रहेमतनगरमधून पाच तोळ्यांचे दागिने चोरणारा पकडला! संगमनेर पोलिसांची कामगिरी; महिलेसह एका अल्पवयीन मुलाचाही समावेश..


नायक वृत्तसेवा, संगमनेर
दाखल होणार्‍या गुन्ह्यांच्या तपासाच्या बाबतीत ठणठणाट असलेल्या संगमनेर शहर पोलीस ठाण्यातून मोठ्या कालावधीनंतर काहीशी दिलासादायक बातमी समोर आली आहे. उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर व नगरच्या पथकांनी केलेल्या तपासातून गांधी जयंतीच्या दिवशी रहेमतनगरमधील बंद घरात घडलेल्या पाचतोळे वजनाच्या चोरीचा छडा लावण्यात पोलिसांना यश मिळाले आहे. या प्रकरणी पोलिसांनी मूळच्या संगमनेरच्या मात्र हल्ली मालेगावात स्थायीक झालेल्या इम्रान चाँद शेख याच्यासह एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले असून त्यांच्या ताब्यातून चोरीला गेलेले काही दागिनेही हस्तगत करण्यात आले आहे. या प्रकरणात एका महिलेचाही सहभाग असल्याचे समोर आले असून सदरील महिलेला मात्र अद्याप अटक करण्यात आलेली नाही.


याबाबत उपविभागीय पोलीस अधिकार्‍यांच्या कार्यालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार गेल्या 2 ऑक्टोबररोजी रहेमतनगरमध्ये राहणार्‍या इम्रान सलिम शेख यांच्या बंद घराची कडी उघडून चोरट्यांनी घरातील पाचतोळे वजनाचे दागिने लांबविले होते. या घटनेनंतर पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी आपल्या नेतृत्वाखाली पथकाची स्थापना करुन तपासाची सूत्रे हाती घेत एकाला तायात घेतले. त्याच्या चौकशीतून सदरचा गुन्हा उघड झाला असून इम्रान चाँद शेख (वय 29, मूळ रा.एकतानगर, संगमनेर, हल्ली रा.मालेगाव, जि.नाशिक) या अटक केलेल्या आरोपीने एका अल्पवयीन मुलासह मिनाज राजू शेख या महिलेला सोबत घेत सदरची चोरी केल्याचे उघड झाले आहे. यातील अल्पवयीन मुलालाही पोलिसांनी ताब्यात घेतले असून महिला मात्र पसार आहे.


त्या दोघांच्याही चौकशीतून त्यांनी चोरलेले व नंतर वेगवेगळ्या ठिकाणी ठेवलेले सोन्याचे काही दागिने हस्तगत करण्यात आले असून उर्वरीत दागिने मिळवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. या घटनेने शहर पोलिसांचा गेल्या अनेक दिवसांपासून सुरु असलेला तपासाचा दुष्काळ संपला असून अवघ्या 25 दिवसांतच चोरीचा तपास लागल्याने शेख कुटुंबियांनी आनंद व्यक्त केला आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस उपअधीक्षक वाघचौरे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस निरीक्षक भगवान मथुरे, सहाय्यक फौजदार रावसाहेब लोखंडे, पो.ना.राहुल डोके, भागा धिंदळे, सचिन धनाड, पो.कॉ.राहुल सारबंदे, अजित कुर्‍हे, आत्माराम पवार व आकाश बहिरट यांनी केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *