कळस बुद्रुकमध्ये विमा कंपनी व प्रशासनाचा शेतकर्यांकडून निषेध
नायक वृत्तसेवा, अकोले
पावसाची अनियमितता व तेल्या रोगाने डाळिंबाचे संपूर्ण नुकसान होऊन सुध्दा घेतलेला विमा न आल्याने अकोले तालुक्यातील कळस बुद्रुक येथे शेतकर्यांनी भर पावसात रस्त्यावर उतरून विमा कंपनी व प्रशासनाचा निषेध नोंदवला.
अकोले तालुक्यातील कळस बुद्रुक येथील शेतकरी जास्तीत जास्त डाळिंब पिकाची लागवड करतात. सततचे रोग व पावसाची अनियमिततेमुळे शेतकरी आपल्या पीक कर्जातच डाळिंबाचा विमा घेतात व काही शेतकरी वैयक्तिक विमा घेतात. गेल्या वर्षी तेल्या रोगाने आणि वादळी अतिवृष्टीमुळे डाळिंब अक्षरशः उखडून पडले होते. याचा पंचनामा देखील झाला. पण प्रशासनाने फक्त कागद रंगवले आणि विमा कंपनीने शेतकर्यांच्या तोंडाला पाने पुसली. बजाज कंपनी व एचडीएफसी कंपनीच्या माध्यमातून हे डाळिंबाचे वीमे घेतले जातात. हजारो रुपयांचे विमा हप्ता भरून हाती काहीच मिळाले नाही. मग लोकप्रतिनिधी व प्रशासन विमा कंपनीला पाठिशी तर घालत नाही ना? असा घणाघात युवा नेते अरुण वाकचौरे यांनी केला. दरम्यान, अकोले-संगमनेर रस्त्यावर शेकडो वाहनांच्या लांबच्या लांब रांगा लागल्या होत्या. यावेळी तालुका कृषी अधिकारी प्रवीण गोसावी व पोलीस प्रशासन कळस येथे हजर झाले. शेतकर्यांच्या प्रश्नांना उत्तरे देत दोन दिवसांत विमा अधिकारी व शेतकर्यांची बैठक घेऊन यावर मार्ग काढण्याचे लेखी आश्वासन दिले. त्यांनतर आंदोलन मागे घेण्याची विनंती करण्यात आली आणि लेखी आश्वासनानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
तत्पूर्वी निवेदन देऊन देखील विमा कंपनीचे अधिकारी उपस्थित न राहिल्याने कंपनीचा निषेध नोंदविण्यात आला. तर दोन दिवसांत विमा कंपनीच्या अधिकार्याने शेतकर्यांची भेट घेऊन विम्याबाबत पाऊल न उचलल्यास पुन्हा रास्ता रोको आणि तहसील कार्यालयावर धरणे आंदोलनाचा इशारा देणारे निवेदन ग्रामपंचायत सदस्य केतन वाकचौरे यांनी दिले. या आंदोलनात थोरात कारखान्याचे संचालक संभाजी वाकचौरे, पोलीस पाटील गोपीनाथ ढगे, सेवा सोसायटीचे संचालक ज्ञानदेव वाकचौरे, जालिंदर वाकचौरे, बाळासाहेब वाकचौरे, शुभम वाकचौरे, दिलीप वाकचौरे, अमित वाकचौरे, श्रीकांत वाकचौरे, रावसाहेब वाकचौरे, रामकृष्ण वाकचौरे, आदिनाथ वाकचौरे, मच्छिंद्र भोर, भारत वाकचौरे, उल्हास कातोरे, राहुल वाकचौरे, प्रवीण वाकचौरे, बाळासाहेब बिबवे आदी शेतकरी उपस्थित होते.