अलंकार परिधान करुन महिलांचे संगमनेरात फिरणे बनले धोकादायक! चोरट्यांनी रहदारीतूनही सहज लांबवले गंठण; म्हाळुंगी नदीच्या पूलावर घडला प्रकार..


नायक वृत्तसेवा, संगमनेर
खमक्या पोलीस निरीक्षकांच्या अभावाने संगमनेरातील कायदा व सुव्यवस्थेचे दररोज वाभाडे निघत असून सर्वसामान्यांना आता देवाच्या भरवशावरच वावरण्याची वेळ आली आहे. रोज घडणार्‍या चोरीच्या घटना, मोटारसायकल लांबविण्याचे प्रकार आणि महिलांच्या गळ्यातील सोनसाखळ्या ओरबाडण्याच्या नियमित घटनांनी सामान्य संगमनेरकर नागरिक भयभीत झाला असून शहरात पोलिसांचे अस्तित्व आहे की नाही अशाही शंका निर्माण होवू लागल्या आहेत. या शंकेत भर घालणार्‍या आणखी एका घटनेची आज भर पडली असून ढोलेवाडीत राहणार्‍या एका गृहिणीच्या गळ्यातील दोन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण दुचाकीवरील दोघांनी लांबविले. भरदुपारी बाराच्या सुमारास घडलेल्या या घटनेत काही तरुणांनी चोरट्यांचा पाठलागही केला, मात्र त्यांच्या हाती काहीच लागले नाही. गेल्या काही वर्षांपासून शहरात सोनसाखळ्या लांबवण्याचे नियमित प्रकार घडत असल्याने महिलांनी अलंकार परिधान करुन वावरणे धोकादायक बनले आहे.

याबाबत प्राप्त झालेल्या माहितीनुसार सदरची घटना आज (ता.22) दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास अकोले नाक्याजवळील म्हाळुंगी नदीच्या पूलावर घडली आहे. मूळच्या अकोले तालुक्यातील निळवंडे येथील मात्र सध्या शहरालगतच्या ढोलेवाडी परिसरात राहणार्‍या मनीषा राधाकिसन आभाळे या अकोले येथे जाण्यासाठी नाक्याच्या दिशेने पायी निघाल्या होत्या. ढोलेवाडीतून चालत येवून म्हाळुंगी नदीच्या पूलावरुन त्या अकोले नाक्याच्या दिशेने जात असताना समोरील बाजूने दुचाकीवरुन दोघेजण त्यांच्या दिशेने आले. यावेळी पुलावर एकही चारचाकी वाहन नसल्याचा फायदा घेत दुचाकीवर पाठीमागे बसलेल्या चोरट्याने त्यांच्या गळ्याला हिसका देत त्यांच्या गळ्यातील दोनतोळे वजनाचे गंठण ओरबाडले.

सदरचा प्रकार ‘त्या’ महिलेच्या लक्षात येवून तिने आरडाओरड करण्यापूर्वीच चोरट्यांनी आपला कार्यभाग उरकून अकोल्याच्या दिशेने धूम ठोकली. आपल्या गळ्यातील गंठण चोरीला गेल्याचे लक्षात येताच मनीषा आभाळे यांनी ओरड केली. यावेळी आसपासच्या चहाच्या दुकानांमध्ये असलेल्या दोघा-तिघा तरुणांना हा प्रकार समजल्यानंतर त्यांनी लागलीच चोरटे गेले त्या दिशेला दुचाकीवरुन जावून त्यांचा माग काढण्याचा प्रयत्न केला. मात्र अशाप्रकारांमध्ये माहीर असलेले चोरटे त्यापूर्वी ऐच्छिक मार्गाने बेपत्ता झाले होते. या घटनेनंतर घाबरलेल्या महिलेला रडू कोसळल्याने परिसरात राहणार्‍या काही महिलांनी त्यांना धीर देत एका दुकानाजवळ बसवले.

यावेळी काहींनी पोलिसांना फोन करुन माहिती देताच काही वेळातच पोलीस कर्मचारी विजय पवार, अविनाश बर्डे व सचिन उगले यांनी घटनास्थळाकडे धाव घेत त्या महिलेची विचारपूस केली. या घटनेची प्राथमिक माहिती प्राप्त करुन सदर महिलेला तक्रार देण्यासाठी पोलीस ठाण्यात पाठविण्यात आले. त्यानंतर घटनास्थळी असलेल्या पोलिसांनी घटनास्थळापासून पुढील सीसीटीव्ही कॅमेरे तपासण्यास सुरुवात केली. सदरचे चोरटे गंठण ओरबाडल्यानंतर अकोले रस्त्यावरील बायपासने पुणे अथवा नाशिकच्या दिशेने लंपास झाल्याची शक्यता गृहीत धरुन पोलिसांच्या एका पथकाकडून या दोन्ही बाजूच्या रस्त्यांवरही चौकशी करण्यात येत आहे. मात्र वृत्त लिहेपर्यंत पोलिसांच्या हाती काहीही लागलेले नव्हते.

गेल्या काही वर्षांपासून संगमनेर शहरात गोवंश कत्तलखाने आणि सोनसाखळीच्या एकामागून एक घटना घडत आहेत. शहरातील अशाप्रकारांना आळा बसावा यासाठी पोलिसांनी सुरुवातीला राजस्थान युवक मंडळ व नंतर राज्य शासनाच्या मदतीने शहरातील प्रमुख मार्गावर सीसीटीव्ही कॅमेरेही बसविले. मात्र या कॅमेर्‍यांचा आजवर फारसा वापर करुन घेण्यातही पोलीस सपशेल अपयशीच ठरले आहेत. त्यातच यापूर्वीच्या निष्क्रिय पोलीस निरीक्षकांमुळे शहराच्या शांतता व सुव्यवस्थेची घडी बिघडलेली असताना त्यांच्या जागी एखाद्या खमक्या पोलीस निरीक्षकांची वर्णी लावण्याऐवजी येथे येण्यापूर्वीच जाण्याची मानसिकता सोबत घेवून आलेल्या पोलीस निरीक्षकांकडे शहराची सूत्रे सोपविण्यात आली. त्यामुळे आधीच बिघडलेली परिस्थिती आता अक्षरशः खालावली आहे.

यापूर्वी संगमनेरच्या तत्कालीन पोलीस उपअधीक्षक राहुल मदने यांनी सोनसाखळी चोरट्यांचा यशस्वी तपास करताना श्रीरामपूर तालुक्यातील वडाळा महादेव येथील चोरट्यांची टोळी जेरबंद केली होती, त्या टोळीच्या म्होरक्याला जेरबंद करण्यात मात्र त्यांनाही अपयश आले होते. मात्र त्यांच्या त्या धडाकेबाज कारवाईने शहरात नियमित घडणार्‍या अशा घटनांना बर्‍याचअंशी पायबंद बसला होता. मात्र आता त्यांची बढतीवर बदली होताच मध्यंतरीच्या काळात शांत बसलेले सोनसाखळी चोरटे पुन्हा एकदा सक्रिय झाले असून आज भरदुपारी त्यांनी रहदारीसह वर्दळीच्या अकोले रस्त्यावर गंठण ओरबाडून याची वर्दीही दिली आहे. या घटनेने संगमनेरातील महिलांमध्ये पुन्हा एकदा भीतीचे वातावरण निर्माण झाले असून अलंकार परिधान करुन घराबाहेर पडण्यास महिला घाबरु लागल्या आहेत.


नूतन पोलीस अधीक्षक राकेश ओला यांना जिल्ह्यातील गुन्हेगारी आणि त्यांच्या कारवायांची व्याप्ती चांगलीच ठावूक आहे. त्यामुळे जिल्ह्यातील गुन्हेगारीचे उच्चाटन करण्यासाठी त्यांनी पोलीस दलात फेरबदल करण्यास सुरुवात केली असली तरीही जिल्हा मुख्यालयाच्या खालोखाल महत्त्वाचे केंद्र असलेल्या संगमनेर शहरात मात्र अद्यापपर्यंत कोणताही बदल झालेला नाही. विशेष म्हणजे संगमनेरचे विद्यमान पोलीस निरीक्षक राजेंद्र भोसले यांनी यापूर्वीच बदलीसाठी अर्जही दाखल केलेला आहे, मात्र त्याचाही विचार झाला नसल्याने ‘चालेल तोवर चालवू’ अशा मानसिकतेतच ते आपले कर्तव्य बजावित असल्याने शहराची अवस्था अधिक बिकट झाली आहे.

Visits: 9 Today: 2 Total: 30422

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *