जेथे प्रतिमेचे झाले ‘दहन’, तेथेच नानांचे ‘जंगी’ स्वागत! शिवसैनिकांची मोठी उपस्थिती; संगमनेरात शिवसेना वाढवणारे सोबत पाहून नाना भारावले..
नायक वृत्तेसवा, संगमनेर
स्थानिक शिवसेनेतील अंतर्गत गटबाजीतून गेल्या आठवडाभर घडलेल्या विविध घडामोडींसह गेल्या शनिवारी (ता.5) शिवसेनेतील एका गटाने बस स्थानकाजवळ जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे उर्फ नाना यांच्या प्रतिमेचे दहन केले होते. आज दुपारी दोन वाजता त्याच ठिकाणी शिवसेनेतील जुन्या गटाने एकत्रित येवून ढोल-ताशे, फटाक्यांची आतषबाजी आणि जय जयकाराच्या घोषणांनी त्यांचे जंगी स्वागत केले. हा सगळा प्रकार पाहून भारावलेल्या नानांनी हा तर केवळ ‘ट्रेलर’ आहे, ‘पिक्चर’ अजून बाकी आहे, ‘टायगर अभी जिंदा है!’ अशी वेगवेगळी सूचक विधाने केल्याने जमलेल्यांनी त्याचे वेगवेगळे अर्थ काढून त्यावर खुमासदार चर्चाही सुरु केल्याचे चित्र आज संगमनेरात बघायला मिळाले.
गेल्या आठ दिवसांपासून संगमनेरच्या शिवसेनेत मोठी उलथापालथ बघायला मिळत आहे. शिवसेनेने गेल्या महिन्यात 29 ऑक्टोबर रोजी शिर्डी लोकसभा मतदार संघातील संघनात्मक फेरबदल केले होते. त्यातून नाराज झालेल्या काही शिवसैनिकांनी पक्षशिस्तीला वाटाण्याच्या अक्षदा वाहून पक्षाच्या निर्णयाला जाहीरपणे विरोध दर्शविला. त्यामुळे पक्षाने जाहीर केलेल्या फेरबदलास स्थगिती दिली. त्यातूनही काही ठिकाणी आंदोलने झाली व त्यात पक्षातील वरीष्ठ पदाधिकार्यांच्या प्रतिकात्मक प्रतिमांना जोडे मारण्याचे व त्यांचे दहन करण्याचेही प्रकार घडले. त्यामुळे शिवसेनेतील वातावरण गढूळ झालेले असतांना आज (ता.8) दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे यांच्या जंगी स्वागताचे आयोजन करण्यात आले होते.
शनिवारी (ता.5) शिवसेनेतील एका नाराज गटाने बसस्थानक चौकात जिल्हाप्रमुख खेवरे यांच्या प्रतिकात्मक प्रतिमेचे दहन केले होते. त्याच ठिकाणी आजच्या स्वागत सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हाप्रमुख खेवरे यांचे आगमन होताच फटाक्यांची आतषबाजी करुन ढोल-ताशांचा गजर करण्यात आला. यावेळी शिवसेना जिंदाबाद, उद्धव ठाकरे साहेबांचा विजय असो, खेवरे नाना तुम आगे बढों.. अशा जोरदार घोषणाही देण्यात आल्या. यावेळी खवरे यांच्यासोबत कोपरगाव, राहाता व नेवाशाचे जिल्हाप्रमुख राजाभाऊ झांबरे यांच्यासह जिल्हा कार्यकारणीतील अनेक पदाधिकारीही हजर होते.
यावेळी पत्रकारांशी बोलतांना जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे म्हणाले की, काही लोकांनी ज्या ठिकाणी चुकीचे काम केले, त्याच ठिकाणी आज आमच्या शिवसैनिकांनी अत्यंत चांगले काम केले आहे. आज आमच्या स्वागताला जमलेले जुने शिवसैनिक पाहून दिवाळीला जितका आंनद मिळाला नाही तितका आनंद आज प्राप्त झाल्याचे ते म्हणाले. शिवसेनेतील गटबाजीवर भाष्य करतांना त्यांनी सर्व शिवसैनिक एकसंघ असल्याचे सांगितले. पुतळा जाळणे वगैरे हा सगळा प्रकार वेगळा असून आज जे काही दिसतंय तो केवळ ट्रेलर आहे, पिक्शर अजून बाकी आहे असे सांगत त्यांनी सूचक इशाराही केला.
