वैभवशाली शहरातील सर्व रस्ते मान्सूनच्या पाण्याखाली! तासाभरापासून शहर ठप्प; मान्सूनची पदार्पणातच धुवॉधार बॅटींग..


नायक वृत्तसेवा, संगमनेर
सोमवारी कोकण किनारपट्टीसह मुंबई व उपनगरं आणि पश्‍चिम महाराष्ट्राला व्यापणार्‍या मान्सूनचे आज संगमनेर तालुक्यातही जोरदार आगमन झाले. दुपारी चारच्या सुमारास सुरु झालेल्या मान्सूनच्या पहिल्याच पावसाने फेरीविक्रेते, पादचारी आणि वाहनचालकांची चांगलीच त्रेधा उडवली. जवळभपास एकतासापासून सुरु असलेल्या या पावसाने वैभवशाही शहराची टिमकी वाजवणार्‍या संगमनेर शहराचे धिंदवडे काढले असून महामार्गासह शहरातील सर्वच रस्त्यांना अक्षरशः ओढ्याचे स्वरुप प्राप्त झाले आहे.


सोमवारी (ता.10) कोकणासह पश्‍चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, सोलापूरसह अहमदनगर जिल्ह्याला मान्सूनच्या ढगांनी वेढा घातला होता. हवामान विभागाकडून या जिल्ह्यांना आज ऑरेंज इशाराही देण्यात आला होता. आज सकाळपासूनच संगमनेरातील वातावरण ढगाळ असल्याने पावसाचा अंदाज वर्तवला जात होता. मात्र दुपारपर्यंत पावसाची कोणतीही चिन्हे दिसत नसल्याने दुपारच्यावेळी रस्त्यांसह बाजारपेठा गर्दीने भरलेल्या होत्या.


अशातच दुपारी चारच्या सुमारास विजांच्या कर्णभेदी कडकडाटासह पावसाला जोरदार सुरुवात झाली. त्यामुळे बहुतेक सर्वच रस्त्यांवरील फेरीविक्रेते, पादचारी, दुचाकीस्वारांची एकच धावपळ उडाली. पावसासह जोरदार वाराही सुरु असल्याने काही फेरीक्रिेत्यांचे किरकोळ नुकसानही झाले आहे. अचानक सुरु झालेल्या पावसामूळे खरेदीसाठी बाजारात आलेल्या महिला व वृद्धांना निवारा शोधावा लागला. संगमनेरातील पर्जन्यमानानुसार दहा-पंधरा मिनिटांतच थांबेल असा बहुतेकांचा अंदाज होता, मात्र तो फोल ठरला.


जवळपास एकतासापासून सुरु असलेल्या या तुफान पावसाने संगमनेर नगरपालिकेच्या ‘विकासा’ची पुन्हा एकदा चिरफाड केली. पुणे-नाशिक महामार्ग, नवीन नगर रस्ता, छत्रपती शिवाजी महाराज स्मारक ते कटारिया कॉर्नर, अख्खे रस्ते फोडून ठेवलेली जूनी बाजारपेठ, मेनरोड, अशा महत्त्वांच्या आणि वाहतुकीच्या रस्त्यांवरुन दीड ते दोन फूट पाणी वाहत होते. शहरातील पावसाचे पाणह नैसर्गिकपणे नदीच्या दिशेने वाहत असल्याने खालच्या भागातील रंगारगल्ली, नेहरु चौक, साळीवाडा, चंद्रशेखर चौक, घासबाजार या भागामध्ये शहरातील सगळे पाणी वाहून जात असल्याने हा संपूर्ण परिसर अक्षरशः जलमय झाला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *