गोळीबार करुन पसार झालेला पोलीस कोल्हारमध्ये जेरबंद! शिर्डी व लोणी पोलिसांची कारवाई; ठाणे पोलिसांच्या केले स्वाधीन
नायक वृत्तसेवा, राहाता
शुक्रवारी (ता.१३) रात्री ठाणे जिल्ह्याच्या भिवंडी तालुक्यातील पडघा पोलीस ठाण्याच्या हद्दीत गोळीबार करून दोघांना जखमी करणार्या पोलीस हवालदारास कोल्हार बसस्थानकात पकडण्यात आले. बसमधून पळून जात असताना शिर्डीचे पोलीस उपाधीक्षक संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली शिर्डी व लोणी पोलिसांच्या पथकाने शिताफीने ही कारवाई केली. त्यानंतर पकडलेल्या आरोपीस ठाणे पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले.
सूरज देवराम ढोकरे हा मुंबई येथील कलिना हेडक्वॉर्टरमधील शीघ्र कृती दलाच्या शस्त्रागार विभागात इन्चार्ज आहे. तो मूळचा संगमनेर तालुक्यातील घारगाव येथील रहिवासी आहे. शुक्रवारी रात्रीच्या सुमारास त्याने शहापूर भागात स्वतःच्या सर्व्हिस रिव्हॉल्वरमधून आठ राऊंड फायर करीत दोघांवर गोळीबार केला. त्यातील एकाला सहा गोळ्या लागल्या तर दुसर्याला दोन गोळ्या लागल्या. दोघेही गंभीर जखमी आहेत. फायरिंग केल्यानंतर रात्रीपासून हा पोलीस हवालदार ठाण्यातूून फरार झाला. कधी ट्रेन तर कधी बस अशा साधनांमधून तो वेगवेगळ्या ठिकाणी पसार होत होता. तेव्हापासून पोलीस त्याच्या मागावर होते. त्याचा पाठलाग करीत असताना कोल्हार बसस्थानकात नगर-नाशिक बस आली. या बसमधून प्रवास करत असताना त्याच्या मुसक्या आवळण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.
त्याच्यावर प्रचंड कर्ज झाले होते. तो स्वतःला गोळी झाडून घेणार होता, परंतु हिंमत झाली नाही. कर्जाच्या नैराश्यातून त्याने विनाकारण दोघांवर गोळीबार केला असल्याची माहिती सूत्रांनी दिली. पोलीस उपाधीक्षक संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली लोणीचे सहायक पोलीस निरीक्षक यूवराज आठरे, पोलीस उपनिरीक्षक योगेश शिंदे तसेच शिर्डी व लोणी पोलिसांच्या पथकाने संयुक्तरीत्या ही कारवाई केली. अहमदनगरच्या कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका हॉटेलला तो थांबला होता. तेथून त्याचे फूटेज व कपड्याचे वर्णन पोलिसांना मिळाले. त्याचप्रमाणे गोपनीयरित्या त्याचे फूटेज व लोकेशन पोलिसांना मिळत होते. त्यावरुन त्याचा शोध सुरु होता. पाठलाग करत असताना तो बसमध्ये पोलिसांना दिसला. अखेर त्यास कोल्हार बसस्थानकात पकडण्यात पोलिसांना यश आले. यावेळी बसस्थानकासमोर बघ्यांची मोठी गर्दी जमली होती. तेथून त्यास कोल्हार पोलीस चौकीवर आणण्यात आले. पाठलाग करीत असलेले ठाणे ग्रामीण अंतर्गत कासारा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जाधव व पोलीस पथक चौकीमध्ये आले. त्यानंतर सदर पोलीस हवालदार सूरज ढोकरे यास ठाणे ग्रामीण पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.