संगमनेरातील चोरट्यांना आता कोणाचेही भय राहिले नाही! कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर; घाटांवरुन पळविल्या जातात लोकांच्या बॅगा..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
गेल्या दोन वर्षात संगमनेर शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर झाल्याची एक नव्हे तर अनेक उदाहरणे समोर आली आहेत. संगमनेरच्या चोहोबाजूला अवैध व्यावसायिकांनी बस्तान बांधल्याने शहरातील गुन्हेगारी घटकांचा वावरही मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यातून गुन्हेगारी घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असून हाणामार्या, चोर्या या सारख्या घटना आता नियमित घडू लागल्या आहेत. तपासाच्या बाबतीत मात्र शहर पोलीस शून्य असल्याने गुन्हेगारी प्रवृत्तींचे मनोबल वाढीस लागले आहे. त्यामुळे अशा घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असून आतातर चोरीचे लोण थेट प्रवरा नदीच्या घाटांवर पोहोचले आहे. गेल्या काही दिवसांत नदीत पोहणार्यांच्या बॅगाच लांबविण्याचे प्रकार घडू लागले असून त्यातून चोरट्यांना कोणाचे भय आहे का? असा सवाल उपस्थित होवू लागला आहे.

सध्या भंडारदरा धरणातून सिंचनासाठीचे प्रदीर्घ आवर्तन सुरु आहे. भर उन्हाळ्यात शरीराची काहीली होत असताना नदी वाहती असल्याने सकाळ-संध्याकाळ नदीवर अबालवृद्धांची अंघोळीसाठी गर्दी दाटत आहे. दररोज सायंकाळच्या सुमारास तर विजयघाट ते गंगामाई परिसरापर्यंतच्या भागाला अक्षरशः जत्रेचे स्वरुप प्राप्त होत असल्याचे चित्र आहे. शेकडो नागरीक नदीत पोहण्याचा तर महिला, लहानमुले व तरुणी या परिसरात फिरण्याचा आनंद घेतांना दिसत आहे. प्रवराकाठी आज दिसणारे चित्र संगमनेरकरांसाठी नवीन नाही, दरवर्षीच्या उन्हाळी आवर्तनात अशाच प्रकारे प्रवरेचा काठ अबालवृद्धांनी दाटलेला असतो. मात्र आजवरच्या इतिहासात या परिसरात छेडछाड वगळता चोरीचे प्रकार घडल्याच्या घटना ऐकीवात नव्हत्या.

परंतु, आता या परिस्थितीत आमूलाग्र बदल झाला असून संगमनेर पोलिसांच्या निष्क्रियतेमुळे शहरातील कोणताही भाग चोरट्यांपासून सुरक्षित नसल्याचे वारंवार सिद्ध होत आहे. दरवर्षीचा अनुभव लक्षात घेता दैनिक नायकने आवर्तन सुरु होण्यापूर्वीच या सर्व गोष्टींवर प्रकाश टाकला होता. महिलांच्या छेडछाडीच्या प्रकारातून यापूर्वी जातीय तणावासारख्या गोष्टी घडल्या असल्याने पोलिसांनी उन्हाळी आवर्तनाच्या कालावधीत विजयघाट व गंगामाई घाट या नदीकाठाच्या दोन प्रवेशद्वारांवर पोलीस बंदोबस्त ठेवून अशा घटनांना पायबंद घालण्याची अपेक्षाही त्या वृत्तातून व्यक्त करण्यात आली होती. आजवर या कालावधीत पोलिसांकडून या सर्व गोष्टी घडत होत्या. मात्र सध्या शहर पोलीस ठाण्यात मनमानी कारभार सुरु असल्याने नागरी सुरक्षेबाबत पोलिसांना काहीएक घेणंदेणं नसल्याचे चित्र बघायला मिळत आहे. ही गोष्ट अधिक स्पष्ट करणारी गेल्या आठ दिवसांतील तिसरी घटना सोमवारी गंगामाई घाटावरुन समोर आली. अतिशय सुरक्षित आणि सतत मानवी वर्दळीने व्यापलेल्या या भागातील घाटावर एक विद्यार्थी अंघोळीसाठी आला. नेहमीप्रमाणे त्याने आपला मोबाईल, हेडफोन, घड्याळ, चष्मा व कपडे काढून बॅगेत ठेवले व तो अंघोळीसाठी पाण्यात उतरला. काहीवेळ पोहोण्याचा आनंद घेवून जेव्हा तो पुन्हा घाटावर आला तेव्हा त्याला धक्काच बसला. त्याने घाटावर ठेवलेली बॅग तेथून गायब झालेली होती, आसपास, इकडे-तिकडे सगळीकडे पाहूनही ती सापडत नसल्याने कोणीतरी ती लांबविल्याचे त्याच्या लक्षात आल्यानंतर त्याला रडूच कोसळले.

त्या बॅगेत त्याच्या अंगावर घालण्याच्या कापडांसह त्याचा मोबाईल, अन्य सर्व सामान व दुचाकीची चावीही चोरीला गेल्याने त्याची अवस्था बिकट बनली होती. यावेळी घाटावरील काहींनी त्याला त्याच्या वडीलांना फोन करुन कपडे व दुचाकीची दुसरी चावी घेवून बोलावण्याचा सल्ला देत स्वतःच्या मोबाईलवरुन त्याला फोन लावून दिला. त्यानेही घडला प्रकार रडतरडत सांगत आपल्या वडीलांना बोलावून घेतले. काही वेळाने त्या विद्यार्थ्याचे वडील दुसर्या दुचाकीवरुन सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास गंगामाई घाटावर पोहोचले. त्यांना पाहून तो लहानसा विद्यार्थी पुन्हा ओक्साबोक्सी रडू लागला. यावेळी त्याच्या वडीलांसह तेथे जमलेल्या अन्य नागरिकांनी त्याची समजूत काढली. वडीलांनी आणलेले कपडे परिधान केल्यानंतर त्यांनीच आणलेल्या दुचाकीच्या दुसर्या चावीचा वापर करीत अखेर आठच्या सुमारास तो विद्यार्थी आपल्या घरी परतला.

दोनच दिवसांपूर्वी प्रवरा परिसराच्या सुशोभीकरणाचा भूमिपूजन सोहळा पार पडला. या उपक्रमातून या परिसराचा चेहरामोहरा बदलला जाणार आहे. त्यासाठी संगमनेर नगरपरिषदेकडून तब्बल दहा कोटी रुपयांचा खर्च प्रस्तावित करण्यात आला आहे. मात्र हा परिसर जर सुरक्षितच नसेल तर या भागाचा विकास करुन, त्याचे सुशोभीकरण करुन व त्यासाठी तब्बल दहा कोटी रुपयांचा खर्च करुन काय फायदा होणार आहे असा सवाल यावेळी उपस्थित असलेल्या नागरिकांमधून विचारला जात होता. कधी नव्हे ते घाटावरही सुरु झालेले चोरीचे प्रकार वेळीच थांबावेत, या भागात किमान उन्हाळी आवर्तनाच्या कालावधीत पोलीस बंदोबस्त ठेवण्यात यावा अशी अपेक्षाही यावेळी व्यक्त करण्यात आली. या घटनेला आणि नागरिकांच्या मागणीला पोलीस किती गांभीर्याने घेतात हे पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे.

गेल्या वर्षी रमजानच्या कालावधीत पोलिसांवर झालेला हल्ला, त्यानंतर काही कालावधीतच संगमनेरच्या साखळी कत्तलखान्यांवर झालेली राज्यातील सर्वात मोठी कारवाई, ऐतिहासिक हनुमान रथोत्सवाच्या मानाच्या ध्वजावरुन उफाळलेला वाद, कोकणगाव येथील तरुण व्यावसायिकाला रहेमतनगरमध्ये बोलावून जमावाने केलेली बेदम मारहाण, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीला धर्माधांनी घातलेला धुडगूस आणि या दरम्यानच्या कालावधीत शहराच्या विविध भागात झालेल्या चोर्या, घरफोड्या, एटीएम फोडीच्या एकामागून एक घटना आणि या सगळ्यांच्या तपासाच्या बाबतीत मात्र शून्य यामुळे संगमनेरातील गुन्हेगारांवर पोलिसांचा धाकच राहिला नसल्याचे स्पष्ट दिसत आहे.

