वृद्धेच्या मृत्यूप्रकरणी बापलेकाविरुद्ध गुन्हा दाखल पिकअप मागे घेताना बसली होती जोराची धडक
नायक वृत्तसेवा, अकोले
तालुक्यातील राजूर येथे पिकअप मागे घेत असताना जोराची धडक देऊन पायावरून व कमरेवरून गाडी घालून अनुसया संतू पथवे (वय ७५) या गंभीर जखमी होवून मयत झाल्या. परवाना नसलेल्या अल्पवयीन मुलास गाडी चालविण्यास दिली म्हणून संदीप विश्वनाथ वाळे (रा. राजूर) व मुलगा या दोघांविरुद्ध राजूर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, सिंधूबाई रामनाथ पथवे (वय ४८, रा. राजूर) त्यांच्या सासुबाई अनुसया संतू पथवे यांना तीन महिन्यांपूर्वी १३ जून २०२३ रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास डॉक्टर भोकनळ यांच्या दवाखान्यात बरे वाटत नसल्याने औषधोपचारांसाठी नेत होत्या. त्यांना दम लागल्याने त्या संदीप वाळे यांच्या वेल्डिंगच्या दुकानासमोरील बदामाच्या झाडाच्या सावलीखाली बसल्या होत्या. त्यावेळी संदीप वाळे यांची पिकअप (एमएच.१७, बीडी.७०६) ही दुकानासमोर उभी होती. मुलगा ही गाडी मागे घेताना अनुसया पथवे यांना जोराची धडक यांना बसली.
गाडीचे चाक त्यांच्या पायावरून व कमरेवरून गेल्याने त्या जबर जखमी झाल्या. त्यांना पुढील उपचारांकरीता अकोले येथील खासगी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. तीन दिवसांच्या उपचारानंतर त्यांना बरे वाटल्यानंतर १६ जून २०२३ रोजी त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. त्यानंतर राजूर येथील डॉक्टर भोकनळ यांच्याकडून वेळोवेळी औषधोपचार करून त्यांच्या जखमांना मलमपट्टी करीत होते. दरम्यान, २६ जून २०२३ रोजी पहाटे पाच वाजता अनुसया पथवे या मयत झाल्या. जखमांमुळेच अनुसया पथवे यांचा मृत्यू झाला. परंतु, दुःखात असल्याने फिर्याद देण्यास उशीर झाला म्हणून बुधवारी (ता.१३) संदीप विश्वनाथ वाळे व त्यांचा मुलगा यांच्या विरुद्ध भारतीय दंडसंहिता कलम ३०४ अ, २७९, ३३८ तसेच मोटार वाहन अधिनियम १८०, १८४, १८१ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक प्रवीण दातरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल रोहिणी वाडेकर करत आहे.