लॉन्स व मंगल कार्यालय चालक मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार ः कुटे

लॉन्स व मंगल कार्यालय चालक मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार ः कुटे
नायक वृत्तसेवा, संगमनेर
राज्य सरकार 150 चौरस फूट आकाराच्या राज्य परिवहनच्या बसमध्ये 50 प्रवाशांना प्रवास करण्याची परवानगी देते. मग दहा हजार ते वीस हजार चौरस फूटपासून ते दोन एकर क्षेत्रफळ असलेल्या मंगल कार्यालयात विवाहासाठी 500 ते 1000 लोकांना किंवा हॉल क्षमतेच्या 50 टक्के लोकांना उपस्थित राहण्यासाठी परवानगी का देत नाही? असा सवाल लॉन्स व मंगल कार्यालय चालक, मंडप डेकोरेटर्स, केटरिंग बँड आदी संघटनांच्यावतीने उपस्थित करण्यात आला. या संघटनेची नुकतीच संगमनेरमध्ये बैठक झाली. त्यामध्ये विविध मागण्यांवर चर्चा होऊन महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत बैठक आयोजित करून त्यांच्यासमोर या मागण्या ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार सोमवारी (ता.5) संगमनेर-अकोले तालुक्यातील पदाधिकारी मुंबईला जाऊन चर्चा करणार आहेत, अशी माहिती संगमनेर लॉन्स व मंगल कार्यालय असोसिएशनचे अध्यक्ष गोरख कुटे, अकोलेचे अध्यक्ष रोहिदास धुमाळ यांनी दिली.


केंद्र सरकारच्या निर्णयानुसार 200 लोकांना महाराष्ट्र सरकारच्या निर्णयानुसार 100 लोकांना तर अहमदनगर जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशानुसार फक्त 50 लोकांना विवाह सोहळ्यास उपस्थित राहण्यास परवानगी आहे. त्यामुळे संभ्रम निर्माण झाला आहे. सदरचा संभ्रम दूर झाला पाहिजे. अन्यथा जानेवारीपासून मंगल कार्यालय चालक पुढील बुकिंगवर बहिष्कार टाकणार असल्याचा इशारा यावेळी देण्यात आला. मंगल कार्यालय, लॉन्स याठिकाणी विवाह सोहळ्यास उपस्थित राहण्यासाठी 500 ते 1000 लोकांना परवानगी द्यावी, ग्रामपंचायतीने व नगरपालिकेने सर्व कर माफ करावेत, बँकांनी कर्जाचे हप्ते भरण्यास मुदतवाढ द्यावी, कोरोना काळातील वीजबिल माफ करावे या मागण्या मांडण्यात आल्या. या बैठकीस संगमनेर-अकोले तालुक्यातील सर्व मंगल कार्यालय लॉन्स चालक, केटरर्स, मंडप लाईट डेकोरेशन, फ्लॉवर डेकोरेटर्स पॅकेज, सनई-चौघडा अशा विविध असोसिएशनच्या प्रतिनिधींसह संगमनेर शहर तालुका लॉन्स-मंगल कार्यालय असोसिएशनचे अध्यक्ष गोरख कुटे, उपाध्यक्ष रामनाथ कुर्‍हे, सचिव अनिल राऊत तसेच अकोले मंगल कार्यालय असोसिएशनचे अध्यक्ष रोहिदास धुमाळ, उपाध्यक्ष प्रवीण झोळेकर, सचिव संतोष नवले तसेच मंडप डेकोरेशनचे अध्यक्ष सुखदेव जोंधळे आदी उपस्थित होते.

Visits: 11 Today: 1 Total: 83406

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *