अकोलेची शेतकरी कन्या शर्मिला येवले शिंदे गटात दाखल मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या उपस्थितीत वर्षा निवासस्थानी केला प्रवेश
नायक वृत्तसेवा, अकोले
तालुक्यातील इंदोरी येथील शेतकरी कन्या आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे युवासेनेच्या माजी सहसचिव शर्मिला येवले यांनी मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी बाळासाहेबांची शिवसेना पक्षात प्रवेश केला आहे. शर्मिला येवले यांच्यासोबत 16 पदाधिकार्यांनी देखील शिंदे गटात प्रवेश केला आहे. यावरुन शिंदे गटात मोठी इनकमिंग सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे.
पक्षात काम करू दिलं जात नाही असा गंभीर आरोप करत काही दिवसांपूर्वी शर्मिला येवले यांनी युवासेनेच्या सहसचिव पदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर वरूण सरदेसाई यांच्या मध्यस्थीनंतर शर्मिला येवले यांनी ठाकरे गटालाच पसंती दिली होती. मात्र, सरदेसाई यांच्या मध्यस्थीनंतर काहीच दिवसांत शर्मिला येवले यांच्या सहसचिव पदाला सामना वृत्तपत्रातून स्थगिती देण्यात आल्याची माहिती समोर आली होती. तेव्हापासूनच शर्मिला येवले या शिंदे गटात प्रवेश करणार असल्याचा अंदाज बांधला जात होता. युवासेनेच्या सहसचिव पदाला स्थगिती दिल्यानंतर शर्मिला येवले यांनी युवासेना सोडण्याचे संकेत दिले होते.
माझ्यासारख्या ग्रामीण भागातील युवतीला शिवसेनेमध्ये काम करण्याची संधी दिली, पद दिलं ग्रामीण भागात शिवसेना युवासेना वाढीसाठी मला प्रयत्न करता आला. आता माझ्या पदाला स्थगिती दिल्याची माहिती मध्यवर्ती कार्यालयातून देण्यात आली आहे. पदाला स्थगिती दिली असली तरी मी माझं काम चालूच ठेवले. पक्षाला कार्यकर्त्यांची गरज असते, कार्यकर्त्याला पक्षाची नाही. कार्यकर्ता हा सर्वसामान्य कुटुंबातून सर्व परिस्थितीची जाण ठेवून घडत असतो. मात्र कार्यकर्त्यांचं खच्चीकरण जर होत असेल तर पदत्याग केलेला काय वाईट, अससे बोलून येवले यांनी युवासेना सोडण्याचे संकेत दिले होते. त्यानुसार आता शर्मिला येवले यांनी युवासेनेला रामराम ठोक्यात थेट शिंदे गटाचा रस्ता पकडला आहे. अनेक वर्ष विद्यार्थी चळवळीत काम केलेल्या शर्मिला येवले यांनी शिंदे गटात प्रवेश केल्यामुळे शिंदे गटाला मोठी ताकद मिळणार हे निश्चित.
ग्रामीण भागातील युवतींना न्याय द्यायचा असेल तर हक्काचं व्यासपीठ हवं असतं. त्यामुळे आम्हांला खरा न्याय द्यायचं काम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं आहे. एका शेतकरी कुटुंबातून आलेल्या नेतृत्वालाच शेतकर्यांच्या मुलींचे प्रश्न समजतात आणि त्यातूनच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आमचे प्रश्न समजून आम्हाला न्याय दिला आहे. आज आम्ही 16 युवतींनी प्राथमिक स्वरूपात प्रवेश केला आहे. मात्र, माझ्यासोबत ज्या पदाधिकार्यांनी युवासेनेचे राजीनामे दिले होते त्या सगळ्या पदाधिकारी शिंदे साहेबांसोबत आहेत.
– शर्मिला येवले