ज्यांना कोणाला काय वाटतं असेल ते वाटू द्या, मात्र त्यांनी ‘टायगर अभी जिंदा है’ हे विसरु नये असा इशाराही त्यांनी दिला. ज्या लोकांनी शहरात, तालुक्यात शिवसेनेची पाळेमुळे रुजवली, छोट्याशा रोपट्याचे झाडात रुपांतर केले. ते सगळे मूळ शिवसैनिक आज येथे जमले आहेत. या सर्वांनी शिवसेनेसाठी अंगावर केसेस घेतल्या, आपल्या प्रपंचाचे नुकसान केले, स्वतःचे वाटोळे करुनही जे पक्षाशी एकनिष्ठ राहीले ते सगळे आज माझ्यासोबत असल्याचे पाहून आपण भारावलो आहोत असे भावोद्गारही त्यांनी व्यक्त केले. आपण शाखा प्रमुखापासून ते जिल्हा प्रमुखापर्यंत काम केले आहे. त्यामुळे सगळ्यांना सोबत घेवून पुढे जाण्याची आणि पक्षा वाढविण्याची आपली इच्छा आहे. यापुढील काळात संगमनेर शिवसेनेतील गटबाजी पूर्णतः संपवणार असल्याचे सांगतांना गेल्या काही दिवसांत घडलेल्या छोट्या-मोठ्या घटना पक्षासाठी योग्य नसल्याचे सांगत यासर्व गोष्टी पक्षप्रमुखांच्या कानावर घालणार असल्याचे ते म्हणाले.
शिवसेनेसाठी असंख्य माणसं झीझली आहेत, त्यामुळे कोणावरही अन्याय होणार नाही हे पहाण्याची जबाबदारी आपली आहे. आज एकीकडे लोकं पेट्या आणि खोके घेवून बसलेत, तर दुसरीकडे येथे जमलेला यातील एकही मर्द मावळा त्या लोभाला फळला नाही. त्यामुळे यासर्व शिवसैनिकांचा मला सार्थ अभिमान आहे. ही सर्व मंडळी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर नितांत प्रेम करणारी आहे. कोणत्याही पक्ष अथवा संघटनेची ध्येय व धोरणे ठरलेली असतात. जिल्हाप्रमुख, उपजिल्हाप्रमुख, तालुकाप्रमुख व शहरप्रमुख अशा कडीतून संघटनात्मक कामकाज चालत असते. मात्र काहींनी त्याला फाटा देवून हम करें सो कायदा ही नीति राबविल्याचे समोर आले असून असे प्रकार शिवसेनेत कधीही खपवून घेणार नसल्याचा इशाराही त्यांनी दिला.
यावेळी जिल्हाप्रमुख राजेंद्र झावरे, कलविंदर दडियाल, राहाता शहरप्रमुख गणेश सोमवंशी, नेवाशाचे हरीभाऊ शेळके, अकोले तालुकाप्रमुख मच्छिंद्र धुमाळ, श्रीरामपूरचे सचिन बडदे यांच्यासह संगमनेर तालुकाप्रमुख जनार्दन आहेर, शहरप्रमुख प्रसाद पवार, युवासेनेचे तालुकाध्यक्ष गुलाब भोसले, माजी जिल्हाप्रमुख जयवंत पवार, माजी विधानसभा समन्वयक आप्पा केसेकर, माजी तालुकाप्रमुख कैलास वाकचौरे, अॅड.दिलीप साळगट, बाजीराव कवडे, शरथ थोरात, संजय फड, पंचायत समितीचे माजी सदस्य अशोक सातपुते, आशा इल्हे, अमोल कवडे, रवींद्र उर्फ पप्पू कानकाटे, संदेश देशमुख, रवी गिरी, समीर ओझा, मच्छिंद्र दिघे, पंढरीनाथ इल्हे, भागवत मुंगसे, विजय शिरसाठ, संतोष कुटे, सुनिता सातपुते, कावेरी नवले, शितल हासे, वनिता जगदाळे यांच्यासह जुने-नवे शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बस स्थानकाजवळील दत्त मंदिराच्या प्रांगणात आगमन झाल्यानंतर तेथून अरगडे गल्लीतील छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकापर्यंत ढोल-ताशांचा गजर आणि शिवसेनेचा जय जयकार करीत शोभायात्रा काढण्यात आली. यावेळी जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे यांच्या हस्ते छत्रपतींच्या अर्धाकृती प्रतिमेस पुष्पहारही अर्पझ करण्यात आला. तेथून ही शोभायात्रा पुन्हा बस स्थानकाजवळ आल्यानंतर जिल्हाप्रमुख खेवरेंनी शिवसैनिकांना मार्गदर्शन केले. यावेळी जमलेल्या शिवसैनिकांनी आम्ही आपल्या पाठीशी ठामपणे उभे असल्याचे आश्वासन त्यांना दिले.