उमेदवारी दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी उमेदवारांची धावपळ! ग्रामपंचायत निवडणूक : सदस्यपदासाठी 1325, सरपंचपदासाठी 251 अर्ज दाखल..
नायक वृत्तसेवा, संगमनेर
ऑनलाईन अर्ज दाखल करण्यात वारंवार उद्भवणार्या अडचणींमुळे राज्य निवडणूक आयोगाने इच्छुकांना दिलासा देतांना उमेदवारी दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी वेळेत वाढ करण्यासह ऑफलाईन अर्ज दाखल करण्याचीही मुभा दिली होती. त्यामुळे शुक्रवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी जिल्ह्यातील 203 ग्राम पंचायतींच्या सदस्य आणि सरपंचपदाचे अर्ज दाखल करण्यासाठी इच्छुकांची आपल्या समर्थकांसह एकच झुंबड उडाल्याचे चित्र दिसून आले. आयोगाकडून मिळालेल्या वाढीव वेळेचा सद्पयोग करतांना जिल्ह्यात एकाच दिवशी सदस्यपदासाठी तब्बल 5 हजार 56 तर सरपंचपदासाठी 884 उमेदवारी अर्ज दाखल झाले. यात संगमनेर तालुक्यातील 37 ग्रामपंचायतीमधील 935 सदस्यपदासह 174 सरपंचपदाच्या अर्जांचा समावेश आहे. संपूर्ण जिल्ह्यात सदस्यपदासाठी शेवटच्या दिवसापर्यंत एकूण 7 हजार 94 तर सरपंच पदासाठी 1 हजार 282 इच्छुकांनी आपले अर्ज दाखल केले आहेत.
ग्रामपंचायत निवडणुकांच्या ऑनलाईन अर्ज भरण्याच्या प्रक्रियेत वारंवार सर्व्हर डाऊन झाल्याने इच्छुकांची मोठी दमछाक झाली होती. त्यामुळे राज्य निवडणूक आयोगाने उमेदवारी दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी शुक्रवारी (ता.2) अडीच तासांचा अतिरीक्त वेळ देण्यासह इच्छुकांना ऑफलाईन अर्ज दाखल करण्याचीही मुभा दिली होती. त्यामुळे जिल्ह्यातील 203 ग्रामपंचायतींसह संगमनेर तालुक्यातील 37 ग्रामपंचायतीच्या सदस्य व सरपंचपदासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांची तहसील कार्यालयात झुंबड उडाल्याचे दिसून आले.
संगमनेर तालुक्यातील 37 ग्रामपंचायतींच्या 133 सदस्यांसह थेट जनतेतून निवडून येणार्या सरपंच पदासाठी येत्या 18 डिसेंबररोजी मतदान होत आहे. ऑनलाईन-ऑफलाईनच्या गोंधळात अनेकांना उमेदवारी दाखल करण्यात अडचणी आल्याने शुक्रवारी यासर्वांनी आपल्या समर्थकांसह तहसील कार्यालयात मोठी गर्दी केली होती. त्यामुळे गुरुवारपर्यंत सदस्यपदासाठी अवघे 252 तर सरपंचपदासाठी 46 अर्ज दाखल झालेले असतांना शुक्रवारी त्यात जवळपास चारपट वाढ होवून एकट्या संगमनेर तालुक्यात एकाच दिवशी सदस्यपदासाठी विक्रमी 935 अर्जांसह सरपंचपदासाठी 174 अर्ज दाखल झाले. तर, शेवटच्या दिवसापर्यंत सदस्यपदासाठी एकूण 1 हजार 325 अर्जांसह सरपंचपदासाठी एकूण 251 जणांनी आपली उमेदवारी दाखल केली आहे.
तालुक्यातील 37 ग्रामपंचायतींच्या सदस्यपदासाठी दाखल झालेले अर्ज पुढील प्रमाणे (कंसात निवडून द्यायची सदस्य संख्या) – साकूर (6) 71, खराडी (3) 11, वाघापूर (3) 15, चिंचोली गुरव (4) 53, जांभुळवाडी (3) 37, रणखांबवाडी (3) 20, दरेवाडी (3) 15, जांबुत बु. (3) 25, कर्जुले पठार (3) 18, डोळासणे (3) 20, पिंपरणे (4) 22, कोल्हेवाडी (5) 86, कोळवाडे (3) 17, मालुंजे (3) 34, आंभोरे (4) 65, निंबाळे (3) 17, जोर्वे (5) 86, वडझरी बु. (3) 18, वडझरी खुर्द (3) 15, निमोण (4) 72, तळेगाव दिघे (5) 54, हंगेवाडी (3) 20,
कनकापूर (3) 18, करुले (3) 21, निळवंडे (3) 18, पोखरी हवेली (3) 27, सादतपूर (3) 36, रहिमपूर (3) 36, उंबरी बाळापूर (4) 59, निमगाव जाळी (5) 33, ओझर खुर्द (3) 24, धांदरफळ खुर्द (4) 16, धांदरफळ बु. (5) 80, निमगाव भोजापूर (3) 24, चिकणी (3) 48, सायखिंडी (3) 14 व घुलेवाडी ग्रामपंचायतीच्या 6 सदस्यपदासाठी एकूण 72 जणांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. यात कोल्हेवाडी आणि जोर्वे ग्रामपंचायतीसाठी विक्रमी प्रत्येकी 86 अर्ज दाखल झाले असून येत्या सोमवारी अर्जांची छाननी व त्यानंतर बुधवारपर्यंत (ता.7) उमेदवारी अर्ज माघारी घेता येणार आहेत.
सदस्यपदासह तालुक्यातील 37 ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाची निवडणुकही थेट जनतेतून होणार असून त्यासाठी तालुक्यातील एकूण 251 जणांनी आपली उमेदवारी दाखल केली आहे. त्यात (कंसात आरक्षण) साकूर (सर्वसाधारण महिला) 6, खराडी (सर्वसाधारण महिला) 4, चिंचोली गुरव (मागास प्रवर्ग) 9, जांभुळवाडी (सर्वसाधारण महिला) 6, रणखांबवाडी (सर्वसाधारण) 10, दरेवाडी (सर्वसाधारण) 4, जांबुत बु. (सर्वसाधारण महिला) 3, कर्जुले पठार (सर्वसाधारण महिला) 6, डोळासणे (मागास प्रवर्ग महिला) 2, पिंपरणे (अनुसूचित जमाती) 4,
कोल्हेवाडी (सर्वसाधारण महिला) 16, कोळवाडे (मागास प्रवर्ग महिला) 2, मालुंजे (सर्वसाधारण महिला) 3, आंभोरे (सर्वसाधारण महिला) 8, निंबाळे (सर्वसाधारण महिला) 7, जोर्वे (सर्वसाधारण महिला) 17, वडझरी बु. (सर्वसाधारण महिला) 4, निमोण (सर्वसाधारण) 19, वडझरी खुर्द (सर्वसाधारण) 11, तळेगाव दिघे (मागास प्रवर्ग महिला) 8, हंगेवाडी (सर्वसाधारण महिला) 3, कनकापूर (सर्वसाधारण महिला) 5, करुले (मागास प्रवर्ग) 8, निळवंडे (सर्वसाधारण महिला) 3, पोखरी हवेली (अनुसूचित जमाती) 3, सादतपूर (सर्वसाधारण) 9, रहिमपूर (मागास प्रवर्ग महिला) 6,
उंबरी बाळापूर (सर्वसाधारण महिला) 12, निमगाव जाळी (मागास प्रवर्ग महिला) 4, ओझर खुर्द (सर्वसाधारण महिला) 9, धांदरफळ खुर्द (मागास प्रवर्ग महिला) 3, धांदरफळ बु. (सर्वसाधारण महिला) 8, निमगाव भोजापूर (सर्वसधारण महिला) 4, चिकणी (अनुसूचित जमाती महिला) 6, घुलेवाडी (सर्वसाधारण महिला) 12 अशा एकूण 251 जणांनी सरपंच पदासाठी अर्ज दाखल केले असून सायखिंडीच्या सरपंचपदासाठी एकच उमेदवारी अर्ज दाखल झाला आहे. छाननीत तो अर्ज कायम राहिल्यास येथील सरपंचपदाची एकमेव लढत बिनविरोध ठरणार आहे.
येत्या 18 डिसेंबररोजी होत असलेल्या तालुक्यातील 37 ग्रामपंचायतींच्या 133 प्रभागातील 367 सदस्य व 37 सरपंचपदाच्या निवडणुकीसाठी तालुका निवडणूक निर्णय अधिकारी अमोल निकम यांनी 26 निवडणूक निर्णय अधिकार्यांची नेमणूक केली आहे. या निवडणुकीत एकूण 99 हजार 386 मतदार मतदानाचा हक्क बजावणार असून त्यात 47 हजार 614 महिला मतदारांचा समावेश आहे. सोमवारी (ता.5) दाखल अर्जांची छाननी होईल, बुधवारपर्यंत (ता.7) उमेदवारी अर्ज माघारी घेता येतील व त्याच दिवशी दुपारी तीन वाजेनंतर उमेदवारांना चिन्हांचे वाटपही होईल. रविवार 18 डिसेंबररोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत मतदान प्रक्रिया पार पडून मंगळवार 20 डिसेंबररोजी मतमोजणी होईल.