अनिश्चितता घेवून उगवलेला सूर्य दिलासा देवूनच मावळला! वर्षाच्या अखेरच्या दिवशीही एकविस रुग्ण आढळले, मात्र महामारीच्या माघारीचा प्रवास कायम..
श्याम तिवारी, संगमनेर
अनिश्चिततेचा सूर्य घेवून उगवलेल्या गेल्या वर्षात कोविड नावाच्या वैश्विक महामारीने अवघ्या जगातील मानवजातीला संकटात आणले. आपापल्या नागरिकांचे जीव वाचवण्यासाठी धडपणारी सरकारे आणि देवदूताप्रमाणे आपला जीव धोक्यात घालून माणसं वाचवणारी यंत्रणा अशा भयाण दृष्यांना इतिहासाच्या पानात दडवित नऊ महिन्यांचा हा भयानक कालखंड गुरुवारच्या सूर्यास्तासह अस्ताला गेला. कोविड नावाच्या या जागतिक महामारीने जगातील करोडों लोकांना पछाडीत असंख्य बळीही घेतले. त्यातून सह्याद्रीच्या कुशीत वसलेले संगमनेरही वाचले नाही. नऊ महिन्यांच्या या कालावधीत तालुक्यातील तब्बल 6 हजार नागरिक या महामारीने जायबंदी झाले, तर 47 नागरिकांना आपला जीवही गमवावा लागला. नऊ महिन्यांपूर्वी सुरु झालेला या महामारीचा प्रादुर्भाव वर्षाच्या अस्तालाही कायम होता, मात्र त्याची दाहकता आणि वेग मात्र नियंत्रणात आल्याचे दृष्यही नववर्षाच्या लख्खं सूर्य किरणांनी दाखवल्याने नूतन वर्ष आरोग्यसंपन्न आणि या वैश्विक महामारीचे निर्मुलन करणारे ठरेल असा विश्वासही मनामनात जागला.
गेल्या वर्षी फेब्रुवारीत चायनामधील व्युहान शहरातील शासकीय प्रयोगशाळेतून ‘कोविड 19’ नावाचा अदृष्य शत्रू बाहेर पडला आणि त्याने बघताबघता अख्ख्या जगालाच विळखा घातला. अत्याधुनिक शस्त्रांसह सीमेवर तैनात असलेल्या लाखों जवानांच्या भरवशावर आपण सुरक्षित असल्याच्या अर्विभावात निवांत असलेल्या जगातील बहुतेक देशांमध्ये त्याने अगदी सहज प्रवेश केला आणि आरोग्यसंपन्न म्हणून शेखी मिरवणारी राष्ट्रचं राष्ट्र या अदृष्य शत्रूसमोर हतबल झाल्याची आणि त्याचा भयानक परिणाम म्हणून हजारों माणसं किड्यामुंग्यासारखी मरुन पडल्याची दृष्यही गेल्या वर्षाने जगाला दाखवली. तो पर्यंत ही महामारी आपल्याकडे येणारच नाही अशा पद्धतीने सोशल माध्यमातील विद्वानांनी आवई उठवली, मात्र ती सपशेल फोल ठरवित मार्चमध्ये या चायनीज विषाणूंनी आपल्या देशात प्रवेश केला आणि बोलताबोलता तो व्यापक झाला.
नवखा विषाणू असल्याने ना त्याची दाहकता समजत होती, ना त्याचा उपाय. मात्र तरीही केंद्र असो वा राज्य देशातील सर्व सरकारे आपली माणसं वाचवण्यासाठी धडपडू लागली. जिल्ह्याजिल्ह्यातील वरीष्ठ अधिकारी जिल्हाधिकार्यांच्या नेतृत्त्वाखाली या शत्रूशी चारहात करु लागली. बाधित झालेल्यांना तात्काळ हुडकून त्यांना रुग्णालयात नेले जावू लागले. त्यांचा परिसर बंद केला जावू लागला. देशभरात टाळेबंदी घोषीत झाल्याने देशातील कानाकोपर्यातील वातावरण भयग्रस्त बनले. या कालावधीत बाधित रुग्ण आढळूनही संगमनेर तालुक्यातील कोविडचा प्रादुर्भाव नियंत्रणात ठेवण्यात आरोग्य, पालिका, पोलीस व महसुल विभागाने यश मिळविले. बाधित झालेल्यांना उपचार मिळावे यासाठी सज्जता निर्माण केली गेली, संसर्ग वाढू नये यासाठी पोलिसांनी प्रसंगी कठोर भूमिका घेवून गुन्हे दाखल करण्यासह दंडात्मक कारवायांचा बडगाही उगारला. यासर्व प्रयोगातून वेगवेगळ्या विभागातील अधिकारी व कर्मचारी बाधितही झाले आणि पुन्हा सेवेतही आले.
गेल्या वर्षी एप्रिलमध्ये संगमनेर तालुक्यात प्रवेश करणार्या कोविडने या महिन्यात शहरातील सात जणांसह आठ जणांना बाधित केले. मे महिन्यात त्यात चौपट गतीने वाढ झाली आणि शहरातील पंधरा जणांसह 36 जणांना या विषाणूंनी जखडले. जूनपासून केंद्राने ‘अनलॉक’ची प्रक्रीया सुरु केल्याने रस्त्यावरील गर्दी वाढली. त्याचा परिणाम रुग्णसंख्या वाढीतही दिसून येवू लागला. अनलॉक प्रक्रीया सुरु झाल्याच्या पहिल्याच महिन्यात जूनमध्ये शहरातील 42 जणांसह 65 जणांना कोविडने रुग्णालयात दाखल केले. जुलैमध्ये या प्रक्रीयेअंतर्गत आणखी उद्योग व व्यवसाय खुले झाल्याने या महिन्यात कोविड प्रादुर्भावाचा वेग दहा पटीने वाढून शहरातील 269 आणि ग्रामीण क्षेत्रातील 381 रुग्णांसह 650 जणांना बाधित केले.
जुलैच्या शेवटच्या आठवड्यापासून दररोजच्या रुग्णसंख्येवर काहीसे नियंत्रण मिळत असल्याचे चित्र दिसू लागले ते 20 ऑगस्टपर्यंत टिकून राहील्याने लॉकडाऊनच्या नियमांमुळे घरबंद झालेल्या संगमनेरकरांचा उत्साह दुणावला आणि उत्साहाचे भरते आणणार्या गणेशोत्सवासाठी नागरिकांनी बाजारपेठा फुलल्या. त्याचा परिणाम ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यापासून संपूर्ण सप्टेंबरमध्ये बघायला मिळाला. ऑगस्टमध्ये नियंत्रणात येवू पाहणारी स्थिती शेवटच्या आठवड्यात हाताबाहेर गेली आणि या महिन्यात शहरातील 341 जणांसह ग्रामीण भागातील 620 अशा एकूण 961 जणांना संक्रमण झाले.
घराघरात मंगलमूर्तींच्या आगमनाचे निमित्त साधून कोविडने आपली व्यापकता वाढवत सप्टेंबरमध्ये कोविड बाधितांच्या संख्येचा नवा उच्चांक प्रस्तपित करताना शहरातील 289 जणांसह तालुक्यातील एकूण 1 हजार 529 जणांना पछाडले. मात्र त्यानंतर टप्प्याटप्प्याने हा विषाणू काहीशी माघार घेवू लागला. ऑक्टोंबरमध्ये प्रादुर्भावात मोठी घट होवून शहरातील 209 जणांसह एकूण 1041 जणांना कोविडची बाधा झाली. मात्र ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यापासून शहरी रुग्णसंख्येला ओहोटी लागण्यासोबतच एकूण रुग्णसंख्येतही मोठी घट दिसू लागली. मात्र गणेशोत्सवाचा दांडगा अनुभव असतांनाही उत्सवप्रिय संगमनेरकरांनी या अदृष्य शत्रूकडे दुर्लक्ष केले आणि दिवाळीच्या सणासाठी ओस पडलेल्या बाजारपेठांमध्ये मुंग्याप्रमाणे माणसं वावरु लागली. त्यामुळे 16 नोव्हेंबरपासून ओहोटीचे रुपांतर भरतीत होवून शहरातील 261 आणि ग्रामीण भागातील 647 असे एकूण 908 नागरिक कोविडच्या संसर्गात अडकले.
