बनावट मृत्यूपत्र तयार करुन मालमत्ता हडपण्याचा प्रयत्न! सावत्र आईसह आठजणांवर गुन्हा; निमगांव जाळीतील शिक्षणसम्राटांच्या घरातील घटना..


नायक वृत्तसेवा, संगमनेर
मुळच्या संगमनेर तालुक्यातील निमगाव जाळीच्या मात्र व्यवसायानिमित्त मुंबईत स्थिरावलेल्या दिवंगत शिक्षणसम्राट शिवाजीराव जोंधळे यांच्या मृत्यूनंतर आता त्यांच्या स्थावर आणि जंगम मालमत्तेवरुन वाद निर्माण झाले आहेत. मृत्यूपूर्वी जोंधळे यांनी तयार केलेल्या मृत्यूपत्रात त्यांनी आपली स्थावर व जंगम मालमत्ता त्यांच्या प्रेयसीकडून जन्मलेल्या मुलीच्या नावे केली होती. ही गोष्ट समजल्यानंतर त्यांच्या पहिल्या पत्नीसह दोघा मुलांनी वडिलांच्या नावाने बनावट मृत्यूपत्र तयार करुन घेतले, शिवाय त्याची नोटरीही नोंदवून घेतली. जोंधळे यांच्या संगमनेरातील मालमत्तेच्या परस्पर फेरफार नोंदी केल्या गेल्या. मुंबईतील शिक्षणसंस्थाही बनावट कागदपत्रांच्या आधारे ताब्यात घेण्याचे प्रयत्न झाले. या प्रकरणी वर्षा देशमुख यांनी मुंबईच्या आझादनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी दिवंगत शिक्षणसम्राट शिवाजीराव जोंधळे यांच्या पत्नीसह दोन मुले, मृत्यूपत्र नोंदवणारे वकिल, नोटरी, खोटे प्रमाणपत्र देणारे डॉक्टर आणि दोघा साक्षीदारांसह आठजणांवर संगनमताने फसवणूक करण्यासह बनावट दस्तऐवज, मृत्यूपत्र तयार करणे, ठकबाजीच्या इराद्याने त्याचा वापर करणे अशा वेगवेगळ्या कलमांन्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात दोषसिद्धी झाल्यास दहा वर्षांपर्यंतच्या कैदेची शिक्षा होवू शकते.


फार्मसी, पॉलिटेक्निक, इंजिनिअरिंग, व्यवस्थापन आणि पदव्यूत्तर व्यावसायिक शिक्षण देणार्‍या मुंबईतील शिवाजीराव जोंधळे नॉलेज सिटीचे संस्थापक असलेले निमगांव जाळीचे शिक्षणसम्राट शिवाजीराव जोंधळे यांचा 1976 साली विवाह झाला होता. पहिल्या पत्नीपासून त्यांना चार अपत्ये असून त्यात सागर उर्फ महेश, देवेंद्र ही दोन मुले आहेत, तर दोघी मुली. त्यांचे पत्नीशी पटत नसल्याने 1990 पासून ते मुंबईतील गीता खरे यांच्यासोबतच राहत होते. त्यातून 1992 साली त्यांना एक मुलगीही झाली. दोन वर्षांपूर्वी तपासणीत त्यांना कर्करोग झाल्याचे समोर आल्यानंतर त्यांनी आपल्या हयातीतच मृत्यूपत्र तयार करुन घेत आपली सगळी स्थावर व जंगम मालमत्ता मुलगी वर्षाच्या नावे केली. याबाबतच मुंबईतील दिवाणी न्यायालयानेही शिवाजीराव जोंधळे यांची अधिकृत वारसदार म्हणून त्यांच्या मुलीचा दावा वैध ठरवला होता.


