वेठबिगार म्हणून अल्पवयीन मुलांना कामावर ठेवू नका! घारगावचे प्रभारी पोलीस निरीक्षक संतोष खेडकरांचे आवाहन


नायक वृत्तसेवा, घारगाव
वेठबिगार म्हणून अल्पवयीन मुलांना कामावर ठेवू नका तसे आढळल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल. त्याचबरोबर कुठे अल्पवयीन मुले कामाला असल्यास तत्काळ घारगाव पोलिसांशी संपर्क करा, असे आवाहन घारगाव पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक संतोष खेडकर यांनी केले.

संगमनेर तालुक्यातील साकूर परिसरात काही लोकांनी वेठबिगार म्हणून अल्पवयीन मुलांना पैसे देवून मेंढ्या चारण्यासाठी आणले होते. त्यामुळे त्या लोकांवर गुन्हे दाखल झाले आहे. मात्र, पुन्हा असे प्रकार होवू नये म्हणून जांभुळवाडी गट ग्रामपंचायत कार्यालयात बैठक आयोजित केली होती. यावेळी सरपंच शांताबाई कुदनर, उपसरपंच शिवाजी खेमनर, जयराम ढेरंगे, ग्रामपंचायत सदस्य संतोष खेमनर, महादू कुदनर, सुभाष खेमनर, नामदेव खेमनर, रघुनाथ भडकवाड, सुरेश खेमनर, मच्छिंद्र खेमनर आदी उपस्थित होते.

पुढे बोलताना पोलीस निरीक्षक संतोष खेडकर म्हणाले, साकूर भागातील काही लोकांनी वेठबिगार म्हणून अल्पवयीन मुलांना मेंढ्या चारण्यासाठी पैसे देवून आणले होते. त्यानुसार अल्पवयीन मुलांना कामावर ठेवले म्हणून बंधबिगार पध्दती 1976 चे कलम 16, 17, 18 व बालकामगार प्रतिबंध आणि विनिमय अधिनियम कलम 1986 चे कलम 3, 14 प्रमाणे गुन्हे दाखल केले आहेत. तसेच यापूर्वी काही लोकांना अटकही केली होती. तरी कोणाकडे अल्पवयीन मुले कामाला असल्यास त्यांनी तत्काळ घारगाव पोलिसांशी संपर्क करावा. त्याचबरोबर कोणीही अल्पवयीन मुलांना कामावर ठेवू नका असेही त्यांनी सांगितले. यावेळी त्यांच्या समवेत पोलीस हेडकॉन्स्टेबल दशरथ वायाळ, हरिश्चंद्र बांडे, नामदेव बिरे आदी उपस्थित होते.

Visits: 96 Today: 1 Total: 1102552

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *