घोडेगावच्या शिक्षकांनी शाळेतच उभारलं वाचनालय! लवकरच होणार लोकार्पण; वाचनालयाला पुस्तके देण्याचे आवाहन

नायक वृत्तसेवा, नेवासा
मराठी भाषेचं काही खरं नाही… हे पालुपद, ज्यांना भाषेसाठी काही करायचं नाही त्यांच्याच तोंडून ऐकायला मिळतं. आपलं प्रेम मराठी पाट्या वगैरेंपुरतेच सीमित असतं. तुम्ही सध्या काय वाचताय किंवा किती पुस्तकं तुमच्या संग्रहात आहेत, हे प्रश्न अडचणीत टाकून आपल्या भाषाप्रेमाचा बुरखा फाडतात. दुसरं म्हणजे, शिक्षक, प्राध्यापकांनीच वाचलं पाहिजे, असाही काही जण हेटाळणीचा सूर लावतात. एकमेकांना दूषणे देण्यातच धन्यता मानली जाते. हा नकारार्थी सूर असला, तरी घोडेगावच्या (ता. नेवासा) शाळेत शिक्षकांनीच स्वतःसाठी वाचनालय सुरू केलं आहे. लवकरच त्याचे लोकार्पण होत आहे.

या संकल्पनेच्या मागे साहित्यिक, शिक्षक नेते डॉ. संजय कळमकर. ‘कुसुमाग्रज शिक्षक वाचनालय’ असं त्याचं नामकरण करण्यात आलं आहे. डॉ. कळमकर हे शिक्षक म्हणून घोडेगाव केंद्रात कार्यरत आहे. साहजिकच, तेथील शिक्षकांना साहित्याची गोडी लागली. ते बैठकीत साहित्यावर चर्चा करतात. पुस्तकांच्या वाचनाचे वेड आहे; पण दर्जेदार पुस्तके उपलब्ध होत नाहीत, अशी खंत काही शिक्षिकांनी व्यक्त केली. यातून केंद्रातील मध्यवर्ती ठिकाणी फक्त शिक्षकांसाठी वाचनालय उभे करण्याची कल्पना पुढे आली. डॉ. कळमकर यांनी आवाहन करताच केंद्रातील सर्व शिक्षक-शिक्षिकांनी उत्स्फूर्तपणे पन्नास हजार रुपये जमा केले. त्यातून उत्तम ग्रंथांची खरेदी झाली. सर्व शिक्षकांनी एकत्र येत शाळेतील एक छोटीशी खोली सुसज्ज केली. दर्शनी भिंतीवर मराठीतील ज्ञानपीठ पुरस्कारप्राप्त लेखक वि. स. खांडेकर, वि. वा. शिरवाडकर, विंदा करंदीकर, भालचंद्र नेमाडे यांच्या प्रतिमा लावल्या. भिंती शांता शेळके, पु. ल. देशपांडे, आचार्य अत्रे, रंगनाथ पठारे अशा मराठी सारस्वतांच्या प्रतिमेने, तसेच बालकवी, बहिणाबाई यांच्या साहित्यिक सुवचनांनी समृद्ध झालेल्या दिसतात. शिक्षकांनी एकत्र येऊन स्वबळावर साकारलेले राज्यातील हे पहिलेच वाचनालय आहे. वाचनालयाचे व्यवस्थापन घोडेगाव शाळेतील शिक्षक विक्रम बोरुडे सांभाळणार आहेत.

या वाचनालयाचे अनुकरण जिल्ह्यातील अनेक केंद्रांत होईल, याची मला खात्री आहे. ही वाचनचळवळ राज्यभर पसरावी. त्यासाठी मार्गदर्शन करण्याची आमची तयारी आहे. सुरवातीला निधी गोळा करून पुस्तके आणावीत. वाढदिवस, लग्न अथवा नातलगांच्या स्मृतीप्रित्यर्थ इतर काही खर्च करण्यापेक्षा वाचनालयाला पुस्तके द्यावीत.
– डॉ. संजय कळमकर (साहित्यिक, शिक्षक)