दिवाळीनंतर वाढलेली रुग्णगती डिसेंबरच्या पहिल्या पंधरवड्यापर्यंत टिकून राहील्याने हा महिनाही कोविड बाधितांचा विक्रम करणारा ठरेल असेच चित्र निर्माण झाले. मात्र सुदैवाने दुसर्या पंधरवड्यापासून रुग्णसंख्या घटू लागली आणि महिना संपता संपता शहरातील 198 जणांसह तालुक्यातील एकूण 816 जणांना संक्रमित करीत कोविडचा प्रादुर्भाव घेवून उगवलेल्या वर्षाची सांगता झाली. या नऊ महिन्यांच्या कालावधीत शहरी भागातून 1 हजार 631 आणि ग्रामीण भागातून 4 हजार 383 असे एकूण 6 हजार 14 नागरिक बाधित झाले. दुर्दैवाने या धांदलीत तालुक्यातील 47 नागरिकांना आपला जीवही गमवावा लागला. वर्ष सरतासरता कोविडचा प्रादुर्भाव नियंत्रणात येण्यासोबतच कोविडवरील लसही उपलब्ध झाल्याच्या वार्ता धडकल्याने वेदनासोबत घेवून उगवलेले वर्ष दिलासा देवून मावळले, मात्र जाताजाताही 21 जणांना संक्रमित करुन गेले.
गुरुवारी (ता.31) प्राप्त झालेल्या अहवालातून शहरातील पाच जणांसह एकूण 21 जणांना संक्रमण झाल्याचे समोर आले. त्यामुळे तालुक्यातील बाधितांची संख्या सहा हजारांच्या पार गेली. वर्ष अखेरीस प्राप्त झालेल्या या अहवालातून शहरातील कुंभार गल्लीतील 32 वर्षीय तरुण, जनता नगरमधील 38 वर्षीय महिला आणि संगमनेर असा पत्ता असलेल्या 65 वर्षीय ज्येष्ठ नागरिकासह 32 व 23 वर्षीय तरुणांसह ग्रामीण भागातील झोळे येथील 50 वर्षीय महिला, 28 वर्षीय तरुण व 20 वर्षीय तरुणी, चंदनापुरीतील 40 वर्षीय महिला व 21 वर्षीय तरुण, मनोलीतील 70, 40 व 20 वर्षीय महिलांसह 57 वर्षीय इसम व 25 वर्षीय तरुण, जवळे कडलग मधील 54 वर्षीय इसम, राजापूरमधील 30 वर्षीय तरुण, घुलेवाडीतील 26 वर्षीय तरुण, वडगाव पानमधील 36 वर्षीय तरुण, अंभोरे येथील 18 वर्षीय तरुणी व निळवंडे येथील 45 वर्षीय महिलेला संक्रमित झाले. त्यामुळे तालुका सहा हजारांच्या पल्याड जावून 6 हजार 14 वर जावून पोहोचला आहे.
संगमनेर तालुक्याची एकूण लोकसंख्या पाच लाखांच्या आसपास आहे. इतक्या मोठ्या लोकसंख्येत सहा हजार बाधित रुग्ण आढळणे तशी सामान्य बाब आहे. यामागे अहोरात्र परिश्रम घेणार्या आरोग्यदूतांसह पालिकेतील स्वच्छतादूत, पोलीस यंत्रणेतील सर्वच घटक, पंचायत समितीतील आशा सेविका आणि कर्मचारी यांच्यासह या सर्वांवर नियंत्रण ठेवणारे महसुल विभागातील वरीष्ठ अधिकारी, खांद्याला खांदा देवून काम करणारे कर्मचारी, असंख्य सामाजिक संस्था आणि संघटना, आणि प्रशासनाला बळ देण्यासाठी पुढे आलेले दानशूर संगमनेरकर नागरिक या सर्वांची इतिहास नक्कीच दखल घेईल.