संगमनेरच्या सर्वांगीण विकासासाठी भक्कमपणे उभे राहा ः थोरात अमृत उद्योग समूहातील नूतन पदाधिकार्‍यांचा सत्कार


नायक वृत्तसेवा, संगमनेर
अडचणीतून मार्ग काढत मोठ्या कष्टातून संगमनेर तालुक्याने प्रगती साधली आहे. येथील सहकार व विकास हा राज्याला आदर्शवत ठरला आहे. सध्या संकटकाळ असला तरी प्रत्येकाने आपली जबाबदारी मनापासून पार पाडत तालुक्याच्या विकासासाठी भक्कमपणे उभे राहा, असे प्रतिपादन काँग्रेस विधीमंडळ पक्षनेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी केले आहे.

सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या अतिथीगृहावर अमृत उद्योग समूहातील विविध संस्थांच्या पदाधिकार्‍यांचा सत्कार माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर आमदार डॉ. सुधीर तांबे, अ‍ॅड. माधव कानवडे, दुर्गा तांबे, रणजीतसिंह देशमुख, कर्करोगतज्ज्ञ डॉ. जयश्री थोरात, राज्य सहकारी साखर संघाचे उपाध्यक्ष बाबा ओहोळ, आर. बी. रहाणे आदी उपस्थित होते.

संगमनेर तालुका हा एक परिवार आहे. तालुक्याच्या यशामध्ये सर्वांचा वाटा असल्याने संगमनेर हा राज्यात दिमाखाने उभा आहे. निळवंडेचे पाणी दुष्काळी भागाला देणे हे आपल्या जीवनाचे ध्येय आहे. अनंत अडचणींवर मात करून निळवंडे धरण आपण पूर्ण केले. बोगद्यांची कामे मार्गी लावली. मात्र 2014 ते 19 काळात कालव्यांची कामे थंडावली होती. 2019 नंतर पुन्हा कालव्यांच्या कामाला मोठी गती दिली. मोठा निधी मिळवला. रात्रंदिवस काम सुरू होते. ऑक्टोबर 2022 मध्येच दुष्काळी भागातील शेतकर्‍यांच्या शेतात निळवंडेचे पाणी देण्यासाठी आपण काम सुरू ठेवले होते. मात्र जूनमध्ये सत्तांतर झाले आणि कालव्यांची कामे थांबली. निळवंडेच्या कालव्यांची काम बंद करणे म्हणजे दुष्काळग्रस्तांच्या अन्नात माती कालवण्यासारखे आहे. मात्र कालव्यांची कामे लवकरात लवकर झाली पाहिजे. निळवंडेचे पाणी दुष्काळग्रस्तांच्या शेतात गेले पाहिजे यासाठी आपला कायम आग्रह राहणार असल्याचे माजी मंत्री बाळासाहेब थोरात यावेळी म्हणाले.

याप्रसंगी मिलिंद कानवडे, सोमेश्वर दिवटे, रामदास वाघ, रामहरी कातोरे, संपत डोंगरे, अभिजीत ढोले, रोहिदास पवार, सुभाष सांगळे, शांताराम कढणे, नवनाथ महाराज आंधळे, भारत मुंगसे, निर्मला गुंजाळ, बेबी थोरात, कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर आदिंसह अमृत उद्योग समूहातील विविध संस्थांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रास्ताविक बाबा ओहोळ यांनी केले तर उपाध्यक्ष संतोष हासे यांनी आभार मानले.

Visits: 16 Today: 1 Total: 116130

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *