धानोरे ग्रामस्थांचे तिसर्‍या दिवशीही उपोषण सुरूच

धानोरे ग्रामस्थांचे तिसर्‍या दिवशीही उपोषण सुरूच
प्रशासनासह लोकप्रतिनिधींनी दखल न घेतल्याने तीव्र नाराजी
नायक वृत्तसेवा, राहुरी
गावातून अवैधरित्या होत असलेल्या वाळू उपशाला कंटाळून राहुरी तालुक्यातील धानोरे ग्रामस्थ स्मशानभूमीवर सरण रचून उपोषणास बसले आहेत. दरम्यान, रविवारी (ता.4) तिसर्‍या दिवशीही ग्रामस्थांचे उपोषण सुरूच होते. याबाबत प्रशासनासह लोकप्रतिनिधींनी कोणतीही दखल न घेतल्याने ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.


राहुरी तालुक्यातील प्रवरा नदीवरील धानोरे गावातील ग्रामस्थांचे हे वाळूच्या संदर्भातील तिसरे उपोषण आहे. काही दिवसांपूर्वी सामाजिक कार्यकर्ते बापूसाहेब दिघे व त्यांचे सहकारी वाळू चोरीच्या संदर्भात उपोषणास बसले होते. त्यावेळेस प्रशासनाकडून दखल घेऊन मंडलाधिकारी पी. बी. शिंदे, तलाठी मच्छिंद्र रहाणे यांनी पंचनामा करून साधारण वाळू उपसा झाल्याचे निदर्शनास आणले.


या प्रकरणाचा तपास करून संबंधितांवर गुन्हा दाखल करून दंड वसूल केला जाईल, असे आश्वासन प्रशासनाने दिले होते. मात्र अद्याप कारवाई करण्यात आली नाही. त्यामुळे ग्रामस्थ उपोषणास बसले आहेत. दरम्यान रविवारी तिसर्‍या दिवशीही ग्रामस्थांचे स्मशानभूमीत सरणावर बसून उपोषण सुरू होते. उपोषणस्थळी ग्रामस्थांची मोठी गर्दी होत आहे. शिवाय तिसर्‍या दिवशीही महसूलचा कोणताही अधिकारी इकडे फिरकला नाही. याबाबत ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

Visits: 193 Today: 1 Total: 2057860

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *