भटक्यांच्या रॅपीड चाचणीतही ग्रामीणभागातील संक्रमण अधिकच! शहरातील अवघे सव्वादोन तर ग्रामीणभागातील आठ टक्के जणांचे निष्कर्ष पॉझिटिव्ह..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
जिल्ह्यातील वाढत्या कोविड संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकार्यांनी विनाकारण रस्त्यावर फिरणार्यांची रॅपीड अँटीजेन चाचणी करण्याचे आदेश दिले आहेत. या चाचण्यांमधून पॉझिटिव्ह अहवाल प्राप्त होणार्या रुग्णाला तत्काळ नजीकच्या कोविड केअर सेंटरमध्ये दाखल करण्याचे निर्देश दिलेले आहेत. त्या पार्श्वभूमीवर गेल्या तीन दिवसांत स्थानिक पोलीस व आरोग्य विभागाने केलेल्या चाचण्यांमधून शहरीभागातील संक्रमणाचा वेग नगण्य तर ग्रामीणभागातील संक्रमणाचा वेग चिंताजनकच असल्याचा निष्कर्ष समोर आला आहे. त्यातून तालुक्याच्या ग्रामीण भागात कोविडबाबत अद्यापही गांभिर्य पाळले जात नसल्याचे समोर आले असून संक्रममित असलेले रुग्णही बिनधास्त फिरत असल्याचे दिसून आले आहे.

मागील काही दिवसांपासून राज्यासह जिल्ह्यातील कोविड संक्रमणाच्या गतीला काहीशी ओहोटी लागल्याचे चित्र दिसत आहे, मात्र त्याचवेळी संगमनेरसह अन्य काही तालुक्यातील रुग्णवाढीचा वेग मात्र अद्यापही कायम असल्याने जिल्ह्याच्या चिंताही कायम आहेत. गेल्या महिनाभरापासून जिल्ह्यात कठोर निर्बंध लागू आहेत. असे असतांनाही जिल्ह्यातील काही तालुक्यांची रुग्णगती आजही नियंत्रणात आलेली नाही. त्याबातची सखोल माहिती घेतल्यानंतर लक्षणे नसलेले मात्र संक्रममित असलेले काही रुग्ण बिनधास्तपणे सार्वजनिक ठिकाणांवर वावरत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले. त्यामुळे जिल्हाधिकार्यांनी संक्रमण वाढत असलेल्या जिल्ह्यातील सर्व प्रमुख तालुक्यांमध्ये विनाकारण फिरणार्यांवर दंडात्मक कारवाईसह त्यासर्वांची सक्तिने रॅपीड अँटीजेन चाचणी करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच, या चाचणीतून संक्रमित असल्याचे समोर आल्यानंतर तत्काळ त्यांची रवानगी नजीकच्या कोविड केअर सेंटर्समध्ये करण्याचे आदेश दिले आहेत.
त्या पार्श्वभूमीवर संगमनेर उपविभागाचे पोलीस उपअधीक्षक राहुल मदने यांच्या नेतृत्त्वाखाली तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक पांडूरंग पवार, घारगाव पोलीस ठाण्याचे निरीक्षक सुनील पाटील व आश्वी पोलीस ठाण्याचे निरीक्षक सुधाकर मांडवकर यांनी आपापल्या पोलीस ठाण्यांच्या हद्दित वर्दळीच्या ठिकाणी आरोग्य पथकासह कोविड तपासणी केंद्र सुरु केले आहेत. रस्त्याने विनाकारण फिरणार्या प्रत्येकाची सखोल चौकशी करुन त्यांना या तपासणी केंद्रावर आणले जात असून तेथे त्यांची रॅपीड अँटीजेन चाचणी करण्यात येत आहे. गेल्या तीन दिवसांपासून सुरु असलेल्या या अभिनव उपक्रमामुळे बाधित असूनही ‘बिनधास्त’ फिरणारे समोर येत आहेत, तर कोविड चाचण्या होत असल्याच्या भितीने अनेकजण घरातच थांबणं पसंद करीत असल्याने रस्त्यावरील गर्दीही काही प्रमाणात कमी झाली आहे.
गेल्या तीन दिवसांत संगमनेर शहर पोलीस ठाण्याच्या हद्दित सर्वाधीक 343 जणांच्या चाचण्या करण्यात आल्या असून त्यातील अवघ्या आठ जणांचा (2.33 टक्के) निष्कर्ष पॉझिटिव्ह आला आहे. तर तालुक्यातील उर्वरीत तिनही पोलीस ठाण्यांच्या हद्दित एकूण 117 जणांच्या चाचण्या झाल्या असून त्यातील नऊ जणांचे (7.70 टक्के) निष्कर्ष पॉझिटिव्ह आले आहेत. यात संगमनेर तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दित 49 जणांच्या चाचणीतून सहा जणांचे, घारगाव पोलीस ठाण्याच्या हद्दित 41 पैकी तीन जणांचे तर आश्वी पोलीस ठाण्याच्या हद्दित 27 चाचण्यांमधून एकाचाही निष्कर्ष पॉझिटिव्ह आला नाही. एकंदारीत संगमनेर तालुक्यातील चारही पोलीस ठाण्यांच्या हद्दित गेल्या तीन दिवसांत 460 जणांची चाचणी करण्यात आली, त्यातील 17 जण (3.70 टक्के) बाधित असल्याचे समोर आले. वरील आकडेवारीवर कटाक्ष टाकला असता सध्या शहरी रुग्णगतीला काहीसा ब्रेक असल्याचे तर ग्रामीण भागातील संक्रमण अद्यापही भरात असल्याचे दिसून येते.

संगमनेर उपविभागातील अकोले पोलीस ठाण्याच्या हद्दित आत्तापर्यंत 83 जणांची रॅपीड टेस्ट करण्यात आली असून तेथील पाच (6.02 टक्के) जणांचे तर राजूर पोलीस ठाण्याच्या हद्दित 144 जणांच्या चाचणीतून सात (4.86 टक्के) जणांना कोविडचे संक्रमण झाल्याचे समोर आले. अकोले तालुक्यातील दोन्ही पोलीस ठाण्यांचा विचार करता 227 जणांच्या चाचणीतून 12 (5.30 टक्के) जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तर उपविभागातील सर्व पाच पोलीस ठाण्यांच्या हद्दित 687 जणांच्या चाचणीतून 29 जणांचे (4.22 टक्के) अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.

