ठेकेदाराचे बिल देण्यासाठी खात्यातून पैसेच काढता येईना! शेंडेवाडीच्या सरपंचासह सदस्यांचे जिल्हा परिषदेसमोर उपोषण


नायक वृत्तसेवा, संगमनेर
केंद्र सरकारकडून 15 व्या वित्त आयोगाचा निधी ग्रामपंचायत खात्यात जमा झाला. त्यावर ग्रामपंचायतीने आराखडा तयार करून कामेही केली. परंतु प्रत्यक्ष ठेकेदाराचे बिल अदा करायची वेळ आली तर ते पैसेच काढता येईना. जिल्हा परिषदेकडे पाठपुरावा करूनही प्रश्न सुटेना म्हणून शेंडेवाडी (ता.संगमनेर) ग्रामपंचायत सदस्यांना उपोषणाचा मार्ग धरावा लागला आहे.

शेंडेवाडीचे सरपंच, सर्व सदस्य, तसेच ग्रामस्थांनी गुरुवारी (ता.19) जिल्हा परिषदेसमोर उपोषण सुरू केले आहे. याबाबत पदाधिकार्‍यांनी निवेदनात म्हटले आहे की, शेंडेवाडी ग्रामपंचायतची स्थापना नोव्हेंबर 2019 मध्ये झाली असून निवडणूक होऊन ग्रामपंचायत कार्यकारिणीने 11 फेब्रवारी 2021 रोजी पदभार घेतला. गेल्या दोन वर्षात ग्रामपंचायतीने लोकसहभागातून किंवा अन्य निधीमधून चांगली कामे केली आहे.

गाव एक विचाराचे असल्याने विकासाच्यादृष्टीने सर्व सदस्य, ग्रामस्थ सर्वांना बरोबर घेऊन कामे करत आहे. अशाच 15 व्या वित्त आयोग योजनेमधून ग्रामपंचायतीच्या खात्यात दोन वर्षाची रक्कम 14 लाख 59 हजार 308 रुपये जमा झाली. त्यामुळे रीतसर त्याचा आराखडा मंजूर करून त्यानुसार चार कामे पूर्ण देखील झाली. परंतु काही तांत्रिक अडचणीमुळे ही रक्कम पीएफएमएसद्वारे वितरित करता येत नाही. संगमनेर पंचायत समितीद्वारा जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाकडे वेळोवेळी पाठपुरावा केला, परंतु समाधान झाले नाही. आज होईल, उद्या होईल असे उत्तर मिळाले. अखेर सरपंचासह, सर्व ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थांनी मिळून प्रश्न मार्गी लागेपर्यंत जिल्हा परिषदेसमोर आंदोलन सुरू केले आहे. दरम्यान, ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश शिंदे यांनी या पदाधिकार्‍यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. तांत्रिक अडचणीमुळे हा प्रकार होत आहे. याबाबत दिल्लीला एनआयसीच्या कार्यालयाशी बोललो आहे. लवकरच मार्ग निघेल, असा विश्वास त्यांनी दिला. मात्र, उपोषणकर्ते उपोषणावर ठाम होते.

Visits: 78 Today: 3 Total: 1113700

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *