पठारभागातील म्हसवंडीचा धबधबा खुणावतोय पर्यटकांना यंदाच्या पावसाळ्यातील पहिला धबधबा लागला कोसळू..

नायक वृत्तसेवा, घारगाव
पाणलोटकामाच्या माध्यमातून जगाच्या नकाशावर पोहोचलेल्या म्हसवंडी (ता.संगमनेर) येथील चिचाडी धबधबा हा कोसळू लागल्याने पर्यटकांना खुणावत आहे. मूळात पठारभागाची दुष्काळी भाग म्हणून ओळख आहे. मात्र, पावसाळ्यात येथील निसर्ग नटत असतो. या परिसरात अनेक धबधबे असून हजारो पर्यटक येथे भेटी देत असतात. यावर्षी चिचाडी हा पहिला धबधबा कोसळू लागल्याने पर्यटकांची पावले तिकडे वळू लागली आहे.

पठारभागात कधी मोठ्या तर कधी अत्यल्प पाऊस पडतो. मात्र, पाण्याचे जलसाठे कमी असल्याने उन्हाळ्यात पाणी टंचाईच्या झळा पोहोचतात. यावर्षी देखील पावसाची सुरूवात होईपर्यंत टँकरद्वारे पिण्याचा पाण्याचा पुरवठा सुरू होता. या भागातील अनेक गावांनी जलसंधारणाची कामे केली आहे. तरी देखील दुष्काळाच्या झळा बसतात. यातीलच पाणलोटक्षेत्राच्या माध्यमातून जगाच्या नकाशावर म्हसवंडी गावाने ओळख मिळविलेली आहे. येथील निसर्ग हा पावसाळ्यात पर्यटकांना नेहमी साद घालत आला आहे. या गावापासूनच अवघ्या पाच-दहा मिनिटांच्या अंतरावर व निसर्गाच्या कुशीत वसलेला हा धबधबा सध्या धोऽऽ धोऽऽ कोसळत आहे.

सध्या सर्वत्रच पावसाची दमदार बरसात सुरू असल्याने ओढे-नाले वाहू लागले आहेत. पठारभागातही पावसाचा जोर टिकून असल्याने येथील पाण्याचे प्रपात फेसाळू लागले आहेत. यातीलच चिचाडी हा पहिला धबधबा कोसळू लागल्याने पर्यटक हा नजारा अनुभवण्यासाठी गर्दी करु लागले आहे. याचबरोबर येथील निसर्गही जणू हिरवा शालू पांघरल्यासारखा दिसत आहे.

Visits: 188 Today: 2 Total: 2163192

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *