पट्टाकिल्ला येथे कोणत्याही पर्यटकांनी येऊ नये ः गोडे
पट्टाकिल्ला येथे कोणत्याही पर्यटकांनी येऊ नये ः गोडे
नायक वृत्तसेवा, अकोले
पर्यटनाबाबत सरकारने अटी शिथील केल्यामुळे मोठ्या प्रमाणात पट्टाकिल्ला येथे पर्यटक येत आहेत. त्याचा वन कर्मचारी व स्थानिकांना त्रास होऊ लागल्याने तिरढा ग्रामपंचायतने ठराव घेऊन गडावर येणार्या पर्यटकांना मोठा दंड आकारण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे या भागात कुणीही येऊ नये, असे आवाहन सरपंच मंदा सचिन गोडे यांनी प्रसार माध्यमाशी बोलताना केले आहे.

पट्टाकिल्ल्याचे उपनाव विश्रामगड असून उंची 1391 मीटर आहे. त्याच्या पायथ्याशी पूर्वेला पट्टावाडी, दक्षिणेला कोकणगाव तर उत्तरेला तिरडे गाव आहे. गाडीमार्गे नाशिक-घोटी-टाकेद-म्हैसवळण घाट-पट्टावाडी येता येते. संपूर्ण किल्ला भटकंतीसाठी सुमारे 3 ते 4 तास लागतात. या गडावर नाशिक, अहमदनगर, औरंगाबाद, संगमनेर, मुंबई या भागातून सतत पर्यटक येतात. निवांत ठिकाण असल्याने कोरोना असतानाही या भागात मद्यपी पर्यटक मोठ्या प्रमाणात येतात. वन कर्मचारी व स्थानिक ग्रामस्थांना दमदाटी करून गडावर जातात. त्यामुळे स्थानिक ग्रामस्थांनी एकत्र येत हा महत्वपूर्ण निर्णय घेतल्याचे सरपंच गोडे यांनी सांगितले. कोरोनामुळे गावावर कोणतेही संकट येऊ नये. म्हणून ग्रामस्थ सतर्क असून बळजबरीने आल्यास 10 हजारपर्यंत दंड आकारण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

