आश्वी खुर्द सेवा सोसायटीची सभा वादळी!

नायक वृत्तसेवा, आश्वी
तब्बल ११४ वर्षाची उज्वल परंपरा असलेल्या तालुक्यातील आश्वी खुर्द विविध कार्यकारी सेवा सोसायटीची वार्षिक सभा वादळी ठरली. सहीच्या अधिकारावरून संचालक संतप्त झाले तर लाभांश जाहीर न केल्याने सभासदांनी गोंधळ घातला. त्यामुळे ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेल्या या सोसायटीच्या प्रतिष्ठेला धक्का लागला आहे.

स्वातंत्र्यपूर्व काळापासून अस्तित्वात असलेली ११४ वर्षाच्या आश्वी खुर्द विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीची वार्षिक सभा मोठ्या गदारोळात पार पडली. सहीच्या अधिकारावरून संचालकांमध्ये संताप, आर्थिक अनियमिततेवर आरोप, तर लाभांश जाहीर न केल्याने सभेत राडा, अशा वातावरणामुळे सभा चांगलीच गाजली.

सभेच्या अध्यक्षस्थानी चेअरमन विजय भोसले होते. यावेळी व्हा. चेअरमन राजेंद्र मांढरे, संचालक मंडळातील विठ्ठल गायकवाड, रमेश सोनवणे, ज्ञानेश्वर खर्डे, भाऊसाहेब शिंदे, स्नेहल भवर, प्रशांत कोडोलिकर, भास्कर वाल्हेकर, दत्तात्रय गायकवाड, सुरेखा गायकवाड, शोभा गायकवाड, राजेंद्र मुन्तोडे, विठ्ठल वर्पे, भाऊसाहेब गाडे, सुरेश गायकवाड, आदीसंह बाळासाहेब मांढरे, मकरंद गुणे, डॉ. दिनकर गायकवाड, अविनाश सोनवणे, कैलास गायकवाड, मोहित गायकवाड, विकास गायकवाड, राजेंद्र गायकवाड, यशवंत वाल्हेकर, रमेश गायकवाड, सुरेश सोनवणे, शिवाजी शिंदे, बापु भवर, तुषार सोनवणे, अंकुश गव्हाणे, हौशिराम गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते. सचिव बाळासाहेब गायकवाड यांनी वार्षिक अहवाल सादर केला.

संस्थेच्या घटनेनुसार चेअरमन, व्हा. चेअरमन व आणखी एका संचालकाकडे सहीचा अधिकार असावा मात्र गेल्या तीन वर्षांपासून बदलणाऱ्या पदाधिकाऱ्यांकडे तो न देता फक्त एका जेष्ठ संचालकाकडेच तो ठेवण्यात आल्याचा आरोप झाला. इतर संचालकांना अधिकार का दिला जात नाही? पडद्यामागे हीच व्यक्ती संपूर्ण संस्था चालवते, पदाधिकारी फक्त नावालाच आहेत असा सवाल उपस्थित करण्यात आला.
ज्ञानेश्वर खर्डे, दत्तात्रय गायकवाड, भास्कर वाल्हेकर यांनी आरोप केला की, मागील सभेत नेमलेले ऑडिटर बदलून परस्पर दुसऱ्याच साध्या सी.ए.कडून ऑडिट करून घेतले. त्यामुळे संस्थेला ‘ब’ वर्ग मिळाला. खते-औषधे दुकानातील ताळमेळही लागत नसल्याचे त्यांनी सांगितले.
४० वर्षे सेवा केलेले कर्मचारी आप्पासाहेब गायकवाड यांच्या निवृत्तीनंतर त्यांचा साधा सत्कारही न केल्याबद्दल संचालकांनी नाराजी व्यक्त केली. दिवाळीसाठी संस्थेने लाभांश जाहीर न केल्याने सभासद बाबासाहेब भोसले यांनी सभागृहात केळी वाटप करून अनोखे आंदोलन केले. त्यांच्या या कृतीमुळे काही काळ गोंधळ उडाला. त्यानंतर सोसायटीच्या व्यवस्थापनाने तीन टक्के लाभांश जाहीर केला.

Visits: 82 Today: 2 Total: 1105838
