संकेत नवलेच्या खून प्रकरणी अकोलेत मशाल मोर्चा गुन्हेगारांचा शोध लागेना; तपास सीबीआयकडे सोपविण्याची मागणी
नायक वृत्तसेवा, अकोले
संगमनेरातील एका अभियांत्रिकी महाविद्यालयात शिक्षण घेणार्या संकेत नवलेच्या खुनाला पंधरा दिवस उलटून गेले आहेत. तरी देखील मारेकर्यांचा शोध घेण्यात पोलिसांना यश आलेले नाही. यासाठी गुरुवारी (ता.22) सायंकाळी अकोले शहरात नवलेवाडी ते बसस्थानकपासून पोलीस ठाण्यावर न भूतो न भविष्यती असा मशाल मोर्चा काढण्यात आला. या मोर्चामध्ये सर्वपक्षीय नेते, कार्यकर्ते, विविध संघटनांचे पदाधिकारी, पंचक्रोशीतील ग्रामस्थ, महिला, अबालवृद्ध, नातेवाईक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
गुन्हेगारांचा शोध पोलीस यंत्रणेला लागत नाही यापेक्षा मोठे दुर्दैव नाही अशी टीका करीत यामागे कोणती मोठी यंत्रणा काम करीत नाही ना अशी शंका उपस्थित करण्यात आली. जर पोलीस यंत्रणा गुन्हेगारांचा शोध लावण्यास सक्षम नसेल तर शासनाने हा तपास सायबर गुन्हे शाखेकडे किंवा सीबीआयकडे सोपवावा आणि लवकरात लवकर संकेत नवलेचे गुन्हेगार शोधून काढावे. अन्यथा यापुढे नवलेवाडीकर आक्रमक पवित्रा घेईल ते शासनाला खूप महागात पडेल असा इशारा देत आरोपींना फाशी होईपर्यंत संघर्ष सुरूच ठेवण्याचा निर्धार केला.
या मशाल मोर्चाला सर्व पक्ष, वकील संघ, स्वाभिमानी शेतकरी संघटना, वारकरी संघ, प्राथमिक शिक्षक संघ, माध्यमिक शिक्षक संघ, रोटरी क्लब, व्यापारी वर्ग, कर्मचारी वर्ग, शिक्षक वर्ग, पंचक्रोशीतील ग्रामस्थ, महिला, अबालवृद्ध यांनी पाठिंबा दिला. यावेळी कोल्हार-घोटी रस्त्यावर वाहतूक रोडावली होती. विशेष करून हा मोर्चा अतिशय शांततेच्या मार्गाने काढण्यात आला. मात्र या गुन्ह्याचा शोध लवकर लागला नाही तर हाच मोर्चा नंतरच्या काळात कोणते रूप धारण करेल हे सांगता येणार नाही, असे चित्र पाहायला मिळाले.
यावेळी सरपंच विकास नवले, मधुकर नवले, डॉ. अजित नवले, ऍड. वसंत मनकर, सदाशिव साबळे, ऍड. शांताराम वाळुंज, मीनानाथ पांडे, महेश नवले, सुरेश नवले, राजेंद्र सदगीर आदिंसह अनेक नेत्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. शेवटी अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती भोर यांना निवेदन दिले. यावेळी संगमनेर भागाचे प्रभारी उपविभागीय पोलीस अधिकारी संजय सातव, संगमनेर शहराचे पोलीस निरीक्षक राजेंद्र भोसले, अकोल्याचे सहायक पोलीस निरीक्षक मिथून घुगे उपस्थित होते. दरम्यान, घुगे यांचा तपास पथकात समावेश करण्यात आला आहे.