संगमनेरच्या वाहतूक व्यवस्थेचा उडाला बोजवारा! शाखा असूनही उपयोग नाही; पाच-सात कर्मचार्‍यांच्या खांद्यावर हजारो वाहनांचा भार

नायक वृत्तसेवा, संगमनेर
संगमनेर शहर म्हणजे दोन महानगरांना एकमेकांशी जोडणार्‍या महामार्गासह उत्तर भारतातून दक्षिणेकडे जाण्यासाठी महत्त्वाचा मार्ग समजल्या जाणार्‍या पुणे-नाशिक या राष्ट्रीय महामार्गावरील एक प्रगत शहर. गेल्या काही दशकात येथील ऐतिहासिक बाजारपेठेच्या कक्षा रुंदावल्याने व त्यातच दळणवळणासारख्या संसाधनांचाही मोठ्या प्रमाणात विकास झाल्याने, या मार्गावरील वाहतूकही त्या प्रमाणात वाढली आहे. मात्र या वाहतुकीचे नियमन करण्यात संगमनेर शहर पोलीस सतत अपयशी ठरत असून सामान्य नागरिकांना त्याचे परिणाम भोगावे लागत आहेत. विशेष म्हणजे संगमनेर उपविभागासाठी स्वतंत्र वाहतूक शाखा असूनही शहराच्या वाहतूक व्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे. शहरात वाहतुकीबाबत कोणतेही नियोजन नसल्याने अंतर्गत भागातही जागोजागी होणारी वाहतूक कोंडी सामान्यांसाठी मात्र डोकेदुखी ठरत आहे. शाखेसाठी स्वतंत्र कर्मचार्‍यांची नेमणूक असतानाही मोजक्या कर्मचार्‍यांकडून हजारो वाहनांचे नियमन केले जात असल्याने हे कर्मचारी त्यात अपयशी ठरत आहेत. स्थानिक अधिकार्‍यांनी या गोष्टीचा गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे.

अगदी प्राचीन कालावधीपासून अमृतवाहिनीच्या काठावर वसलेल्या संगमनेरच्या बाजारपेठेचे महत्त्व वर्णिले गेले आहे. शिवकाळातही संगमनेरची बाजारपेठ वारंवार उल्लेखित झालेली आहे. येथून होणारा व्यापार त्या काळातही आसपासच्या जिल्ह्यांपर्यंत विस्तारलेला होता. त्यामुळे संगमनेरच्या बाजारपेठेला जिल्ह्यात वेगळे स्थान आहे. अगदी प्राचीन काळापासून नाशिक आणि त्याच्या आसपासचे जिल्हे व गुजरात मधून दक्षिणेकडे जाण्यासाठी संगमनेर, चंदनापुरी घाट, आळेफाटा, जुन्नर या मार्गांचा वापर झाल्याचे दाखले इतिहासात आढळतात. त्यामुळे ज्याप्रमाणे संगमनेरच्या बाजारपेठेला ऐतिहासिक महत्त्व आहे, त्याप्रमाणे पुणे-नाशिक या महामार्गालाही तेवढेच महत्त्व आहे.

दिवसेंदिवस या महामार्गावरील वाहतूक वाढल्याने राष्ट्रीय महामार्ग विभागाने रस्त्याचे चौपदरीकरण करुन वाहतुकीचा ताण कमी करण्याचा प्रयत्न केला. गेल्या काही दशकांमध्ये ज्याप्रमाणे रस्त्यांची संख्या वाढली त्या प्रमाणात त्यावरुन धावणार्‍या वाहनांची संख्याही अनेक पटींनी वाढली आहे. त्यामुळे साहजिकच वाहतुकीचे नियमन, अपघात, रस्त्यांची अवस्था या गोष्टी वारंवार उद्भवतात आणि त्यातून जनक्षोभ निर्माण होतो. अशीच स्थिती सध्या संगमनेरात बघायला मिळत आहे. शहरातील अंतर्गत भागातील सर्वच प्रमुख रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झालेली असल्याने वारंवार वाहतुकीचा खोळंबा होतो. त्यामुळे नागरिकांना चौका-चौकात अडकून पडावे लागत आहे. सामान्य संगमनेरकरांना पोलिसांकडून रात्रीची सुरक्षित झोप आणि दिवसा शहरातील कोणत्याही भागात अनिर्बंध, विनाअडथळा वावर या दोनच गोष्टी अपेक्षित असतात. मात्र संगमनेर शहर पोलीस ठाणे संगमनेरकरांच्या या दोन्ही गोष्टी पूर्ण करण्यात अपयशी ठरले आहेत. एकीकडे महामार्गासह चौका-चौकात होणारी वाहतूक कोंडी आणि दुसरीकडे रात्रीच्या सुमारास होणार्‍या चोर्‍या आणि दुचाकी वाहने लांबविण्याचे प्रकार हेच सांगत आहेत.

तत्कालीन जिल्हा पोलीस प्रमुख रंजन कुमार शर्मा यांनी अडगळीत गेलेल्या जिल्ह्यातील संगमनेर व श्रीरामपूर उपविभागाच्या वाहतूक शाखांना नव संजीवनी दिली होती. त्यावेळी त्यांनी संगमनेरच्या उपशाखेला एका सहाय्यक पोलीस निरीक्षकासह पंधरा पोलीस कर्मचारी आणि एक सरकारी वाहन असे बळ देऊन सुरळीत आणि अपघात मुक्त वाहतुकीची संकल्पना राबविण्याचा प्रयत्न केला. सहाय्यक निरीक्षक गोपाळ उंबरकर, पप्पू कादरी यासारख्या अधिकार्‍यांनी या बळाचा योग्य वापर करुन संगमनेरच्या वाहतूक व्यवस्थेला शिस्तही लावली होती. मात्र त्यानंतर आलेल्या पोलीस अधीक्षकांनी वाहतूक शाखेचे नियंत्रण स्थानिक पोलीस ठाण्याच्या निरीक्षकांकडे सोपविल्याने या कर्मचार्‍यांचा अन्य गुन्ह्यांच्या तपासासाठी अथवा कामासाठी वापर होऊ लागला. वाहतूक हा स्थानिक निरीक्षकांसाठी एकूण कामाच्या एक भाग असल्याने त्याकडे नंतरच्या पोलीस निरीक्षकांनीही फारसे गांभीर्याने पाहिले नाही. त्यामुळे सध्या अवघे पाच ते सात कर्मचारी संगमनेरातून होणार्‍या संपूर्ण वाहतुकीचे नियमन करीत आहेत. म्हणजेच बोटावर मोजता येतील इतक्याच पोलिसांच्या खांद्यावर हजारो वाहनांचा भार टाकल्यावर सुरळीत वाहतुकीची अपेक्षा तरी कशी करावी?. तरीही हे कर्मचारी जिवाचे रान करीत आपले कर्तव्य बजावीत आहेत. मात्र या वाहतुकीबाबत ज्या पोलीस निरीक्षकांनी नियोजन करणे अपेक्षित आहे, त्यांच्याकडून कोणतीही कारवाई होत नसल्याने संगमनेरात वाहतुकीचा बोजवारा उडाला आहे.

Visits: 45 Today: 1 Total: 116089

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *