साई संस्थानच्या डॉक्टरांचे सोमवारी दिवसभर काम बंद आंदोलन! मंजूर असलेला प्रोत्साहन भत्ता देण्याची मागणी; रुग्ण तपासणीही खोळंबली

नायक वृत्तसेवा, शिर्डी
मंजूर असलेला प्रोत्साहन भत्ता (इन्सेटिव्ह) मिळावा, या मागणीसाठी साई संस्थानच्या रुग्णालयातील डॉक्टरांवर सोमवारी (ता.22) दिवसभर काम बंद करण्याची वेळ आली. कामाची वेळ संपल्यानंतर खोळंबलेल्या रुग्णांची डॉक्टरांनी तपासणी करून आगळ्या-वेगळ्या पद्धतीने निषेध नोंदविला. व्यवस्थापनाने डॉक्टरांच्या रुग्ण तपासणी कक्षावर नोटीसा चिकटवून कायदेशीर कारवाईची तंबी दिली.

लॉकडाऊन काळात रुग्णसंख्या रोडावल्याने डॉक्टरांचा प्रोत्साहन भत्ता स्थगित करण्यात आला होता. आता शस्त्रक्रिया व रुग्णतपासणी पूर्ववत झाल्याने पूर्वीप्रमाणे भत्ता सुरू करण्याची डॉक्टरांची मागणी आहे. मात्र, त्यास दाद दिली जात नसल्याने अखेर डॉक्टरांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला. दिवसभर काम बंद ठेवल्याने दूरवरून आलेल्या रुग्णांना ताटकळत बसावे लागले.

याबाबत काही डॉक्टरांशी चर्चा केली असता, ते म्हणाले सायंकाळी पाच वाजता कामाची वेळ संपल्यानंतर आम्ही खोळंबलेल्या रुग्णांची तपासणी केली. हा देखील निषेधाचाच भाग होता. आज तातडीची वैद्यकीय सेवा सुरू ठेवली. काही शस्त्रक्रियाही केल्या. आमचा भत्ता बंद करताना कुणाची परवानगी घेण्याची गरज वाटली नाही; मग आता भत्ता सुरू करण्यासाठी परवानगीची गरज का वाटावी? तदर्थ समिती आणि न्याय विधी खात्याची भत्ता देण्यास मान्यता आहे, तरीही भत्ता दिला जात नाही.

आंदोलन सुरू असताना शिर्डीतून मला अनेकांचे फोन आले. अत्यावश्यक सेवा सुरू ठेवून संप करणार्या डॉक्टरांची मागणी रास्त आहे. अधिवेशन संपल्यानंतर आपण त्यांच्या मागण्या मार्गी लावण्यासाठी पुढाकार घेऊ. ग्रामीण भागातील रुग्णालयात हृदय, मेंदू व अन्य गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया करणारे तज्ज्ञ डॉक्टर यायला तयार नसतात. रास्त मागणी केली म्हणून त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारणे योग्य नाही. आपण डॉक्टरांना न्याय मिळवून देण्यासाठी पुढाकार घेणार आहोत.
– सदाशिव लोखंडे (खासदार, शिर्डी)
