कोठडीचा फैसला करताना जिल्हा न्यायालयाने त्याच्या कोठडीसाठी पोलिसांचा हक्क मात्र अबाधित ठेवला आहे. त्यामुळे पुढील तपासात गरज भासल्यास पोलीस कधीही त्याच्या कोठडीची मागणी करु शकतील. या सर्व घटनांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी निष्पाप तरुणांना गोवल्याचेही आरोप झाले, मात्र तपास पथकाने त्याचा इन्कार केला असून या हत्याकांडात दोघांचाही सहभाग असल्याचा पुन्हा एकदा दावा केला आहे.
गेल्या वर्षी 8 डिसेंबर रोजी सकाळी सुकेवाडी रस्त्यावरील नाटकीनाल्याजवळ अमृतवाहिनी अभियांत्रिकी महाविद्यालयात संगणक शास्त्राचे शिक्षण घेणार्या अकोले येथील संकेत नवले या विद्यार्थ्याचा मृतदेह आढळून आला होता. याप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर तब्बल दोन महिन्यांनी 8 फेब्रुवारी रोजी पोलिसांनी या प्रकरणात पहिल्यांदाच पुनर्वसन वसाहतीत राहणार्या सलमान इमाम शेख (वय 30) व शाहरुख हसन शेख (वय 22) या दोघांना अटक केली होती. 9 फेब्रुवारी रोजी या दोघांनाही न्यायालयाने प्रत्येकी पाच आणि सहा दिवसांच्या पोलीस कोठडीत पाठवले होते.
या दरम्यान पोलिसांनी कोठडीत दोन्ही आरोपींकडे कसून चौकशीही केली. दैनिक नायकला प्राप्त झालेल्या माहितीनुसार गेल्या सहा दिवसांच्या कोठडीत या दोघांवर प्रश्नांचा भडीमार करण्यात आला. मात्र त्यातून नव्याने कोणतीही माहिती समोर आली नाही. या दरम्यान त्यांच्या पोलीस कोठडीची मुदतही संपल्याने त्यांना न्यायालयासमोर उभे करण्यात आले होते. यावेळी पोलिसांनी नव्याने पोलीस कोठडीची मागणी केली नाही, मात्र त्यांना जामीन देण्यास तीव्र विरोध दर्शविला. त्यावर जिल्हा न्यायालयाने दोन्ही आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी देताना शाहरुख हसन शेख या आरोपीच्या पोलीस कोठडीचा हक्क कायम ठेवला. त्यामुळे पोलिसांनी नव्याने समोर येणार्या तथ्यांच्या आधारे मागणी केल्यास त्याला पुन्हा पोलीस कोठडीत घेतले जाण्याची शक्यता आहे.
सदर प्रकरणाचा आत्तापर्यंत तपास अतिशय किचकट आणि तांत्रिक विश्लेषणातून समोर आलेल्या वेगवेगळ्या कड्या जोडून करण्यात आला आहे. अशाप्रकारच्या एखाद्या प्रकरणात वस्तुस्थितीजन्य पुराव्यांची वाणवा असताना पोलिसांनी तांत्रिक गणितांचा आधार घेतल्याने हे प्रकरण व त्यातील तांत्रिक तपास सामान्य माणसांच्या आकलना बाहेरचा ठरला आहे. त्यामुळे संबंधितांना अटक होताच काहींनी ते दोघेही निष्पाप असल्याचे सांगत पोलीस त्यांना नाहक या प्रकरणात गोवण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप त्यांच्या नातेवाईकांनी केला होता, जो आजही कायम आहे.
या सर्व पार्श्वभूमीवर न्यायालयाने त्या दोघांची रवानगी न्यायालयीन कोठडीत केल्यानंतर त्यांना जामीन मिळण्याची शक्यता निर्माण झाली होती. मात्र प्रत्यक्षात न्यायालयाने दोघांनाही 14 दिवस न्यायालयीन कोठडीत घेताना त्यातील एका आरोपीला पुढील कालावधीत पोलिसांकडून मागणी होईल तेव्हा पुन्हा पोलीस कोठडीत पाठवण्याची तजबीज कायम ठेवल्याने आत्तापर्यंत पोलिसांनी केलेला तपास योग्य असल्याचा निष्कर्ष काढला जात आहे. मात्र दोन महिन्यांनी उलगडा होवून त्यातून दोन आरोपी पोलिसांच्या हाती येवूनही नव्याने कोणतीही माहिती समोर आणण्यात पोलीस अपयशी ठरल्याने या प्रकरणाचा गुंता अद्यापही पूर्णतः सुटलेला नसल्याचे स्पष्ट झाले आहे. या उपरांतही अटकेत असलेल्या आरोपींना जामीन होण्याची शक्यताही पोलिसांनी फेटाळली आहे.
किचकट आणि पूर्णतः तांत्रिक तपासावर आधारित असलेल्या या प्रकरणातील दोन्ही आरोपींबाबत तपास पथक ठाम असले तरीही त्यांचे नातेवाईक व परिसरातील काही नागरिक या गोष्टीवर विश्वास ठेवायला तयार नाहीत. अशा स्थितीत न्यायालयाने दोघांनाही न्यायालयीन कोठडी सुनावली असताना त्यातील एकाच्या पोलीस कोठडीची शक्यता कायम ठेवली आहे. त्यामुळे पुढील काहीकाळ अटकेत असलेल्या दोन्ही आरोपींना जामीन मिळण्याची शक्यता नसल्याचे सांगत यातून या प्रकरणाचा तपास योग्य दिशेने सुरु असल्याचा दावाही पोलिसांकडून करण्यात आला आहे.