गेल्या जूनमध्ये वर्षा देशमुख (जोंधळे) यांच्या ई-मेल खात्यावर एक मेल प्राप्त झाला. त्यात शिवाजीराव जोंधळे यांच्या पत्नी व मुलांकडून मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेली याचिका पाठवण्यात आली होती. त्या याचिकेला संलग्न केलेली कागदपत्रे बघत असताना त्यातील 13 मार्च 2024 रोजीचे मृत्यूपत्र पाहून त्यांना संशय आला. त्यानंतर तीन महिन्यांनी जूनमध्ये संगमनेरच्या महसूल विभागाकडून त्यांच्या मोबाईलवर एकामागून एक तीन मेसेज प्राप्त झाले. त्यातून संगमनेरातील जमिनींच्या फेरफारबाबत काही अडचण असल्यास हरकत नोंदवण्यास सांगण्यात आले. त्यावर वर्षा देशमुख यांनी संगमनेरात येवून हरकत नोंदवली व जोडलेल्या मृत्यूपत्राच्या सत्यतेसाठी त्यांनी खासगी प्रयोगशाळेकडून त्याची तपासणी केली असता त्या मृत्यूपत्रात शिवाजीराव जोंधळे यांच्या नावाने केलेल्या सह्या खोट्या असल्याचा दाखला मिळाला.


त्यासोबतच त्यांच्या मुलीने 13 मार्च रोजी शिवाजीराव जोंधळे कोठे-कोठे गेले होते याचे मोबाईल लोकेशनही त्यांनी काढले. त्यात कोठेही त्यांनी सदरील दस्त नोंदवण्यासाठी हजेरी लावल्याचे आढळून येत नाही. उलटपक्षी ते त्या दिवशी जेथे जेथे गेले त्या सर्व ठिकाणच्या उपस्थितीचे पुरावेही त्यांच्या लेकीने सोबत जोडले आहेत. हा बनावट दस्त करण्यासाठी सावत्र आई वैशाली यांच्यासह त्यांची दोन्ही मुलं सागर उर्फ महेश व देवेंद्र जोंधळे, खोटे मृत्यूपत्र तयार करुन देणारे वकिल अ‍ॅड. नीलेश मांडवकर, नोटरी वकिल टी.सी.कौशिक, ज्यांच्या दवाखान्यात शिवाजीराव कधीही गेले नाहीत अशा डॉ.अरुण भूते यांनी दिलेले फिटनेस सर्टिफिकेट, शिवाजीराव हजर नसतानाही ते हजर असल्याची साक्ष देणारे किशोर जोंधळे व चैतन्य बडवर अशा एकूण आठ जणांविरोधात तक्रार देण्यात आली आहे.


या आठही इसमांनी संगनमत करुन बनावट मृत्यूपत्र तयार केले, ते खरे असल्याचे भासवून त्याचा महसूल विभागात नोंद असलेल्या मालमत्तांमध्ये फेरफार करण्यासह मुंबई उच्च न्यायालयात दाखल याचिकेसाठीही त्याचा वापर केला यावरुन मुंबईच्या आझादनगर पोलिसांनी त्यांच्यावर भारतीय दंडसंहितेच्या कलम 120 (ब) संगनमत करुन गुन्हेगारी कट रचने, 465 बनावट दस्तऐवज तयार करणे, 467 बनावट मृत्यूपत्र तयार करणे, 468 ठकबाजीच्या इराद्याने त्याचा वापर करणे व 471 बनावट असल्याचे माहिती असूनही त्याचा अस्सल असल्याप्रमाणे वापर करणे अशा विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात दोषसिद्धी झाल्यास वरील सर्व आरोपींना दहा वर्षांपर्यंतची शिक्षा होवू शेकते.


मूळच्या निमगांव जाळीच्या मात्र आपले संपूर्ण राष्ट्रान मुंबईत उभारलेल्या शिक्षणसम्राट शिवाजीराव जोंधळे यांनी आपल्या मुंबईतील शिक्षण संस्थेसह सगळ्या स्थावर व जंगम मालमत्तेचा वारस म्हणून आपल्या प्रेययीपासून जन्माला आलेल्या मुलीच्या नावे केली आहे. हा प्रकार समोर आल्यानंतर त्यांच्या पत्नीसह मुलांनी सदरील मालमत्ता मिळावी यासाठी बनावट दस्तऐवज तयार करुन ती खरी असल्याचे भासवण्याचा प्रयत्न केला मात्र तो उघडा पडल्याने या सर्वांना आता मोठ्या अडचणींचा सामना करावा लागणार आहे.

Visits: 18 Today: 2 Total: 153002

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *