कोणत्याही निधीतून पैसे द्या पण ‘पूल’ बांधा! शिवसेनेच्या माजी नगरसेविकेचे शिर्डीच्या खासदारांना साकडे

नायक वृत्तसेवा, संगमनेर
गेल्या तीन महिन्यांपासून प्रवरा परिसरात राहणारे असंख्य नागरिक व विद्यार्थी तुटलेल्या पुलामूळे त्रस्त झाले असून सदरील पुलाची दुरुस्ती होत नसल्याने त्यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. सध्या पालिकेत प्रशासकांचे राज्य असल्याने तेथून न्याय मिळण्याची अपेक्षा नसल्याने आपणच या विषयात लक्ष घालावे व कोणत्याही योजनेतील पैसा या पुलाच्या दुरुस्तीसाठी वापरावा, पण आमची अडचण सोडवावी असे साकडेच साईनगर परिसरातील रहिवाशी आणि शिवसेनेच्या माजी नगरसेविका अल्पना तांबे यांनी शिर्डीच्या खासदारांना घातले आहे. याबाबत आपण मुख्यमंत्र्यांशी बोलू अशी ग्वाही त्यांनी दिली आहे.

मागील ऑक्टोबरमध्ये संगमनेर शहर व प्रवरा परिसराला जोडणारा म्हाळुंगी नदीवरील पूल स्वामी समर्थ मंदिराच्या बाजूने खचला होता. सदरची बाबत पालिकेच्या पाणी पुरवठा विभागातील कर्मचार्यांच्या निदर्शनास आल्यानंतर पालिकेने सदरील पुलाचा वाहतुकीसाठी होणारा वापर पूर्णतः बंद केला आहे. त्यामुहे सुरुवातीच्या काही दिवस साईनगर, हिरेमळा, पंपींग स्टेशन या परिसरात राहणार्या नागरिकांसह सराफ विद्यालय व ओहरा कनिष्ठ महाविद्यालयात शिक्षण घेणार्या विद्यार्थ्यांना मोठा हेलपाटा मारावा लागत होता.

त्यावर उपाय म्हणून पालिका प्रशासनाने यंदाच्या पावसाळ्यात वाहून गेलेला याच परिसरातील कच्चा पूल पुन्हा सिमेंटचे पाईप टाकून तयार केला व त्या भागातील नागरिकांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला. मात्र या साईनगर, संतोषीमाता मंदिराच्या परिसरात राहणार्या नागरिकांना या पुलावरुनही लांबचाच फटका पडू लागल्याने खचलेल्या पुलाची तत्काळ दुरुस्ती करण्याची मागणी होवू लागली. मात्र सध्या पालिकेत प्रशासकांचे राज्य असल्याने व त्यांनाही मर्यादा असल्याने गेल्या तीन महिन्यांपासून नागरिकांकडून वारंवार मागणी होवूनही या पुलाचे काम झालेले नाही. त्यामुळे तेथील नागरिकांनी आता शिर्डीचे खासगदार सदाशिव लोखंडे यांना साकडे घातले आहे. साईनगरमध्ये राहणार्या माजी नगरसेविका अल्पना तांबे यांनी परिसरातील काही महिलांसह त्यांची भेट घेत आपल्या मागणीचे निवेदन त्यांना सुपूर्द केले. त्यातून नागरिकांचे व विद्यार्थ्यांचे दररोज होणारे हाल त्यांच्या निदर्शनास आणून देण्यासह सदरील पुलाच्या दुरुस्तीसाठी कोणत्याही शासकीय योजनेतून निधी द्या, मात्र या पुलाचे काम तत्काळ करा अशी मागणी त्यांच्याकडे करण्यात आली आहे.
