अभियांत्रिकी विद्यार्थ्याच्या खून प्रकरणाचा अद्यापही उलगडा नाही! खुनाचे कारणच समजेना; मोबाईलही गायब असल्याने गुंता वाढला..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
शुक्रवारी सकाळी सुकेवाडी रस्त्यावरील नाटकीनाल्याच्या कडेला आढळलेल्या अनोळखी मृतदेहाची ओळख पटविण्यात पोलिसांना यश आले असले तरीही त्यापलिकडे तपासात मात्र फारशी प्रगती झालेली नाही. उत्तरिय तपासणीत मयत तरुणाच्या डोक्यात टणकदार वस्तूने प्रहार केल्याने त्याचा मृत्यू झाला असा स्पष्ट निष्कर्ष समोर आल्याने प्रथमदर्शनी हा खुनाचा प्रकार समजून पोलिसांनी तपास सुरु केला आहे. मयताच्या कुटुंबाकडूनही अद्याप कोणतीही तक्रार दाखल करण्यात आलेली नाही. या तरुणाचा खून कशासाठी झाला आहे हे देखील अद्याप स्पष्ट झालेले नसून त्याचा मोबाईलही गायब असल्याने प्रकरणाचा गुंता अधिक वाढला आहे. तो सोडवून गुन्हेगारांपर्यंत पोहोचण्याचे मोठे आव्हान शहर पोलिसांसमोर आहे.

शुक्रवारी (ता.9) सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास सुकेवाडी रस्त्यावरील पुनर्वसन वसाहतीच्या काही अंतरावर नाटकीनाल्याच्या कडेला एका अज्ञात व्यक्तिचा मृतदेह असल्याची माहिती संगमनेर पोलिसांना समजली. त्यानुसार पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी जावून पाहणी केली. मात्र मयताजवळ ओळख स्पष्ट करणारा कोणताही पुरावा आढळला नाही. याबाबतची माहिती मिळाल्यानंतर दैनिक नायकने सदरील मयत तरुणाच्या छायाचित्रासह पोलिसांकडून प्राप्त झालेल्या माहितीचा समावेश असलेले सविस्तर वृत्त प्रसिद्ध केले. समाज माध्यमातही याबाबत आवाहन केले गेले. त्याला काही वेळातच प्रतिसाद मिळाला आणि मयत तरुण हा अकोले तालुक्यातील नवलेवाडीचा रहिवाशी संकेत सुरेश नवले (वय 22) असल्याचे समोर आले.

शिक्षकाचा मुलगा म्हणून संस्कारांची शिदोरी घेवून अमृतवाहिनी शिक्षण संकुलातील माहिती व तंत्रज्ञान शाखेत अभियांत्रिकीचे शिक्षण घेणार्या संकेत सुरेश नवले या विद्यार्थ्याचा असा अचानक डोक्यात टणकदार वस्तूने प्रहार करुन निर्घून खून होणं ही गोष्ट महाविद्यालयातील त्याच्या मित्रांमध्येही धक्कादायक ठरली आहे. मयत तरुणाचा मृतदेह सापडल्यापासूनच पोलिसांनी खूनाचा संशय व्यक्त करुन त्यादृष्टीने तपास सुरु केला होता. त्याची ओळख पटल्यानंतर त्याच्या घुलेवाडी शिवारातील खोलीचीही तपासणी करण्यात आली. मात्र तेथून फारसं काही हाती लागलं नाही.

पोलिसांकडून या विद्यार्थ्याच्या महाविद्यालयातील मित्रांकडूनही माहिती काढण्याचे काम सुरु आहे. मात्र तेथूनही तपासाला दिशा मिळालेली नाही. अशा प्रकारात मोबाईलची भूमिका फार महत्वाची असते. मात्र या घटनेपासूनच मयत विद्यार्थ्याचा मोबाईल गायब असल्याने या प्रकरणाचा गुंता अद्याप सुटलेला नाही. अर्थात तपास यंत्रणांच्या जोडीला आता तंत्रज्ञानही असल्याने मोबाईल हाती नसतांनाही पोलिसांना बर्याच गोष्टींचा उलगडा करता येतो. त्यादृष्टीनेही पोलिसांकडून गुन्हेगारांचा माग काढण्याचा प्रयत्न सुरु आहे. आत्तापर्यंतच्या तपासात सदरील विद्यार्थ्याचा खून कशासाठी केला गेला? हेच समोर आलेलं नाही.

खुनामागील उद्देश हा तपासाचा मूळभाग आहे. त्याचा उलगडा झाल्याशिवाय तपासाला गती येणार नाही. त्यामुळे प्रभारी उपविभागीय पोलीस अधिकारी संजय सातव यांनी पोलीस निरीक्षक राजेंद्र भोसले यांच्यासह या प्रकरणाचा तपास हाती घेतला असून दोन स्वतंत्र पथकांद्वारे प्रत्येक बारकावा तपासला जात आहे. सदर तरुणाचे शवविच्छेदन करणारे घुलेवाडीचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सुनील बेलोटे यांनी दैनिक नायकशी बोलताना या तरुणाच्या डोक्यात टणकदार वस्तूचा जोरदार प्रहार झाल्यानेच त्याचा मृत्यू झाल्याचे सांगितले. सामान्यतः अपघातात अशा प्रकारची जखमं होत नसल्याचे त्यांनी सांगितला. हा खुनाचाच प्रकार असल्याच्या शक्यतेला त्यांनी नकार दिला नाही. त्यामुळे आत्तापर्यंत अकस्मात असलेल्या या घटनेची नोंद लवकरच भारतीय दंडसंहितेच्या खुनाच्या कलमांमध्ये परावर्तीत होईल. मात्र त्यांच्या कुटुंबाकडून अद्याप शहर पोलीस ठाण्यात कोणतीही तक्रार दाखल करण्यात आलेली नाही.

