गुलाबी थंडीसह दाट धुक्याची कोपरगावकरांना अनुभूती थंडीपासून वाचण्यासाठी अनेक ठिकाणी शेकोटीही पेटल्या


नायक वृत्तसेवा, कोपरगाव
गुलाबी थंडी आणि दाट धुके असे मनमोहक वातावरण कोपरगावकरांनी सोमवारी (ता.30) अनुभवले. वातावरणात गारवा वाढल्यामुळे थंडीपासून बचावासाठी शहरात नागरिकांनी ठिकठिकाणी शेकोट्या पेटविल्या होत्या. कोपरगाव शहरासह टाकळी, ब्राम्हणगाव, रवंदा, धामोरी, चासनळी, येसगाव, उक्कडगाव, शिरसगावसह संपूर्ण तालुक्यात धुक्यामुळे सूर्यदर्शन झाले नाही.

गेल्या दोन ते तीन दिवसांपासून कोपरगाव शहरासह परिसरातील उपनगरांमध्ये थंडीची तीव्रता वाढत आहे. सोमवारी तर नागरिकांनी गुलाबी थंडीसोबतच दाट धुके व दवबिंदू अशा मनमोहक वातावरणाचा अनुभव घेतला. पहाटेपासूनच सगळीकडे धुक्याची चादर पसरली होती. धुक्यामुळे शहरातील रस्तेसुद्धा दिसत नव्हते. वाहनचालकांना रस्त्यांचा अंदाज येत नसल्याने नगर-मनमाड, नागपूर-मुंबई अशा प्रमुख महामार्गांवरील वाहतूक संथगतीने सुरू होती. पंधरा ते वीस फुटांवरील घरे, वाहनेही धुक्यामुळे दिसत नव्हती. त्यामुळे वाहनांचे दिवे सुरू ठेवण्याशिवाय चालकांसमोर पर्याय नव्हता. उशिरापर्यंत दाट धुक्याचा अंमल असल्यामुळे सकाळी उशिरापर्यंत सूर्यदर्शन झाले नाही. कडाक्याच्या थंडीपासून वाचण्यासाठी अनेक ठिकाणी शेकोटी पेटवल्याचे चित्र दिसत होते; तसेच वाढत्या थंडीमुळे नागरिकांना उबदार कपड्यांचा आधार घ्यावा लागत आहे.


कोपरगाव शहरामध्ये सकाळी जॉगिंग पार्कमध्ये, मोकळ्या मैदानांवर फिरण्यासाठी जाणार्‍यांची संख्या मोठी आहे. त्यातच दाट धुक्यामुळे वातावरण आल्हाददायक बनले होते. मात्र, धुक्यामुळे जवळचे दिसत नसल्यामुळे फिरण्यासाठी आलेले अनेकजण मोबाइल टॉर्चचा आधार घेताना दिसत होते. उत्साही नागरिकांनी धुक्यात फोटोसेशन केले. मात्र यामुळे रब्बी पिकांना फटका बसण्याची शक्यता आहे. हरभरा, ज्वारी व गहू पिकाला धुके नुकसानकारक असल्याचे कृषीतज्ज्ञांचे मत आहे.

Visits: 13 Today: 1 Total: 112932

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *