कुख्यात मुल्ला कटर टोळीविरुद्ध मोक्का न्यायालयात दोषारोपपत्र दाखल पोलीस उपाधीक्षक संदीप मिटके यांच्यासह पथकाची विशेष कामगिरी
नायक वृत्तसेवा, श्रीरामपूर
श्रीरामपूर शहर पोलिसांत कुख्यात मुल्ला कटर टोळीवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मोक्का) अंतर्गत कारवाई करण्यात आली होती. त्यानंतर आता तपासी अधिकारी तथा श्रीरामपूर भागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके यांनी या टोळीविरुद्ध मोक्का न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले आहे.
मुल्ला कटर टोळीचा प्रमुख इम्रान यूसुफ कुरेशी उर्फ मुल्ला कटर (वय 35, रा. श्रीरामपूर) हा शहरात कायम वास्तव्यास आहे. त्याच्यासह टोळीतील इतर सदस्यांनी वेळोवेळी एकत्र येऊन संघटितपणे मालमत्ता विषयक, शरीराविरुद्ध, महिला अत्याचार संबंधी गुन्हे केल्याचे उघड झाले आहे. मुल्ला कटर हा कोणत्याही प्रकारचा कामधंदा करीत नसून केवळ बळाचा वापर करून आर्थिक फायदा मिळविण्याकरिता टोळीतील साथीदारांसह श्रीरामपूर शहर परिसरात अत्यंत गंभीर स्वरूपाचे गुन्हे करत असतो. त्यामुळे टोळीप्रमुख व टोळी सदस्यांविषयी सर्वसामान्य नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
शहरातील पीडितेवर या आरोपींनी सामूहिक बलात्कार करून तिला पांढरी पूल येथे टोळी सदस्य बाबा चेंडवाल यास विक्री केली. टोळी सदस्य बाबा चेंडवाल याने तिच्यावर बळजबरीने अत्याचार केले व वेश्या व्यवसाय करण्यास भाग पाडले. तसेच टोळीप्रमुख मुल्ला कटर, बाबा चेंडवाल, पप्पू उर्फ प्रशांत दादासाहेब गोरे यांनी पीडितेची शेवगाव येथे मीना मुसवत हिच्या कुंटणखान्यात विक्री केली. सदर गुन्ह्यात महिला आरोपी सुमन मधुकर पगारे व सचिन मधुकर पगारे यांनी मदत केल्याचे तसेच वेश्या व्यवसाय करून मिळणार्या पैशांवर उदरनिर्वाह केल्याचे निष्पन्न झाल्याने तपासी अधिकारी संदीप मिटके यांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंध अधिनियम 1999 चे कलम 3(1),(2),3(2),3(4) प्रमाणे मोक्का कायद्यान्वये कलमवाढ करून त्या अनुषंगाने सखोल तपास केला आणि अप्पर पोलीस महासंचालक (कायदा व सुव्यवस्था) यांच्या मंजुरीनंतर विशेष मोक्का न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले आहे.
सदर कारवाई नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. बी. जी. शेखर पाटील, पोलीस अधीक्षक राकेश ओला, अप्पर पोलीस अधीक्षिका स्वाती भोर यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके, पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी, सहायक पोलीस निरीक्षक जीवन बोरसे, उपनिरीक्षक समाधान सुरवडे, महिला पोलीस नाईक अश्विनी पवार, पोलीस नाईक संतोष दरेकर, पोलीस शिपाई रवींद्र माळी, विलास उकिरडे यांनी केली.