दहा वर्षांपासून नाऊरसह जाफराबाद पोलीस पाटलाच्या प्रतीक्षेत तरुण भरतीपासून राहिले वंचित; प्रांताधिकार्‍यांकडे लक्ष घालण्याची मागणी


नायक वृत्तसेवा, श्रीरामपूर
तालुक्यातील नाऊर व जाफराबाद येथील सन 2012 पासून पोलीस पाटील सेवानिवृत्त झाल्याने हे पद रिक्त आहे. अद्याप या दोन्ही गावांना पोलीस पाटील नसल्याने अनेक तरुणांना भरतीपासून वंचित राहावे लागले. तसेच इतर कामे देखील अडचणीची ठरत आहे. यासंदर्भात प्रांताधिकारी अनिल पवार यांनी लक्ष घालण्याची मागणी परिसरातून होत आहे.

नाऊर येथे पोलीस पाटील लक्ष्मण चौधरी यांनी सुमारे 32 वर्षांची प्रदीर्घ सेवा केली. तसेच जाफराबाद येथील पोलीस पाटील अशोक क्षीरसागर यांनीही चांगली सेवा देत दोघेही सेवानिवृत्त झाल्यापासून अद्याप येथे पोलीस पाटील पद भरले नाही. त्यामुळे येथील तरुणांना भरतीसाठी लागणारा पोलीस पाटील यांचा वर्तवणुकीचा दाखला न मिळाल्याने या भागातील अनेक तरुणांना नुकत्याच अहमदनगर येथे झालेल्या पोलीस भरतीपासून मुकावे लागले. नायगाव येथील पोलीस पाटील राजेंद्र राशिनकर हे अतिशय चांगल्याप्रकारे प्रशासनासह या भागातील नागरिकांना सेवा देत असले तरी त्यांना नाऊर तसेच जाफराबाद येथील विद्यार्थ्यांना वर्तवणुकीचा दाखला देण्याचा अधिकार नसल्याने त्यांची इच्छा असली तरी कायदेशीर अडचणीमुळे तरुणांचा नोकरीचा मोठ्या प्रमाणात अपेक्षाभंग झाला आहे.

दरम्यान, नाऊर येथील पोलीस पाटील सेवानिवृत्त झाल्यापासून त्यांचा पर्यायी कारभार रामपूर येथील पोलीस पाटील बर्डे यांच्याकडे देण्यात आला होता. मात्र बर्डे यांचे मोलमजुरी करणारे कुटुंब असल्याने त्यांची व ग्रामस्थांची भेटच होत नव्हती. त्यामुळे या भागाची अनेक वर्षापासून पोलीस पाटील पदासाठी फरपट सुरू असून प्रशासनासह ग्रामस्थांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे. पोलीस पाटलांची नियुक्ती त्वरीत करण्यासाठी प्रांताधिकारी अनिल पवार यांनी लक्ष घालावे, अशी मागणी तरुणांसह ग्रामस्थांनी केली आहे.

Visits: 86 Today: 1 Total: 1105911

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *