घरगुती समारंभ व गर्दी करणे टाळा ः तांबे
घरगुती समारंभ व गर्दी करणे टाळा ः तांबे
नायक वृत्तसेवा, संगमनेर
मागील 4 महिन्यांपासून कोरोना रोखण्यासाठी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, आमदार डॉ.सुधीर तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासन संगमनेर तालुक्यात सतर्कतेने काम करत आहे. सर्वात जास्त रॅपिड अँटीजेन टेस्ट ह्या संगमनेर तालुक्यात झाल्या असून ग्रामीण भागात व शहरात साजरे होणारे घरगुती समारंभ व गर्दी करणे नागरिकांनी कटाक्षाने टाळावे असे आवाहन नगराध्यक्षा दुर्गा तांबे यांनी केले आहे.
कोरोनाबाबत नागरिकांना आवाहन करताना नगराध्यक्षा तांबे म्हणाल्या, प्रशासन व सहकारी संस्था कोरोनाचा संसर्ग व साखळी रोखण्यासाठी सतर्कतेने काम करत आहे. त्यामध्ये नागरिकांचे सहकार्य अत्यंत महत्त्वाचे आहे. नागरिकांनी गर्दी करणे टाळले पाहिजे. घराबाहेर पडताना प्रत्येकाने मास्कचा वापर करावा. प्रत्येकाने सॅनिटायझर व सोशल डिस्टन्सचे पालन करावे. यातून आपण कोरोना रोखू शकतो. मात्र ग्रामीण भागात सध्या अनेक घरगुती समारंभ वाढले आहेत. त्यामध्ये होणारी गर्दी ही चिंताजनक आहे. किंबहुना कोरोना प्रसाराचेतेही एक कारण असू शकते; त्यामुळे प्रत्येक नागरिकाने भावनेपेक्षा परिस्थितीला महत्त्व देत घरगुती समारंभ व गर्दी करणे टाळावे असे आवाहन त्यांनी केले आहे.