चंदनापुरीच्या विद्यार्थ्यांची विविध स्पर्धांत नेत्रदीपक कामगिरी संगमनेर महाविद्यालयात स्पर्धांचा बक्षीस वितरण समारंभ संपन्न

नायक वृत्तसेवा, संगमनेर
तालुक्यातील चंदनापुरी येथील जिल्हा परिषद प्राथमिक केंद्रशाळेच्या विद्यार्थ्यांनी पंचायत समिती संगमनेरतर्फे आयोजित तालुका पातळीवरील विविध गुणदर्शन स्पर्धांमध्ये नेत्रदीपक यश संपादन केले.

संगमनेर महाविद्यालयात स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांचे बक्षीस वितरणाचा समारंभ गटविकास अधिकारी अनिल नागणे व गटशिक्षणाधिकारी सुवर्णा फटांगरे यांचे हस्ते करण्यात आले. यावेळी चंदनापुरीच्या विद्यार्थ्यांनी दैदीप्यमान कामगिरी करत शाळेच्या लौकिकात भर घातली. त्याबद्दल प्राथमिक गटातून वर्ग चौथीची विद्यार्थीनी समृध्दी प्रभाकर भालेराव हिने चित्रकला स्पर्धेत द्वितीय क्रमांक तर चौथीचा अभिनव संदीप रहाणे याने वक्तृत्व स्पर्धेत तृतीय क्रमांक पटकावला. या पुरस्कारप्राप्त विद्यार्थ्यांना वर्गशिक्षक सुनील ढेरंगे यांचे मार्गदर्शन लाभले.

उपक्रमशील शिक्षिका शैलजा पोखरकर यांचाही टेक्नोसेव्ही शिक्षक म्हणून मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. तालुकास्तरीय कर्मचारी स्पर्धांमध्ये बुद्धीबळ स्पर्धेत तृतीय क्रमांक आल्याबद्दल उपक्रमशील शिक्षक सुनील ढेरंगे यांचाही पंचायत समितीच्यावतीने सन्मान करण्यात आला. यावेळी शिक्षक बँकेचे माजी अध्यक्ष राजू रहाणे, पालक प्रभाकर भालेराव, वैशाली रहाणे उपस्थित होते. मुख्याध्यापिका वंदना सातपुते, उमा पाटील, उषा म्हसे, कविता काकडे, अनिता मालुंजकर, शैलजा पोखरकर, सुनील ढेरंगे, मीनाक्षी काकड व किरण फटांगरे यांनी या विद्यार्थ्यांना स्पर्धेसाठी प्रोत्साहन दिले. सरपंच शंकर रहाणे, उपसरपंच भाऊराव रहाणे, ग्रामपंचायत सदस्य, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुनील भालेराव, पालक व ग्रामस्थ यांनी विद्यार्थ्यांचे भरभरून कौतुक केले.
