माथाडी कामगारांना अत्यावश्यक सेवेत समाविष्ट करण्याची मागणी

नायक वृत्तसेवा, नगर
महाराष्ट्र शासनाच्या विविध माथाडी मंडळातील अहमदनगर जिल्ह्यासह राज्यातील विविध बाजार समित्या, रेल्वे मालधक्के, शासकीय गोदाम, विविध आस्थापनांमध्ये काम करणार्या माथाडी/मापारी व अन्य घटकांचा अत्यावश्यक सेवेत समाविष्ट करणे, त्यांना रेल्वे, बस सेवा व इतर व्यवस्थेने प्रवास करण्यास परवानगी देणे. याचबरोबर डॉक्टर्स, पोलीस, महापालिका कर्मचारी या घटकांना शासनाने लागू केलेले विमा संरक्षण कवच माथाडी कामगारांना लागू करणे, कोरोनाने मृत्यू झालेल्या माथाडी कामगारांच्या कुटुंबियांना या संरक्षणातून 50 लाख रुपये पर्यंत आर्थिक सहाय्य मिळावे. या मागण्या महाराष्ट्र राज्य माथाडी, ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार यूनियनने शनिवारी (ता.24) पुकारलेल्या संपात केल्या आहेत.

दरम्यान, 22 एप्रिलला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कामगार नेत्यांची ऑनलाइन बैठक घेतली होती. या बैठकीत माथाडी संघटनेचे सरचिटणीस माजी आमदार नरेंद्र पाटील यांनी वरीलप्रमाणे मागणी केली आहे तसे. निवेदनही मुख्यमंत्री व संबंधितांना दिलेले आहे. परंतु शासनाने याकडे दुर्लक्ष केले असून अद्याप परिपत्रक काढलेले नाही. कोरोनाच्या संकटातही शासनाच्या सूचनेनुसार माथाडी कामगार आपला जीव धोक्यात घालून सामान्य जनतेला जीवनावश्यक वस्तूंच्या पुरवठा वेळेत व्हावा याकरीता मालाची लोडिंग/अनलोडिंग, थप्पी, वाराई व त्या अनुषंगिक कामे करत आहे. यामध्ये नाशिक जिल्ह्यातील 13 व राज्यातील सुमारे 50 माथाडी कामगारांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. या पार्श्वभूमीवर मदतीसाठी आणि न्याय मागण्या मंजूर करण्यासाठी शनिवारी संप पुकारण्यात आल्याचे प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.

