हंडाभर पाण्यासाठी बायाबापडे ओलांडताहेत पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्ग! पठारभागातील कान्हेवाडी स्वातंत्र्याच्या सत्तरीनंतरही पिण्याच्या पाण्यापासून वंचित

नायक वृत्तसेवा, घारगाव
एकीकडे कोरोनाचा कहर तर दुसरीकडे तहान भागविण्यासाठी महिलांना जीव धोक्यात घालून पाणी वाहून आणावे लागत आहे. संगमनेर तालुक्याच्या पठारभागातील डोळासणे गावांतर्गत असलेल्या कान्हेवाडी येथील महिलांना थेट पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्ग ओलांडून पिण्याचे पाणी आणावे लागत आहे. त्यामुळे कायमच लोकप्रतिनिधी व प्रशासनाच्या लाल फितीच्या कारभारात दुर्लक्षित होत होणार्या मुलभूत प्रश्नांकडे लक्ष देऊन किमान ऐन उन्हाळ्यात टँकर सुरू करुन दिलासा द्या, अशी आर्त विनवणी महिलांनी केली आहे.

डोळासणे गावठाणासह बांबळेवाडी, कान्हेवाडी, धुमाळवाडी, कामधेनूनगर, माळवाडी या वाड्या स्वातंत्र्याच्या सत्तरीनंतरही मुलभूत सुविधांपासून वंचित असल्याचे दुर्दैवी चित्र आहे. कायमच लोकप्रतिनिधी व प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने दुष्काळ जणू येथील नागरिकांच्या पाचवीलाच पुजलेला आहे. याचा परिणाम म्हणजे ऐन उन्हाळ्यात भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागतो. कान्हेवाडी येथे एक विहीर असून, परिसरातील बायाबापडे विहिरीवरुन पिण्याचे पाणी नेतात. मात्र, गेल्या काही दिवसांपासून उन्हाचा कडाका वाढल्याने विहिरही कोरडीठाक पडली आहे. त्यामुळे कान्हेवाडी व माळवाडी वाड्यांमधील बायाबापडे डोक्यावर दोन-तीन हंडे घेऊन थेट पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्ग ओलांडून पाणी वाहून आणतात.

अत्यंत रहदारी असणारा हा महामार्ग ओलांडत असताना ये-जा करणार्या वाहनांवर लक्ष ठेवून वाहन नसले की मगच रस्ता ओलांडायचा असा जणू नित्यक्रमच बनला आहे. परंतु, कायमच मालवाहू व प्रवासी वाहनांची भरधाव वेगाने ये-जा सुरू असल्याने अक्षरशः जीव मुठीत धरुन बायाबापड्यांसह लहानगे पाणी वाहून आणत असल्याचे दुर्दैवी चित्र दिसते. त्यामुळे किमान आता तरी मायबाप सरकारने पिण्याच्या पाण्याचा टँकर सुरू करावा, अशी आर्त विनवणी संगीता चंद्रकांत गोडे, पारूबाई निवृत्ती बांबळे, लहानबाई निवृत्ती बांबळे, संगीता बाळासाहेब क्षीरसागर, रोहिणी शिवाजी बांबळे आदी महिलांंनी केली आहे.

स्वातंत्र्याच्या सत्तरीनंतरही सरकार पिण्याचे पाणी देऊ शकले नाही. हंडाभर पाण्यासाठी आम्हांला जीव धोक्यात घालून पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्ग ओलांडावा लागतो. अनेकदा पाण्यावरुन महिलांमध्ये भांडणेही होतात. त्यामुळे मायबाप सरकारने लवकर पिण्याचा पाण्याचा टँकर सुरू करुन आमची वणवण भटकंती थांबवावी.
– संगीता गोडे (पाणी वाहून आणणारी महिला)
