संगमनेर तालुक्यात परतीच्या पावसाने उडवली दाणादाण! हाती आलेल्या पिकांची नासाडी; बाजारपेठांवरही परिणाम होण्याची शक्यता
नायक वृत्तसेवा, संगमनेर
थांब.. थांब.. म्हणूनही थांबण्याचे नाव घेत नसलेल्या पावसाने आता जाता जाता फुलवलेले शेतशिवारही नासावण्याचा चंग बांधला आहे. गेल्या काही दिवसांपासून संगमनेर व अकोले तालुक्यात दररोज कोसळणार्या तुफान पावसामुळे शेतकर्यांचे मोठे नुकसान होत आहे. ऐन दिवाळीच्या तोंडावर पावसाने थैमान घातल्याने त्याचा थेट परिणाम बाजारपेठांवर होण्याची शक्यता आहे. या पावसाने म्हाळुंगी व आढळा या दोन्ही नद्या पुन्हा एकदा दुथडी भरुन वाहू लागल्या असून शहरातील म्हाळुंगी नदीवरील खचलेल्या पूलाचे कामही लांबले आहे. त्याचा परिणाम प्रवराकाठावर राहणार्या मोठ्या लोकवस्तीच्या अडचणी दिवाळीपर्यंत कमी होण्याची शक्यताही संपुष्टात आली आहे. चोवीस तासांत संगमनेर तालुक्यात सरासरी 24 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून सर्वाधीक 46 मिलीमीटर पाऊस संगमनेर महसूली मंडलात झाला आहे.
गेल्या काही दिवसांपासून संगमनेर व अकोले तालुक्यातील पर्जन्यछायेखाली असलेल्या भागात परतीच्या पावसाने अक्षरशः थैमान घातले आहे. त्यामुळे शेतकर्यांच्या हातातोंडाशी आलेल्या पिकांसह ऊस, भाजीपाला व फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या दोन्ही तालुक्यातील काही भागात तर ढगफुटीसदृश पाऊस पडत असल्याने अनेक भागातील शेतांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. त्यामुळे शेतात उभी असलेली पिकंही सडू लागल्याने निसर्गाच्या अवकृपेने शेतकरी वर्ग मेटाकुटीला आला आहे. संगमनेर व अकोले तालुक्यात सोयाबीन व बाजरीची पिकं काढण्याची लगबग सुरु असतांनाच परतीच्या पावसाचा तडाखा बसल्याने काही भागातील शेतकर्यांच्या हातची पिकं गेली आहेत तर काही भागात काढलेली पिकं पावसाने हिरावून नेली आहेत.
चालूवर्षी काहीशा विलंबाने दाखल झालेल्या मान्सूनने यापूर्वीच सरासरी ओलांडली आहे. यंदा चांगला पाऊस झाल्याने सर्वत्र चैतन्याचे आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. त्यातच यावर्षी कोविडच्या अनुषंगाने राज्यात लागू असलेले सर्व निर्बंध शासनाने मागे घेतल्याने यंदाची दिवाळी धूमधडाक्यात साजरी होईल असे चित्र निर्माण झालेले असताना आता त्यात पावसाने खोडा घातल्यासारखी स्थिती दिसू लागली आहे. परतीच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीचे अद्यापही पंचनामे नसल्याने झालेले नुकसान कसे भरुन काढायचे अशा विवंचनेत सध्या या दोन्ही तालुक्यातील शेतकरी अडकला आहे.
संगमनेर तालुक्यात सर्वदूर तर अकोले तालुक्यातील भोजापूर व आढळा या जलाशयांच्या पाणलोटासह लाभक्षेत्रातही सध्या जोरदार पाऊस पडत आहे. त्यामुळे तुडूंब असलेल्या या दोन्ही जलाशयांमधून मोठ्या प्रमाणात ओव्हर फ्लोचं पाणी वाहत असल्याने म्हाळुंगी व आढळा या दोन्ही नद्या दुथडी झाल्या आहेत. गेल्या आठवड्यात संगमनेर शहरातून प्रवराकाठाकडे जाण्यासाठी वापरात असलेला मोठा पूल एका बाजूने खचला होता. त्यामुळे प्रशासनाने या पूलारुन होणारी वाहतूक पूर्णतः बंद केल्याने साईनगर, हिरेमळा, वेताळमळा, पम्पींग स्टेशन, घोडेकरमळा, गंगामाई या भागात राहणार्या रहिवाशांसह दिगंबर गणेश सराफ विद्यालय व डॉ.द ेवेंद्र ओहरा कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना मालपाणी हेल्थ क्लब मार्गाचा वापर करावा लागत आहे.
सदरील पूलाचा खचलेला भाग दुरुस्त करण्यासाठी पालिका प्रशासनाकडून प्रयत्न सुरु असतानाच आता म्हाळुंगीने पुन्हा एकदा रुद्रावतार धारण केल्याने गेल्या चार दिवस प्रशासनाने नदीपात्राच्या एकाबाजूला केलेली तयारी पाण्यात वाहून गेली आहे. त्यातच पुढील काही दिवस परतीच्या पावसाचा मुक्काम कायम असल्याचाही अंदाज वर्तविला गेल्याने वरील भागात राहणार्या रहिवाश्यांसह विद्यार्थ्यांच्या अडचणी कायम राहणार असून दिवाळीपूर्वी त्यांच्यासाठी शहरातून नदीकाठावर जाण्यासाठी कच्चा अथवा पक्का रस्ता तयार होण्याची कोणतीही शक्यता आता जवळपास मावळली आहे. सदरील पूल खचल्यानंतरही काहीजण या पूलावरुन ये-जा करीत होते. मात्र आज सकाळी नदीपात्रातील पाण्याची पातळी कमालीची वाढल्याने आता अशांची हिंमतही खचली आहे.
गेल्या 24 तासांत संगमनेर तालुक्यातील दहा महसूली मंडलात सरासरी 23.6 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. सर्वाधिक 46 मिलीमीटर पाऊस संगमनेर महसूली मंडलात कोसळला असून त्या खालोखाल आश्वी 42 मि. मी., शिबलापूर व तळेगाव प्रत्येकी 25 मि. मी., समनापूर 24 मि. मी., धांदरफळ 23 मि. मी., डोळासणे 20 मि. मी., पिंपरणे 17 मि. मी. आणि साकूर व घारगाव महसूली मंडलात प्रत्येकी सात मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे. आज दुपारनंतर पुन्हा पावसाची शक्यता वर्तविण्यात आली असून पुढील काही दिवस पावसाचा मुक्काम कायम राहण्याचा अंदाज हवामान खात्याकडून व्यक्त करण्यात आला आहे.