डॉक्टर अरुण इथापे यांच्यावर पोक्सोसह ॲट्रोसिटीतंर्गत गुन्हा दाखल! सामाजिक कार्य करणारा कार्यकर्ता; शिक्षण व वैद्यकीय क्षेत्रात उडाली एकच खळबळ..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
संगमनेरच्या सामाजिक क्षेत्रात वेगळा दबदबा असलेल्या डॉ.अरुण इथापे यांच्यावर बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यासह (पोक्सो) व अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये (ॲट्रोसिटी) गुन्हा दाखल झाल्याने संगमनेरच्या शिक्षण व वैद्यकीय क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पीडित तेरा वर्षीय मुलीच्या अनुषंगाने तिच्या 23 वर्षीय बहिणीने दिलेल्या फिर्यादीवरुन संगमनेर शहर पोलीस ठाण्यात वरील कायद्यातील तरतुदीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डॉ.इथापेंसारख्या सामाजिक कार्यकर्त्यावर अशा प्रकारचा गुन्हा दाखल झाल्याने संगमनेरातून आश्चर्य व्यक्त होत आहे.
याबाबत सोनगाव सात्रळ येथे राहणाऱ्या पीडित मुलीच्या २३ वर्षीय बहिणीच्या तक्रारीवरुन संगमनेर शहर पोलीस ठाण्यात डॉ.अरुण इथापे यांच्यावर वरील प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानुसार सदरची घटना गेल्या महिन्यात 29 नोव्हेंबर रोजी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास संगमनेर शहरालगतच्या गुंजाळवाडी शिवारातील गोल्डन सिटीत असलेल्या प्रियदर्शनी ग्रामीण व आदिवासी विकास संस्थेत घडल्याचे म्हटले आहे. मूळच्या अकोले तालुक्यातील सुगाव येथील रहिवासी असलेली एक १३ वर्षीय विद्यार्थिनी गेल्या दीड वर्षांपासून संगमनेरातील उपनगरात असलेल्या एका कन्या विद्यालयात शिक्षण घेत आहे, त्यासाठी ती डॉ.इथापे यांच्या याच वसतिगृहात निवासी रहाते.
गेल्या महिन्यातील २९ नोव्हेंबर रोजी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास डॉ.इथापे हे सदरील संस्थेत पाहणी करण्यासाठी आले होते‌. यावेळी ते तेथून बाहेर जाण्यासाठी निघाले असता सदरील वसतिगृहातील एका शिक्षिकेने सदरील तेरा वर्षीय पीडित मुलीला त्यांच्या कारचा दरवाजा उघडण्यास सांगितले. मात्र त्यावेळी डॉ.इथापे फोनवर कोणाशीतरी बोलत असल्याने त्यादरम्यान पीडित मुलीने आपल्या दुसऱ्या मैत्रिणीला हाक मारुन बोलाविले. त्याचवेळी डॉ.इथापे व पीडित मुलीचा एकमेकांशी संवाद झाला. मात्र त्यावेळी त्या ठिकाणी सदरील महिला शिक्षिकाही उपस्थित होत्या हे विशेष.
तक्रारीत म्हटल्यानुसार डॉ.इथापे यांचा फोन संपल्यानंतर त्यांनी पीडितेला उद्देशून ‘तुम्ही बाथरुम मध्ये जाऊन काय करता?, लघवीला कसे बसतात?, आतून कपडे काय घालतात?, उद्या नवऱ्याच्या घरी गेल्यावर काय करणार?’ असे सवाल विचारीत ‘चल गाडीत बस’ असे म्हटले. त्यांचे हे बोलणे पीडित विद्यार्थिनीला अश्लील व अनपेक्षित वाटले, त्यामुळे या घटनेनंतर तिने वसतिगृहातील ‘त्याच’ शिक्षिकेकडे घरी फोन करण्यासाठी मोबाईल मागितला. मात्र ‘ही गोष्ट सांगायची असेल तर, मी फोन देणार नाही’ अशी भूमिका घेत त्या शिक्षिकेने मोबाईल देण्यास नकार दिला. त्यामुळे पीडितेने घटनेच्या दुसऱ्या दिवशी अन्य शिक्षिकेच्या मोबाईल वरुन रात्री नऊच्या सुमारास सोनगाव सात्रळ येथे राहणाऱ्या आपल्या मोठ्या बहिणीला फोन करुन सदरचा प्रकार सांगितला.
हा प्रकार ऐकून आपल्या बहिणी बरोबर काहीतरी वेगळेच घडत आहे किंवा घडले आहे असे समजून पीडित विद्यार्थिनीची बहीण या घटनेच्या तिसऱ्या दिवशी म्हणजे ०१ डिसेंबर रोजी संगमनेरातील प्रियदर्शनी ग्रामीण व आदिवासी विकास संस्थेत आली व तिने आपल्या बहिणीला सोबत घेऊन अकोले तालुक्यातील सुगाव हे आपले माहेर गाठले. त्यानंतर आज (ता.४) सायंकाळी पीडितेच्या याच 23 वर्षीय बहिणीने संगमनेर शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार संगमनेर पोलिसांनी डॉ.अरुण इथापे यांच्यावर भारतीय दंड संहितेचे कलम ३५४ (ए), ५०९ सह बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याचे (पोक्सो) कलम 12, अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याचे कलम ३ (१) (आर), ३ (१) (यु), ३ (१) (डब्ल्यू) (ii) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.
डॉ.अरुण इथापे यांना संगमनेरच्या सामाजिक क्षेत्रात वेगळे वलय प्राप्त आहे. गेल्या अनेक वर्षांपासून ते संगमनेरातील गोल्डन सिटीत प्रियदर्शनी ग्रामीण व आदिवासी विकास संस्थेच्या माध्यमातून आदिवासी विद्यार्थ्यांसाठी व त्यांच्या शिक्षणासाठी मोठे काम करीत आहेत. त्यांच्या याच संस्थेतील एका अल्पवयीन आदिवासी विद्यार्थीनीने त्यांच्यावर अशा प्रकारचा आरोप करीत गुन्हा दाखल केल्याने संगमनेरच्या सामाजिक क्षेत्रासह वैद्यकीय क्षेत्रातही एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणाच्या सखोल तपासातून वास्तव समोर येणारच आहे. या प्रकरणाचा तपास संगमनेरचे प्रभारी उपविभागीय पोलीस अधिकारी संजय सातव करीत आहेत.
Visits: 248 Today: 3 Total: 1421973

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *