धर्मांतर प्रकरण पोलीस निरीक्षक प्रताप दराडेंना शेकले पंधरा दिवसांत चौकशी; नियंत्रण कक्षातही केली बदली


नायक वृत्तसेवा, राहुरी
तालुक्यातील ब्राह्मणी या गावात धर्मांतर करण्यास प्रवृत्त करणार्‍या आरोपीला पाठिशी घातल्याचे प्रकरण राहुरीचे पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांच्यावर शेकले आहे. हे प्रकरण विधानसभेत उपस्थित करण्यात आले. त्यानंतर पोलीस निरीक्षक दराडे यांची येत्या पंधरा दिवसांत चौकशी करण्याचे आणि तोपर्यंत त्यांची नियंत्रण कक्षात बदली करण्याच्या सूचना प्रभारी गृहमंत्री शंभुराज देसाई यांनी विधानसभेत दिल्या. भाजपचे आमदार राम सातपुते यांनी याविषयावर अधिवेशनात लक्षवेधी प्रश्न उपस्थित केला होता.

एप्रिल 2022 मध्ये राहुरी तालुक्यात ही घटना उघडकीस आली होती. ब्राह्मणी गावात आठ महिन्यांपूर्वी पंजाबमधील कमलसिंग नावाच्या ख्रिश्चन मिशनर्‍याने एका भाजीविक्रेत्या महिलेचे धर्मांतर करण्याचा प्रयत्न केला, तसेच तिचा विनयभंगही केल्याचा आरोप आहे. यासंबंधी महिलेने पोलिसांकडे तक्रार केली. मात्र, पोलिसांनी लक्ष दिले नाही. पुढे भाजपचे आमदार नीतेश राणे आणि खासदार अमर साबळे यांनी यात लक्ष घातले. त्यांनी अहमदनगरला येऊन मोर्चा काढला. जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले आणि तत्कालीन पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांची भेट घेऊन राहुरीतील या धर्मांतराच्या विषयाकडे त्यांचे लक्ष वेधले. त्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला.

हा विषय आता अधिवेशनात उपस्थित करण्यात आला. राहुरीचे पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांनी कोणतीही कारवाई न करता गुन्हा दाखल होऊनही आरोपीला पाठिशी घालण्याचा प्रयत्न केला. गेली आठ महिने हा आरोपी मोकाट असून शिथिल कलमे लागू केल्याने त्याला अटकपूर्व जामीन मंजूर झाला आहे. या प्रकरणात या आरोपीने हिंदू देवदेवतांच्या प्रतिमांची विटंबना पण केलेली आहे. त्यामुळे या आरोपीवर व त्याला पाठिशी घालणार्‍या पोलीस अधिकार्‍यावर कडक कारवाई करून महाराष्ट्रात धर्मांतर विरोधी कायदा लागू करावा अशी मागणी आमदार राम सातपुते यांनी लक्षवेधी मांडताना केली. त्यावर मंत्री देसाई यांनी हा आदेश दिला.

काय आहे मूळ प्रकरण
संबंधित महिला भाजीपाला विक्रीचा व्यवसाय करते. आरोपी कमलसिंग 3 एप्रिलला या महिलेच्या घरी गेला. तिला एका विशिष्ट धर्मात येण्याचा आग्रह धरला. धर्मांतर केल्यास तुम्हाला प्रतिमहिना दोन हजार रुपये मिळतील, घरातील देवांच्या मूर्ती पाण्यात विसर्जित करा, असे सांगून धर्मांतरासाठी कमलसिंगने त्या महिलेला एका चारीजवळ नेले. चारीतील पाण्यात महिलेला उतरण्यास सांगून तिचाशी लज्जास्पद वर्तन केले. या प्रकारानंतर महिला तेथून निघून जाऊन गावात आली आणि तिथे तिच्याबरोबर घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर कमलसिंग नावाच्या व्यक्तीकडून होत असलेल्या धर्मांतराच्या प्रचाराला वाचा फुटली. कमलसिंग (सध्या रा. ब्राह्मणी, ता. राहुरी, मूळ रा. पंजाब) याच्याविरुद्ध संबंधित महिलेने फिर्याद दिली.

Visits: 264 Today: 1 Total: 1791049

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *