नागरिकांनी आरोग्यासंदर्भात खरी माहिती आरोग्य विभागाला द्यावी ः आ.काळे
नागरिकांनी आरोग्यासंदर्भात खरी माहिती आरोग्य विभागाला द्यावी ः आ.काळे
नायक वृत्तसेवा, कोपरगाव
मागील काही आठवड्यांपासून कोपरगाव तालुक्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असून ही वाढणारी संख्या चिंताजनक आहे. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारने सुरू केलेल्या ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहिमेच्या माध्यमातून सकारात्मक परिणाम पुढे आले आहेत. मात्र, नागरिकांनी आरोग्याविषयी दिलेल्या माहितीतून कोरोनाची सौम्य व तीव्र लक्षणे असणार्या नागरिकांच्या जास्तीत रॅपिड अँटीजेन टेस्ट करणे गरजेचे आहे. त्यामुळे शेवटच्या कोरोनाबाधित रुग्णापर्यंत सहजपणे पोहोचून कोपरगाव तालुका कोरोनामुक्त होईल. त्यासाठी नागरिकांनी तपासणीसाठी आलेल्या आरोग्य विभागाला आपल्या आरोग्यासंदर्भात खरी माहिती सांगावी, असे आवाहन आमदार आशुतोष काळे यांनी केले आहे.
कोपरगाव तहसील कार्यालयात सोमवारी (ता.5) तालुक्यात राबविण्यात येत असलेल्या ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहिमेचा आढावा आमदार काळे यांनी घेतला. या मोहिमेदरम्यान आशा गटप्रवर्तक, आशासेविका, आरोग्य सेविका व आरोग्य विभागाचे कर्मचारी अतिशय प्रामाणिकपणे आपले कर्तव्य पार पाडत असल्याबद्दल त्यांनी आमदार काळे यांनी कौतुक केले.