खासदार लोखंडेंना शिवसेना पावली, मात्र मला नाही ः मुरकुटे श्रीरामपूरातील एका कार्यक्रमात सत्ताधारी व विरोधक एकत्र

नायक वृत्तसेवा, श्रीरामपूर
मुरकुटे आपले गुरु आहेत, असं म्हणत शिवसेनेने उमेदवारी दिल्याने अवघ्या सतरा दिवसांतच खासदार झाले; अशी गुरुविषयी आदरयुक्त भावना शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार सदाशिव लोखंडे यांनी व्यक्त केली. मात्र आपल्याला शिवसेना पावली नाही, खासदार लोखंडेंवर शिवसेनेची आणि ठाकरेशाहीची कृपा आहे. त्यामुळे त्यांना सलग खासदार होता आले, अशी खदखद काहीकाळ शिवसेनेत काढलेले श्रीरामपूरचे माजी आमदार भानुदास मुरकुटे यांनी व्यक्त केली. राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनाही शिवसेना पावली आणि मातोश्रीने भरभरुन दिले, असेही त्यांनी नमूद केले.

श्रीरामपूरमध्ये एका कार्यक्रमात माजी मंत्री तथा भाजपचे आमदार राधाकृष्ण विखे, माजी आमदार भानुदास मुरकुटे, राज्यमंत्री अब्दुल सत्तार आदी सत्ताधारी आणि विरोधक एकत्र आले होते. यामुळे या कार्यक्रमाकडे जिल्ह्याचे लक्ष लागले होते. हा कार्यक्रम राजकीय नसला तरी यातून अनेक चर्चा रंगल्या आहेत. याच कार्यक्रमात दानवे आणि मंत्री सत्तार यांच्यातील टोपीबद्दलची राजकीय चर्चाही अख्ख्या महाराष्ट्रात रंगली होती. अशीच आणखी एक चर्चा आहे ती म्हणजे खासदर लोखंडे आणि माजी आमदार मुरकुटे यांच्यातील एकमेकांच्या संवादाची.
या कार्यक्रमात लोखंडे म्हणाले, ‘कर्जत-जामखेडमध्ये आपण वनमॅन-शो होतो. आता कळत नाही कोण कुठे आहेत आणि आपण कुणासोबत आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संधी दिली आणि मुरकुटे यांच्या मार्गदर्शनामुळे राजकारणात यश मिळाले. माजी आमदार मुरकुटे आपले गुरु आहेत, असेही खासदार लोखंडे म्हणाले. सर्वजण म्हणतात खासदार लोखंडे यांचे सहकार्य लाभले. परंतु त्यासाठी आपण कोणतेही प्रयत्न केले नाहीत. आणि मंजूर कामांची कल्पना देखील नसल्यामुळे सत्य झाकले जात नाही. मात्र खासदार म्हणून आणि कार्यकर्ता म्हणून सर्वसामान्यांसाठी मुरकुटे आणि विखे यांच्या मार्गदर्शनाखाली आपण काम करण्यास तत्पर असल्याचे खासदार लोखंडे यांनी स्पष्ट केले.

आपल्याला शिवसेना पावली नाही पण राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांना शिवसेना पावली आणि त्यांना मातोश्रीने भरभरुन दिले. तसेच विखे पाटलांनाही शिवसेना पावली, असे माजी आमदार भानुदास मुरकुटे यांनी उद्गार काढताच एकच हशा पिकला. खासदार लोखंडे यांच्यावरही शिवसेनेची आणि ठाकरेशाहीची कृपा आहे. त्यामुळे त्यांना सलग खासदार होता आले. राजकारणात टोपीला फार महत्व आहे. त्यामुळे राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी टोपी काढू नये असा सल्लाही मुरकुटे यांनी शेवटी दिला.

 

Visits: 6 Today: 1 Total: 30535

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *