धोकादायक ऊस वाहतुकीबाबत ‘प्रहार’ने उठविला आवाज परिवहनसह कारखान्यांच्या अधिकार्‍यांना धरले धारेवर


नायक वृत्तसेवा, नेवासा
धोकादायक ऊस वाहतुकीबाबत प्रादेशिक परिवहनच्या कार्यालयात प्रहार पदाधिकार्‍यांसमवेत अधिकार्‍यांची बैठक नुकतीच प्रादेशिक कार्यालयात पार पडली. प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालयाने जबाबदारीने काम करावे असे आवाहन करत अधिकार्‍यांसह कारखान्यांच्या अधिकार्‍यांना चांगलेच धारेवर धरले.

अहमदनगर जिल्ह्यातील धोकादायक ऊस वाहतुकीबाबत अहमदनगर येथे प्रादेशिक परिवहन कार्यालयात प्रहार जिल्हाप्रमुख अभिजीत पोटे, पदाधिकारी, जिल्ह्यातील सर्व खासगी व सहकारी साखर कारखान्यांचे वाहतूक विभागाचे प्रमुख अधिकारी, प्रादेशिक साखर सहउपसंचालक लोखंडे, प्रादेशिक परिवहन अधिकारी उर्मिला पवार, वाहतूक पोलीस निरीक्षक वाघ बैठकीस उपस्थित होते.

धोकादायक ऊस वाहतुकीबाबत 14 डिसेंबरला प्रहारचे जिल्हाप्रमुख अभिजीत पोटे यांच्या नेतृत्वात श्रीरामपूर उपप्रादेशिक कार्यालयात ढोल बजाव आंदोलनाचा इशारा दिला होता. प्रादेशिक परिवहन अधिकारी उर्मिला पवार यांनी प्रादेशिक साखर सहसंचालक, साखर कारखानदाराचे वाहतूक विभागाचे प्रमुख, वाहतूक पोलीस निरीक्षक यांच्यासह 21 डिसेंबरला आंदोलन न करता आपण चर्चेतून मार्ग काढू असे विनंती पत्र दिल्यानंतर जिल्हाप्रमुख अभिजीत पोटे यांनी आंदोलन स्थगित करून अहमदनगर येथील प्रादेशिक परिवहन कार्यालयातील बैठकीला पदाधिकार्‍यांसह उपस्थिती लावली. या बैठकीत 50 टक्के कारखानदाराचे वाहतूक विभागाचे अधिकारी उपस्थित होते. प्रथम प्रहारने धोकादायक उस वाहतुकीबाबत आवाज उठवला म्हणून प्रादेशिक परिवहन अधिकारी उर्मिला पवार यांनी प्रहारच्या भूमिकेचे स्वागत केले.

अभिजीत पोटे यांनी सर्व कारखान्यांचे वाहतूक विभागाचे प्रमुख आणि प्रादेशिक सहउपसंचालक लोखंडे यांना तुम्ही संबंधित कारखान्यांना बैठकीची माहिती देऊन सुद्धा अर्ध्यापेक्षा कमी कारखाने बैठकीला उपस्थित झाले असल्याने यातून स्पष्ट दिसून येते. प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालयाचे या कारखानदारावर कुठलेही नियंत्रण राहिलेले नाही. तसेच प्रादेशिक परिवहन कार्यालयाने पत्रकार तसेच प्रसिद्धी माध्यमांना का कळवले नाही असा सवाल केला असता उपस्थित सर्व अधिकारी निरुत्तर झाले. साखर कारखाने सुरू होण्यापूर्वी प्रादेशिक साखर कार्यालयाने प्रादेशिक परिवहन अधिकार्‍यांच्या मदतीने कारखानदारांच्या वाहतूक विभागाला रस्ता सुरक्षेबाबत अवगत करणे गरजेचे असताना औपचारिक बैठका घेऊन आपली जबाबदारी झटकून टाकण्याचे काम करत असल्याचा आरोप केला.

साखर कारखानदार फक्त ऊस वाहतूकदार कारखान्याला दररोज गाडीची खेप टाकतो की नाही, गाडी जास्त भरून आणतो की नाही फक्त यावरच लक्ष देतात. नागरिकांच्या जीवाचे त्यांना काही देणे घेणे नाही. वाहनचालकांना कुठलीही व्यवस्था कारखाना कार्यस्थळावर उपलब्ध नाही. फक्त अर्थकारण महत्त्वाचे आहे. अपघाताला कुठलाही चेहरा नसतो. यामध्ये कारखान्याचा चेअरमन अथवा आमच्यासारखा सामान्य कार्यकर्ता सुद्धा या अपघाताचा केव्हाही बळी ठरू शकतो ही बाब सर्व साखर कारखान्यांच्या वाहतूक विभागाने गांभीर्याने घेणे गरजेचे असल्याचे पोटे म्हणाले.

Visits: 12 Today: 1 Total: 118076

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *