नॅक मूल्यांकनासाठी संगमनेर महाविद्यालयाकडून मदतीचा हात मुंबई विद्यापीठातील राज्य परिषदेत संगमनेर महाविद्यालयाचे कौतुक

नायक वृत्तसेवा, संगमनेर
प्राचार्य म. वि. कौंडीण्य यांचा वारसा लाभलेले अहमदनगर जिल्ह्यातील पहिले स्वायत्त महाविद्यालय तसेच नॅक बंगळुरू द्वारा अ+ दर्जा प्राप्त महाविद्यालय म्हणून नावलौकिक असलेल्या शिक्षण प्रसारक संस्थेच्या संगमनेर नगरपालिका कला, दा. ज. मालपाणी वाणिज्य आणि ब. न. सारडा विज्ञान महाविद्यालय (स्वायत्त) संगमनेरचे मुंबई विद्यापीठाच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियान, महाराष्ट्र अंतर्गत विश्वविद्यालय अनुदान आयोग, मानव संसाधन केंद्र, मुंबई विद्यापीठ आयोजित मुंबई विद्यापीठात नुकत्याच पार पडलेल्या राज्यस्तरीय परिषदेत भरभरून कौतुक करण्यात आले.

राज्यातील अनेक महाविद्यालयांचे नॅक मुल्यांकन अद्याप झालेले नाही अशात विद्यापीठ अनुदान आयोग नवी दिल्लीने महाराष्ट्र राज्यातील 32 महाविद्यालयांची निवड नॅक मार्गदर्शक म्हणून परामर्श योजनेसाठी केली होती. या 32 महाविद्यालयांपैकी संगमनेर महाविद्यालय एक होते. या योजनेंतर्गत संगमनेर महाविद्यालयाने 7 महाविद्यालयास मार्गदर्शन केले. इतकेच नव्हे तर 7 पैकी 4 महाविद्यालयास नॅक मूल्यांकन प्राप्त करून देताना संगमनेर महाविद्यालयाचे प्राचार्य आणि अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षचे समन्वयक यांनी वेळोवेळी मोलाचे मार्गदर्शन आणि सहकार्य केले.

परामर्श योजनेतील संगमनेर महाविद्यालयाच्या उत्कृष्ट कामाची दखल राज्य पातळीवर शासनाने तसेच राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियान महाराष्ट्राने घेतली आणि सदर परिषदेत संगमनेर महाविद्यालाचा गुणगौरव करण्याकारीत्या संगमनेर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अरुण गायकवाड तसेच अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षचे समन्वयक प्रा. श्रीहरी पिंगळे यांना आमंत्रित करण्यात आले होते. सदर उल्लेखनीय कामगिरीकरिता संगमनेर महाविद्यालयास मुंबई विद्यापीठाचे प्र. कुलगुरूं प्रा. अजय भामरे यांच्या हस्ते सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. या यशाबद्दल शिक्षण प्रसारक संस्थेचे अध्यक्ष प्रकाश क्षत्रिय, कार्याध्यक्ष डॉ. संजय मालपाणी, सचिव डॉ. अनिल राठी, जनरल सेक्रेटरी सीए. नारायण कलंत्री, खजिनदार राजकुमार गांधी व व्यवस्थापनातील सर्व सदस्य यांनी संगमनेर महाविद्यालयाच्या अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षचे अभिनंदन केले.
