जोहरापूर येथील ऊस उत्पादक शेतकर्याची आत्महत्या ऊसाला तोडणी येत नसल्याने आत्महत्या केल्याचा संशय
नायक वृत्तसेवा, शेवगाव
तालुक्यातील एका ऊस उत्पादक शेतकर्याने विषारी औषधाचे सेवन करून आत्महत्या केली आहे. त्यांच्या ऊसाला तोडणी येत नसल्याने त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. त्यांनी प्रथम ऊस पेटवून दिला आणि नंतर आत्महत्या केली, अशी माहिती मिळत असून त्यांच्या कुटुंबियांनी याला दुजोरा दिल्याचे सांगण्यात आले.
शेवगाव तालुक्यातील जोहरापूर येथे ही घटना घडली. जनार्दन सीताराम माने (वय 70) यांनी मंगळवारी (ता. 5) दुपारी विषारी औषध सेवन केले होते. उपचार सुरू असताना बुधवारी त्यांचा मृत्यू झाला. शेवगाव पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. अधिक चौकशी सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. मात्र, माने यांनी साखर कारखान्यांकडून उसाला तोडणी मिळत नसल्याने आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. त्यांचा मुलगा संतोष माने यांनी ही माहिती दिल्याचे सांगण्यात आले. त्यानुसार पोलीस खातरजमा करीत आहेत.
माने यांचा तीन एकर क्षेत्रात ऊस होता. त्याची तोडणीची तारीख टळून गेली. यावर्षी अतिरिक्त उसाचे उत्पादन झाल्याने तोडणी मिळणे दुरापास्त झाले आहे. गेल्या महिनाभरापासून ते कारखान्यांकडे चकरा मारत होते. मात्र, काही उपयोग होत नव्हता. त्यामुळे त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलेले. मंगळवारी दुपारी त्यांनी शेतातील उभ्या उसाला आग लावली. त्यानंतर स्वत: विषारी औषध सेवन केले. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. बुधवारी त्यांचा मृत्यू झाला. माने यांना गेल्यावर्षी पुराचाही फटका बसला होता. पूरग्रस्त भागातील उसाची लवकर तोडणी होणे अपेक्षित होते. प्रत्यक्षात गाळप हंगाम संपत आला तरीही त्यांचा उस शेतात उभा होता. त्यामुळे कंटाळून त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचा संशय व्यक्त होत आहे.