आनंदवार्ता! अहमदनगर जिल्ह्यातील पहिला प्रकल्प ओसंडला!! आंबित लघुप्रकल्प ओव्हर फ्लो; हंगामात पहिल्यांदाच मुळानदी वाहती झाली..

नायक वृत्तसेवा, अकोले
नाट्यमय वातावरणीय बदलांचे अडथळे पार करीत भंडारदरा व मुळा धरणाच्या पाणलोटात दाखल झालेल्या मान्सूनने अहमदनगर जिल्ह्याला पहिली सुखद् वार्ता दिली आहे. गेल्या काही दिवसांपासून या दोन्ही धरणांच्या पाणलोटात सुरु असलेल्या कमी-अधिक प्रमाणातील पावसाने मुळाखोर्यातील 193 दशलक्ष घनफूट क्षमतेचा आंबित लघुपाटबंधारे आज आश्लेषा नक्षत्राच्या पूर्वार्धात ओसंडला असून धरणाच्या भिंतीवरुन तिनशे क्युसेक पाण्याचा प्रवाह मुळानदीच्या पात्रात कोसळू लागला आहे. त्यामुळे कोतुळनजीकच्या पिंपळगाव खांड प्रकल्पात पाण्याची आवक सुरु झाली असून 600 दशलक्ष घनफूट क्षमतेचा हा प्रकल्प भरल्यानंतर जिल्ह्यातील सर्वात मोठ्या मुळा धरणात नवीन पाणी येण्याचा मार्ग प्रशस्त होणार असल्याची माहिती भंडारदर्याचे शाखा अभियंता अभिजीत देशमुख यांनी दिली.

यंदा महाराष्ट्रात नियोजित वेळेपूर्वीच मान्सूनचे आगमन होईल असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला होता. मात्र मान्सूनच्या प्रत्यक्ष प्रवासात वातावरणीय बदलांनी विविध अडथळे निर्माण केल्याने हवामान खात्याचा अंदाज फोल ठरला. त्यातच निम्म्याहून अधिक जूनचा महिना ओलांडूनही जिल्ह्यातील मुळा आणि प्रवरा नद्यांच्या खोर्यात मान्सूनचा लवलेशही दिसत नसल्याने आदिवासी बांधवांसह लाभक्षेत्रातील नागरीकांच्या नजरा आभाळाकडे खिळल्या होत्या. यंदा मान्सूनपूर्व पावसानेही पाणलोट क्षेत्राला पाठ दाखविल्याने आदिवासी पाड्यात चिंताही दाटली होती.

मात्र गेल्या आठवड्यापासून मुळा व भंडारदरा या दोन्ही धरणांच्या पाणलोट क्षेत्रात मान्सून दाखल झाला आहे. अधुनमधून कोसळणार्या मान्सूनच्या जोरदार सरी आणि उघडीप अशा पद्धतीने सध्या पाऊस सुरु असल्याने केवळ भंडारदरा धरणात किरकोळ स्वरुपात नवीन पाण्याची आवक सुरु झाली होती. मात्र गेल्या 48 तासांपासून मुळा खोर्यातील दुर्गमभागात आषाढसरींनी काहीसा जोर धरला आहे. त्याचा परिणाम मुळा नदीवरील पहिला लघुपाटबंधारे प्रकल्प असलेले आंबित धरण पूर्ण क्षमतेने भरले असून धरणाच्या भिंतीवरुन 300 क्युसेक वेगाने पाणी कोसळत आहे.

मुळा खोर्यातील आंबित प्रकल्प ओसंडल्याशिवाय मुळानदी प्रवाहित होत नाही. आता आज (ता.02) 193 दशलक्ष घनफूट क्षमतेचा हा लघुपाटबंधारे प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरल्याने चालू मोसमात पहिल्यांदाच मुळा नदी प्रवाहीत झाली असून कोतुळनजीकच्या 600 दशलक्ष घनफूट क्षमतेच्या पिंपळगाव खांड प्रकल्पात नवीन पाण्याची आवक सुरु झाली आहे. हा प्रकल्प ओसंडल्यानंतरच जिल्ह्यातील सर्वात मोठ्या क्षमतेच्या मुळा धरणात नवीन पाण्याची आवक सुरु होणार असल्याने लाभक्षेत्रातील नागरीकांच्या नजरा आता पिंपळगाव खांड प्रकल्पाच्या भिंतीकडे खिळल्या आहेत.

