अतिदुर्गम कुमशेतमध्ये प्रशासकीय सेवा ठप्प! गावकर्यांची पुणे किंवा ठाणे जिल्ह्यात गावाच्या समावेशाची मागणी
नायक वृत्तसेवा, अकोले
तालुक्यातील कुमशेत प्रशासकीय सेवांचा अक्षरशः बोजवारा उडाला आहे. सद्यस्थितीत गावाला ना कामगार तलाठी ना ग्रामसेवक आहे. त्यामुळे तेथील विकासकामे ठप्प झाली आहेत. शासनाच्या कोणत्याच योजनांचा लाभ मिळत नसल्याने जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या गावातील ग्रामस्थांकडून आमच्या गावाचा पुणे नाहीतर ठाणे जिल्ह्यात समावेश करावा, अशी मागणी गटविकास अधिकार्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
अकोले तालुक्यातील अतिदुर्गम व जिल्ह्याचे शेवटचे टोक असलेल्या कुमशेत व तेथील सात वाड्या मागील दोन वर्षांपासून ग्रामसेवकांच्या संगीत खुर्चीमुळे वैतागल्या असून, स्थानिक रहिवासी दाखला, विद्यार्थ्यांना लागणारे शालेय दाखले मिळणे अशक्य झाले आहे. हे गाव पेसा अंतर्गत असून, निधीची कमतरता नाही. मात्र तो खर्च करण्यासाठी ग्रामसेवक नसल्यामुळे विकासकामे रखडली आहेत. गावातील रस्ते, गटारे, जिल्हा परिषद शाळेची दुरुस्ती, विजेचा प्रश्न प्रलंबित असून, गावाला सरपंच, सदस्य आहेत. पण सरकारी दप्तर लिहिण्यासाठी व बँकेतून पैसे काढण्यासाठी ग्रामसेवक नाही.
यापूर्वी एका महिला ग्रामसेविकेची नियुक्ती करण्यात आली होती. मात्र त्यांनी रस्ता व इतर अडचणी पाहून तेथून काढता पाय घेतला. मागील दोन वर्षांपासून ही स्थिती आहे. ग्रामसेवक नाही. त्यातच तलाठी देखील आठवड्यातून एखादा दिवस आला तर येतो, नाही तर ग्रामस्थांना त्याला शोधण्यासाठी तालुक्याच्या गावाला जावे लागते. ठाणे व पुणे जिल्ह्यांच्या सरहद्दीवर असलेल्या या गावातील ग्रामस्थांची विकासकामे होत नसतील, तर आम्हाला ठाणे किंवा पुणे जिल्ह्यात वर्ग करा. मोबाईल लागत नाही, रस्ता खराब झाला, स्वस्त धान्य वेळेवर मिळत नाही, वीज काही वाड्यांमध्ये पोहचली नाही. त्यामुळे विविध अडचणींना सामोरे जावे लागत आहे. सरपंच सयाजी अस्वले, संतू अस्वले, बाबुराव धिंदळे, उपसरपंच गोविंद मधे, ज्ञानेश्वर अस्वले, गोविंद धिंदळे, वनिता बारामते, चिंधाबाई अस्वले, रंजना अस्वले, वेणूबाई अस्वले, ढवळा अस्वले आपल्या व्यथा गटविकास अधिकार्यांकडे मांडल्या.
गेल्या वर्षभरापासून ग्रामसेवक नसल्याने आट्यापाट्याचा खेळ सुरू आहे. तलाठी आठवड्यातून एक दिवस येतात. त्यामुळे गावातील विकासकामांना खीळ बसली आहे. प्रशासनाने तातडीने या प्रकरणात लक्ष घालून आमचा प्रश्न मार्गी लावावा.
– सयाजी अस्वले (सरपंच, कुमशेत)