साईभक्तांची फसवणूक करणार्यांविरोधात गुन्हा दाखल शिर्डी पोलिसांनी गंभीर दखल घेत तपास केला सुरू
नायक वृत्तसेवा, शिर्डी
श्री साईबाबा संस्थानच्या नावाखाली साईभक्तांची फसवणूक करणार्या बनावट संस्थेच्या विरोधात शिर्डी पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. साई दर्शनासाठी देश-विदेशातून मोठ्या प्रमाणावर साईभक्त येत असतात. साईंची ख्याती जगभर असल्याने कोट्यवधी साईभक्त संस्थानची माहिती वेगवेगळ्या माध्यमातून शोधत असतात. काही दिवसांपासून साईभक्तांची फसवणूक होत असल्याच्या तक्रारी साईबाबा संस्थानकडे आलेल्या होत्या.
बनावट संस्था फेसबुक व इंस्टाग्राम अकाउंटच्या माध्यमातून साईबाबा संस्थान शिर्डीच्या नावाने दान मागत असल्याबाबतची माहिती मिळाली होती. त्याबरोबरच साई समाधीचे विनापरवाना लाईव्ह दर्शन दाखवतात असे देखील निदर्शनास आले होते. साई संस्थानच्या तदर्थ समितीपुढे हा विषय चर्चेसाठी आला होता. अशाप्रकारे भक्तांची फसवणूक करणार्या अज्ञात कंपन्यांवर कायदेशीर कारवाई करण्याचा निर्णय तदर्थ समितीने घेतला होता.
या अनुषंगाने आयटी विभागाच्या वरिष्ठ अधिकार्यांनी देखील कारवाई करा, अशा सूचना दिलेल्या होत्या. आयटी विभागाच्या कर्मचार्यांनी अशा बनावट संस्थांचा शोध घेतला असता बनावट संस्था इंस्टाग्राम व फेसबुक अकाउंट लाईव्ह दर्शन देणारे बदनामी करणार्या वेबसाईट मिळून आल्या. त्याबरोबरच साईबाबा संस्थानच्या नावाने देणगी मागणार्या संस्था देखील निदर्शनास आल्या. साईबाबा संस्थानच्या नावाचा वापर करून साईभक्तांकडून देणगी मागितली जात असल्याबाबतची अवलोकन करता निदर्शनास आले. अशा वेबसाईट, यूट्युब अकाउंट, फेसबुक अकाउंटवर साईबाबांची बदनामी करणारा मजकूर प्रसिद्ध केल्याचे देखील दिसून आले. त्याबरोबरच साईबाबा संस्थान टाटा स्काय यांना लाईव्ह दर्शन दाखवण्यास परवानगी दिलेली असताना इतर कोणासही परवानगी दिलेली नसताना देखील साईबाबा समाधी मंदिरातील दर्शन व्यवस्था दाखवले जात असल्याचे दिसून आले. त्याबाबत अशा बनावट संस्थेची यादी तयार करून साईबाबा संस्थान व साईभक्तांची फसवणूक करुन देणगी मागणार्या संस्था त्यांचे चेअरमन, पदाधिकारी व जबाबदार व्यक्ती दिशाभूल करणारे फेसबुक प्रोफाईल ग्रुप साईभक्तांची दिशाभूल करणारे व्यक्तींच्या विरोधात साईबाबा संस्थाने शिर्डी पोलिसांत दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी यादीनुसार अशा संस्थांविरोधात भादंवि 419, 420, 500, माहिती तंत्रज्ञान अधिनियम 2000/66 माहिती तंत्रज्ञान अधिनियम 2000/ 66( सी) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन शिर्डी पोलिसांनी तपास सुरू केला आहे.