शासकीय प्रयोगशाळेचा संगमनेर तालुक्याला दिलासा! अकोले आज शून्य; श्रीगोंदा, जामखेड व श्रीरामपूर तालुक्याची क्रमवारी बदलली..
नायक वृत्तसेवा, संगमनेर
जूनमध्ये आटोक्यात येण्याचे संकेत देणारी कोविड संक्रमणाची दुसरी लाट राहून राहून पुन्हा मागे वळून पहात असल्याचे चित्र गेल्या बारा दिवसांत समोर आले आहे. त्यामुळे या कालावधीत जिल्ह्यातील बहुतेक सर्वच तालुक्यांच्या सरासरी रुग्णवाढीला पुन्हा काहीशी गती प्राप्त झाली असून श्रीगोंदा जामखेड व श्रीरामपूरची एकूण रुग्णसंख्या वाढल्याने त्यांच्या क्रमात बदल झाला आहे. आजच्या दिवसातील जिल्ह्यातील आनंददायी बाब म्हणजे आज अकोले तालुक्यातून एकही रुग्ण समोर आला नाही, तर शासकीय प्रयोगशाळेच्या मेहरबानीमूळे आज संगमनेर तालुक्याची रुग्णसंख्या पुन्हा खाली असून शहरातील अवध्या चार जणांसह 36 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे तालुक्याची एकूण रुग्णसंख्या आता 23 हजार 478 झाली आहे.
जूनच्या महिन्यात जिल्ह्यातील कोविड संक्रमण उताराला लागले होते. जिल्ह्यात जूनच्या सुरुवातीच्या पंधरा दिवसांत दररोज सरासरी 754 रुग्ण समोर येवून जिल्ह्यात 11 हजार 307 रुग्णांची वाढ झाली. तर नंतरच्या पंधरा दिवसांत त्यात मोठी घट होवून दैनिक सरासरी 427 पर्यंत खाली आली आणि जिल्ह्यात पहिल्या पंधरवड्याचे जवळपास निम्मे म्हणजे 6 हजार 412 रुग्ण समोर आले. जूनच्या संपूर्ण 30 दिवसांत जिल्ह्याचा सरासरी रुग्णवाढीचा दर 591 रुग्ण दररोज होता व महिन्याभरात जिल्ह्यात 17 हजार 719 रुग्णांची भर पडली. मात्र जुलैच्या पहिल्या सहा दिवसांनी दाखवलेला दिलासा आता संपत चालला असल्याचे चित्र दिसू लागले असून चालू महिन्यातील बारा दिवसांत सरासरी 412 रुग्ण या गतीने जिल्ह्यात 5 हजार 356 रुग्ण वाढले आहेत. रुग्णवाढीचा वेग जुलैच्या पहिल्या सहा दिवसांत 443 रुग्ण दररोज होता व या कालावधीत 2 हजार 656 रुग्ण आढळले. तर नंतरच्या सहा दिवसांत त्यात काहीशी वाढ होवून सरासरी 450 रुग्णांवर जावून 2 हजार 700 रुग्ण आढळले.
संगमनेर तालुक्यातही जूनच्या पहिल्या पंधरवड्यात संक्रमणाची गती जोरावरच होती. या कालावधीत तालुक्याचा सरासरी रुग्णवाढीचा दर तब्बल 65 रुग्ण दररोज होता व या कालावधीत 981 रुग्ण समोर आले. तर जूनच्या नंतरच्या पंधरवड्यात मात्र तालुक्याच्या सरासरीतही मोठी घट होवून ती 33 रुग्णांवर आली व तालुक्यात 500 रुग्णांची भर पडली. जूनची एकूण सरासरी पाहता महिन्याभरात तालुक्यात सरासरी 49 रुग्ण या गतीने 1 हजार 481 रुग्ण वाढले. जुलैमध्ये जिल्ह्यातील बहुतेक तालुक्यातून कोविडचे संक्रमण आटोक्यात आल्याचे दृष्य दिसू लागले होते. मात्र नागरिकांनी पूर्वीच्या चुकांमधून कोणताही बोध न घेतल्याने परतीच्या प्रवासाला निघालेली संक्रमणाची दुसरी लाट पुन्हा खोळंबली असून जुलैच्या दुसर्या पंधरवड्याने जिल्ह्यातील काही तालुक्यांच्या चिंता वाढवल्या आहेत. संगमनेर तालुक्यात 1 ते 6 जुलै दरम्यान 32 रुग्ण दररोज या गतीने 193 तर नंतरच्या सहा दिवसांत 51 रुग्ण दररोज या गतीने 306 रुग्णांची वाढ झाली आहे. त्यामुळे तालुकाही चिंतेच्या छायेत आला आहे.
आज खासगी प्रयोगशाळा व रॅपीड अँटीजेनच्या प्रत्येकी 18 अहवालातून संगमनेर तालुक्यातील 36 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून त्यात संगमनेर शहरातील अवघ्या चौघांचा समावेश आहे. त्यात इंदिरा नगरमधील 56 वर्षीय इसम, साईनाथ चौकातील 53 वर्षीय महिला, अशोक चौकातील 70 वर्षीय इसम व संगमनेर असा पत्ता असलेल्या 51 वर्षीय इसमाचा समावेश आहे. तर ग्रामीण भागातील 14 गावांमधून आज 32 जण आढळले. त्यात रायते येथील 18 वर्षीय तरुण, घुलेवाडीतील 60 वर्षीय ज्येष्ठ नागरिकासह 54 वर्षीय महिला व 35 वर्षीय तरुण, अकलापूर येथील 61 वर्षीय ज्येष्ठ नागरिक, 40 वर्षीय तरुण व 37 वर्षीय महिला, वनकूटे येथील 55 वर्षीय इसमासह 50 व 42 वर्षीय महिला,
अंभोरे येथील 73 वर्षीय ज्येष्ठ नागरिक, मांडवे येथील 70 वर्षीय महिला, बिरेवाडीतील 52 वर्षीय महिलेसह 49 वर्षीय इसम व 33 वर्षीय तरुण, साकूर येथील 28 वर्षीय महिला, पानोडी येथील 50 वर्षीय इसमासह 25, 19 व 18 वर्षीय तरुण व बारा वर्षीय मुलगा आणि 65, 36, 35, 30 व 25 वर्षीय महिलांसह 18 वर्षीय तरुणी, ओझर खुर्द येथील 34 वर्षीय महिला, कुंभारवाडीतील 53 वर्षीय इसम, वरवंडी येथील 25 वर्षीय महिला, खळी येथील 50 वर्षीय महिला व आंबी दुमाला येथील 71 वर्षीय ज्येष्ठ नागरिकाचा समावेश आहे. आजच्या रुग्णवाढीने तालुका आता 23 हजार 478 रुग्णसंख्येवर पोहोचला आहे.
जिल्ह्याच्या एकूण रुग्णसंख्येत आज काही प्रमाणात घट झाली असली तरीही जिल्ह्याची एकूण सरासरी मात्र उंचावलेलीच आहे. आज शासकीय प्रयोगशाळेचे 20, खासगी प्रयोगशाळेचे 158 आणि रॅपीड अँटीजेनच्या निष्कर्षातून समोर आलेल्या 175 अहवालातून जिल्ह्यातील 353 जणांना संक्रमण झाल्याचे समोर आले. आजच्या अहवालातील दिलासादायक बाब म्हणजे आज अकोले तालुक्यात एकही रुग्ण आढळला नाही तर राहाता तालुक्यातून अवघे चार रुग्ण समोर आले. तर पारनेर 62, पाथर्डी 39, जामखेड 37, संगमनेर 36, श्रीगोंदा 34, नगर ग्रामीण 24, नेवासा व शेवगाव तालुक्यातून प्रत्येकी 21, कर्जत 19, कोपरगाव 18, अहमदनगर महापालिका क्षेत्र 17, राहुरी 10, श्रीरामपूर सात व इतर जिल्ह्यातील चार रुग्णांचा समावेश आहे. आजच्या रुग्णवाढीने जिल्हा आता 2 लाख 85 हजार 228 रुग्णसंख्येवर पोहोचला आहे.