प्रदूषणविरहित ‘सिग्नल झोन’ उपकरणास प्रथम पारितोषिक उपशिक्षिका वृषाली कडलग यांच्या संकल्पनेचे होतेय कौतुक

नायक वृत्तसेवा, संगमनेर
तालुक्यातील चिखली येथे संपन्न झालेल्या 47 व्या तालुकास्तरीय विज्ञान गणित प्रदर्शनात प्राथमिक शिक्षक गटात जिल्हा परिषद देशमुख मळा धांदरफळ शाळेच्या उपशिक्षिका वृषाली कडलग यांच्या प्रदूषणविरहित ‘सिग्नल झोन’ या उपकरणास प्रथम पारितोषिक प्राप्त झाले आहे.

सहावी ते आठवी आणि नववी ते बारावी असे दोन गट त्याचबरोबर प्राथमिक शिक्षक गट, माध्यमिक शिक्षक गट, परिचर गट अशा विविध गटांमधून शालेय साहित्यांची स्पर्धा झाली. संगमनेर तालुक्यातील विविध शाळांतील विद्यार्थी, शिक्षक व परिचारक यांनी या प्रदर्शनात सहभाग नोंदवला. प्राथमिक शिक्षक गटात कार्बन डायऑक्साइड वायूचे सिग्नल परिसरातील नियंत्रण या विषयावरील उपकरणाला प्रथम क्रमांक मिळाला. सदरचे उपकरण उपशिक्षिका वृषाली कडलग यांनी तयार केले आहे. सद्यस्थितीत सर्व जगभर वायू प्रदूषणाची समस्या भेडसावत आहे. विशेषतः सिग्नल जेथे आहेत, त्याठिकाणी गाड्या जेव्हा थांबतात, तेव्हा बर्याच गाड्या सुरू अवस्थेत असतात. अशावेळी त्या परिसरामध्ये एकाचवेळी जास्तीत जास्त कार्बन मोनॉक्साइड हा बाहेर पडतो. त्याचा त्रास आजूबाजूच्या सर्व लोकांना होत असतो. हा कार्बन मोनॉक्साइड आणि इतर घातक वायू यांना सिग्नलच्या वरच्या बाजूला असलेल्या पाईपमधून पाण्याच्या दाबाने विरघळवले जाते आणि विरघळलेला कार्बन आणि इतर वायू सिग्नलच्या खाली जमिनीत एकत्र केले जातात. त्यानंतर त्याची विल्हेवाट लावली जाते. सदरचे हे उपकरण सद्यस्थितीत जपानमध्ये वापरले जाते.

अर्थात प्रदूषण कमी करण्याचा हा एक उत्तम आणि सोपा पर्याय आहे आणि हे उपकरण भारतात वापरले गेल्यास वायू प्रदूषणाची समस्या मोठ्या प्रमाणात सुटेल असे वृषाली कडलग यांचे मत आहे. वायू प्रदूषणामुळे ग्लोबल वॉर्मिंग वाढत असून त्यामूळे पर्यावरणात मोठ्या प्रमाणात बदलही होत आहेत. अवेळी पाऊस पडतो आहे, पूर येत आहेत. त्या समस्या सोडविण्यासाठी प्रदूषण रोखले पाहिजे. यासाठी हे उपकरण महत्वपूर्ण ठरेल. अनेक विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी या उपकरणाची माहिती घेतली आणि कौतुक केले. गटविकास अधिकारी अनिल नागणे, गटशिक्षणाधिकारी सुवर्णा फटांगरे यांनीही या उपकरणाची माहिती घेतली व कौतुक केले. या प्रदर्शनाच्या यशस्वीतेसाठी गणित- विज्ञान अध्यापक मंडळ, प्रदर्शन संयोजन समिती, माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, ग्रामस्थ देणगीदार, पालक, विद्यार्थी यांनी मोलाचे सहकार्य केले.

सदर पारितोषिक वितरण माजी जिल्हाधिकारी देशमुख, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य रामहरी कातोरे, संगमनेर साखर कारखान्याचे उपाध्यक्ष संतोष हासे, गटशिक्षणाधिकारी सुवर्णा फटांगरे, दत्तात्रय आरोटे, संगमनेर तालुका गणित अध्यापक संघाचे अध्यक्ष संतोष बैरागी, संगमनेर तालुका विज्ञान अध्यापक संघाचे अध्यक्ष शशांक खोजे आणि मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. याबद्दल स्वदेश उद्योग समूहाचे संस्थापक बाळासाहेब देशमाने, उद्योगपती बाबू डेरे, विस्ताराधिकारी मंदा दुर्गुडे, केंद्रप्रमुख दशरथ धादवड, मुख्याध्यापक हनुमंत अडांगळे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रमेश देशमुख यांनी अभिनंदन केले आहे.
