घारगावमध्ये गेल्या तीन दिवसांत सापडले चार मृत कावळे! पशु संवर्धन व वन विभाग सतर्क; मृत कावळा पाठविला पुणे प्रयोगशाळेत

नायक वृत्तसेवा, घारगाव
कोरोना विषाणूच्या संकटाशी सामना करत असतानाच आता देशभरात बर्ड फ्ल्यूचा उद्रेक झाला आहे. अनेक राज्यांत बर्ड फ्ल्यूचा शिरकाव झाल्याने शासनाने खबरदारी घेतली आहे. यामध्ये बदक, कोंबड्या, कावळे आणि इतर पक्ष्यांचा मोठ्या प्रमाणात मृत्यू होत असल्याने प्रशासन अधिक सतर्क झाले आहे. याचे लोन अहमदनगर जिल्ह्यातही पसरले आहे. संगमनेर तालुक्याच्या पठारभागातील घारगाव येथे दोन दिवसांपूर्वी तीन व मंगळवारी (ता.19) सकाळी एक कावळा मृतावस्थेत आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. सदर माहिती समजताच स्थानिक पशु संवर्धन व वन विभागाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत मृत कावळा पुणे येथील प्रयोगशाळेत पाठविला आहे. यामुळे अहवाल आल्यानंतरच मृत कावळ्याचा मृत्यू नेमका कशामुळे झाला हे स्पष्ट होणार आहे.

कोरोना विषाणूने अवघ्या जगभरात धुमाकूळ घालत अनेकांचा बळी घेतला आहे. हा विषाणू अतिशय भयंकर असल्याने टाळेबंदी घोषित करण्यात आली होती. यामुळे संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले आहे. आता कुठे उद्योगधंदे, व्यवसाय व जनजीवन सुरळीत होत असतानाच बर्ड फ्ल्यूचा उद्रेक झाला आहे. देशातील अनेक राज्यांत बर्ड फ्ल्यूने शिरकाव केल्याने तेथील प्रशासन अधिक सतर्क होऊन उपाययोजना केल्या आहेत. त्यानुसार कुक्कुटपालकांना आणि शेतकर्‍यांना मार्गदर्शक सूचना देऊन जागृती करण्यात येत आहे. अहमदनगर जिल्ह्यातही बर्ड फ्ल्यूच्या पार्श्वभूमीवर 78 पथकांची स्थापना करण्यात आलेली आहे. जेथे पक्षी मृतावस्थेत आढळून येत असेल त्याची माहिती तात्काळ प्रशासनाला कळवावी असे सूचित करण्यात आलेले आहे.

पाथर्डीसह जिल्ह्याच्या इतर तालुक्यातही मृत पक्षी आढळून येत असल्याचे समोर येत आहे. दोन दिवसांपूर्वी संगमनेर तालुक्याच्या पठारभागातील घारगाव येथे तीन मृत कावळे आढळले होते. त्यानंतर मंगळवारी पुन्हा एक कावळा मृतावस्थेत आढळल्याने प्रशासनाची एकच धावपळ उडाली आहे. याची माहिती मिळताच घारगावचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ.संतोष वाकचौरे यांनी घटनास्थळी धाव घेत मृत कावळा वन विभागाच्या स्वाधीन केला आहे. वन विभागाचे वन परिमंडळ अधिकारी रामदास थेटे यांनी हा कावळा पुणे येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविला आहे. तेथील अहवाल आल्यानंतरच कावळ्याचा मृत्यू नेमका कशामुळे झाला हे स्पष्ट होणार आहे. या अहवालाकडे वन व पशु संवर्धन विभागासह संपूर्ण पठारभागाचे लक्ष लागून आहे.

संगमनेरचे उपविभागीय वनाधिकारी गणेश झोळे, वन परिक्षेत्रपाल अधिकारी नीलेश आखाडे यांच्या मार्गदर्शनाखाली मृत कावळा हा पुणे येथील प्रयोगशाळेत मी (रामदास थेटे, वन परिमंडळ अधिकारी-घारगाव), वनरक्षक सुभाष धानापुणे हे तात्काळ घेऊन चाललो आहोत. तेथे तपासणी झाल्यानंतरच नेमके कारण स्पष्ट होणार आहे.
– रामदास थेटे (वन परिमंडळ अधिकारी-घारगाव)

Visits: 11 Today: 1 Total: 115768

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *