स्थानिक गुन्हे शाखेची गावठी हातभट्टी अड्ड्यांवर छापेमारी श्रीरामपूर शहर पोलीस हद्दीसह शेवगावमध्ये केली कारवाई
नायक वृत्तसेवा, श्रीरामपूर
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने श्रीरामपूर शहर पोलीस ठाणे व शेवगाव हद्दीत अवैध गावठी हातभट्टी ठिकाणांवर छापे टाकून 38 हजार 760 रुपये किंमतीचा मुद्देमाल त्यात देशी दारुच्या 168 सीलबंद बाटल्या, अवैध गावठी हातभट्टीची साधने, 400 लिटर कच्चे रसायन व 70 लिटर तयार दारूचा नाश केला. या कारवाईत पोलिसांनी 46 हजार 760 रुपयांचा मुद्देमाल जप्त करून 3 आरोपींविरुध्द गुन्हा दाखल केला आहे.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील सहायक फौजदार मनोहर शेजवळ, पोलीस हेडकॉन्स्टेबल विजय वेठेकर, बापूसाहेब फोलाणे, संदीप घोडके, पोलीस नाईक शंकर चौधरी, संतोष लोढे, संदीप चव्हाण, संदीप दरंदले, भीमराज खर्से, पोलीस कॉन्स्टेबल रोहिदास नवगिरे, जालिंदर माने व चालक पोलीस हेडकॉन्स्टेबल अर्जुन बडे यांचे पथक नेमून अवैध धंद्यावर कारवाई करण्याचा आदेश दिला होता.
या पथकातील पोलिसांनी शेवगाव व श्रीरामपूर शहर पोलीस ठाणे हद्दीत 2 ठिकाणी छापे टाकले. या छाप्यात एकूण 38 हजार 760 रुपये किंमतीचा मुद्देमाल त्यात देशी दारुच्या 168 सीलबंद बाटल्या, गावठी हातभट्टी तयार करण्यासाठी लागणारे 400 लिटर कच्चे रसायन, 70 लिटर गावठी हातभट्टीची दारु जप्त करून कुलदीप बळीराम कोकाटे (वय 26, रा. बोधेगाव, ता. शेवगाव), किशोर इलिटम (रा. बोधेगाव, ता. शेवगाव) व श्रीकांत प्रभाकर काळे (वय 28, रा. भैरवनाथ नगर, श्रीरामपूर) या 3 आरोपींविरुध्द शेवगाव पोलीस पोलिसांत गुरनं. 73/2023 मुं. प्रो. अॅ. कलम 65 (ई), श्रीरामपूर शहर पोलिसांत गुरनं. 98/2023 मुं. प्रो. अॅ. कलम 65 (ई) (फ) महाराष्ट्र दारुबंदी कायद्यान्वये गुन्हे दाखल केले आहेत.